भारत

भारत तथा भारत गणराज्य हा दक्षिण आशियामधील एक प्रमुख देश आणि जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. हा देश क्षेत्रफळाने जगातील ७वा सर्वांत मोठा देश आहे तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताला हजारो वर्षे जुना इतिहास आहे, अनेक साम्राज्ये या भूमीत विकसित पावली व लयाला गेली. भाषा, ज्ञान, अध्यात्म, कला, धर्म या बाबतीत जगाला या देशाने मोठा वारसा दिला आहे. उष्ण कटिबंधातील ह्या देशात विविध प्रकारचे हवामान अनुभवायास मिळते. अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक रितीरिवाज परंतु या विविधतेत एकता हे या देशाचे वैशिष्ट्य आहे.

‘भा’म्हणजे तेज व’रत’म्हणजे रममाण झालेला. तेजात रममाण झालेला देश म्हणजे भारत.

शकुंतला ही विश्वामित्र ऋषींची मेनका या अप्सरेपासून झालेली कन्या होती. तिचा विवाह पुरुवंशीय राजा दुष्यंताशी झाला होता. त्यांचा पुत्र पराक्रमी भरत होता. यावरून हिंदुस्थान देशाला भारत हे नाव पडले असा एक मतप्रवाह आहे.

काहीच्या मते स्वायंभुव मनूची पत्‍नी शतरूपा ऊर्फ बार्हिष्मती यांचा पुत्र असलेल्या प्रियव्रताच्या सात मुलांपैकी एकाचे नांव अग्निध्र होते. अग्निध्राला वारसाहक्काने जंबूद्वीप नावाचा प्रदेश मिळाला. अग्निध्राचा मुलगा नाभि आणि त्याची पत्‍नी मेरुदेवी यांचा पुत्र ऋषभदेव होता. या ऋषभदेवामुळे जंबूद्वीपाला अजनाभवर्ष या नावाने ओळखले जाऊ लागले. ऋषभदेवाची पत्‍नी ही इंद्रकन्या जयंती होती व त्यांना भरत नावाचा मुलगा होता. हा जडभरत या नावाने ज्ञात आहे. त्या ऋषभपुत्र भरतामुळे अजनाभवर्ष नावाचा देश भारत या नावाने प्रसिद्ध झाला.

२६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी देशाची नवी राज्यघटना अंमलात आल्यानंतर देशाचे नाव अधिकृतपणे भारत अर्थात इंडिया (इंग्रजी: India) असे झाले. परम पूज्य महामानव भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नातून २ वर्षे ११ महिने १७ दिवसात भारताचे संविधान निर्माण झाले होते.

भारत देश हा मानवी इतिहासातील प्राचीन देशांमध्ये गणला जातो. मध्यप्रदेशातील भीमबेटका येथील पाषाणयुगातील भित्तीचित्रे भारतातील मानवी अस्तित्वाचे सर्वांत जुन्या पुराव्यांपैकी आहेत. पुराणतज्ञांनुसार, सत्तर हजार वर्षांपूर्वी आदिमानवाने भारतात प्रवेश केला. साधारणपणे ९००० वर्षांपूर्वी भारतात ग्रामीण व शहरी स्वरूपांची मानवी वस्ती होऊ लागली व त्याचेच हळूहळू सिंधू संस्कृतीमध्ये रुपांतर झाले. इसवीसन पूर्व ३५०० च्या सुमारास सिंधू संस्कृतीचा काल मानला जातो. या सिंधू संस्कृतीची सुरुवात भारताच्या वायव्य प्रांतात म्हणजेच आजच्या पाकिस्तानात झाली. मोहेंजोदडो व हरप्पा ही उत्खननात सापडलेली शहरे आज पाकिस्तानात असली तरी भारतीय इतिहासातच गणली जातात. यानंतरचा काळ (इ.स. पूर्व १५०० ते इ.स. पूर्व ५००) वैदिक काळ म्हणून गणला जातो. काही वर्षांपूर्वीपर्यंत इतिहासकारांमध्ये असा समज होता की युरोप व मध्य अशियातून आलेल्या आर्य लोकांच्या टोळ्यांनी सातत्याने आक्रमणे करून सिंधू संस्कृती नष्ट केली व वैदिक काळ सूरू झाला. परंतु सध्या संशोधकांचे असे मत आहे की वैदिक काळ हा पूर्वीच्या संशोधकांच्या मान्यतेपेक्षा अजून प्राचीन असून वैदिक संस्कृती व हडाप्पा व मोहोंदोजडोची संस्कृती या एकच होत्या. सिंधू संस्कृती व वैदिक काळातील घडामोडी या सिंधू व सरस्वती नद्यांच्या काठी घडल्या होत्या यात दुमत नाही. यातील सरस्वती नदी ही काळाच्या ओघात पृष्ठीय बदलांमुळे लुप्त पावली. प्राचीन सरस्वती नदी ही पंजाब, राजस्थान व कच्छ गुजरात मधून वाहत होती हे शास्त्रीय पुराव्यातून सिद्ध झाले आहे. या वैदिक काळातच भारतीय संस्कृतीची मुळे रोवली गेली. मध्य वैदिक काळात सिंधू काठची वैदिक संस्कृती गंगेच्या खोर्यात पसरली. विष्णू पुराणातला पहिला श्लोक भारत या नावाची ओळख करून देतो.

उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् । वर्षं तद्भारतं नाम भारती यत्र सन्ततिः ।।

राजधानी : नवी दिल्ली
सर्वात मोठे शहर : मुंबई
अधिकृत भाषा : आसामी, इंग्रजी, ओडिआ, बंगाली, मराठी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, गुजराती, डोग्री, तमिळ्, तेलुगु, नेपाळी, पंजाबी, बॉडॉ, भोजपुरी. मणिपुरी, मल्याळं, मैथिली, संथाळी, संस्कृत, सिंधी, हिंदी, उर्दू.
स्वातंत्र्य दिवस :(ब्रिटनपासून)
ऑगस्ट १५, १९४७
राष्ट्रीय चलन : भारतीय रुपया

1 Comment on भारत

  1. आपल्या देशाची प्राचीन माहिती, काही नावे तर पहिल्यांदा वाचनात आली.
    धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published.


*