रायगड जिल्ह्याचा इतिहास

बाराव्या शतकात जिल्ह्यातील रायगड या डोंगराला तणस, राजिवर, रायरी, रायगिरी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जात असे. दूरदृष्टी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी देश व कोकणच्या सीमेवरील या किल्ल्याचे महत्त्व ओळखून येथेच राजधानी वसवली. ब्रिटिश प्रतिनिधीने या मजबूत किल्ल्याला ‘‘पूर्वेकडचा जिब्राल्टर’’ म्हणून संबोधले होते. छत्रपती शिवरायांना अत्यंत प्रिय असलेला रायगड लक्षावधी मराठी जनांचे प्रेरणास्थान आहे. याच गडावर अवघ्या देशाला स्फूर्ती देणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटचा श्वास घेतला.
१८६९ च्या दरम्यान महात्मा जोतिबा फुले यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जिर्णोद्धार केला. १८९७ मध्ये शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने लोकमान्य टिळकांनी या ऐतिहासिक वास्तूला पुन्हा समाजासमोर आणले, जनजागृतीच्या दृष्टीने या स्थानाचे महत्त्व ठळक केले. रायगड जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा जिल्हा असे होते. जिल्ह्यातल्या कुलाबानामक किल्ल्यावरून ते नाव पडले होते. बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे नाव बदलवून रायगड असे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*