पद्‌मालय गणेश मंदिर, एरंडोल, जि. जळगांव

हे मंदिर जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे आहे. भारतातील प्रमुख गणेश पीठापैकी हे एक पीठ होय. या स्थानांजवळील तलावात वर्षाऋतूत नेहमी कमळ असतात. कमळ म्हणजे पदम आणि आलय म्हणजे घर – म्हणून याला पद्‌मालय असे म्हणतात.

हे मंदिर फार प्राचीन असून त्या काळी येथे घनदाट अरण्य होते. इस. १९१५ ते १९३४ मध्ये महान गणेश भक्त श्री. गोविंद महाराज यांनी येथे वास्तव्य केले. त्यांच्या देखरेखीखाली या मंदिराचा जिर्णोद्धार केला व तेथे आजचे सुंदर व भव्य मंदिर बांधले.

मुख्य देवाच्या सभोवती चारी दिशांना चार गणेशाची मंदिरे आहेत. मुख्य देवालयासमोर श्री स्वामी गोविंद महाराज यांच्या पादुकांची स्थापना केली आहे. मंदिरासमोर एक मोठी घंटा आहे. या घंटेचा नाद सुमारे १६ किमी. परिसरात ऐकू येतो असे म्हणतात. या देवालयात प्रथम पादुकांचे दर्शन घेऊन गणेशाचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे. या दोहोमध्ये ४ फुट उंचीचा भव्य अशा उंदराच्या मूर्तीचे दर्शन होते.

मंदिराच्या गाभाऱ्यात श्री गणेशाच्या दोन स्वयंभू मूर्ती आहेत. दोन्ही मूर्तीना चांदीचे व्हट आहेत. उजव्या सोंडेची मूर्ती पद्‌मालय तलावात मिळाली असे म्हणतात. यातील एका मूर्तीची स्थापना कृतवीर्य राजाचा मुलगा कार्तवीर्य याने केली. कार्तवीर्य जन्मला तेव्हा त्याला हात व पाय नव्हते तसाच तो मोठा झाला.

श्री दत्त प्रभूच्या सांगण्यावरून त्याने गणेशाचा एकक्षरी मंत्राचे अनुष्ठान केले. त्याच्या तपाने प्रसन्न होऊन गणेशाने त्याला वर दिला. त्या वराने त्याला पाय आणि हजार हाताचे बळ असलेले बाहू दिले. (म्हणून नांव सहस्त्रार्जून).

तेव्हा त्याने गणेशाची मूर्ति स्थापना केली तोच हा गणपती होय.

दुसऱ्या गणेश मूर्तीची स्थापना शेषाने केली. शेषाला पृथ्वीचा भार सहन होईना तेव्हा आपल्याला सामर्थ्य लाभावे म्हणून त्याने या गणेशाचे अनुष्ठान केले. त्याला गणेश प्रसन्न झाला म्हणून शेषानेही या गणेशमूर्ती शेजारी दुसऱ्या मूर्तीची स्थापना केली अशा ह्या दोन्ही मूर्ती या मंदिरात आहेत.

येधून ५ किमी. वर महाभारतातील भीम-बकासुराच्या युद्धाची जागा असून जवळच भीमकुंड आहे. या ठिकाणी
खडकावर पावलांचे प्रचंड आकाराचे ठसे आढळून येतात. त्यांना भीमपद चिन्ह म्हणतात.

हे गणेश स्थान अत्यंत जागृत असून अनेक भाविकांना इष्ट फळ लाभले आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*