पांढरीपांडे, (डॉ.) विजय

औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. विजय पांढरीपांडे ह्यांची निवड ही विशेष उल्लेखनीय अशी बाब आहे. या विद्यापीठाला प्रथमच शास्त्र/ इंजिनीयरिंगचा प्राध्यापक कुलगुरू म्हणूक लाभला आहे.

डॉ. विजय पांढरीपांडे यांनी नागपूर विद्यापीठातून व्ही. आर. सी. ई. तून इंजिनियरिंगची पदवी घेतली. त्यानंतर आयआयटी खरगपूर येथून इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंजिनीयरिंगमध्ये एम. टेक. व पी.एच.डी. केले. सुरूवातीला दोन वर्षे मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन केंदात वैज्ञानिक अधिकारी म्हणून अंतराळ संशोधन प्रकल्पावर काम केल्यानंतर ९ वर्षे आयआयटी खरगपूर येथे त्यांनी अध्यापन व संशोधन केले. संरक्षण खात्याच्या प्रयोगशाळांत विकसित होणार्‍या आधुनिक रडार प्रणालीत डॉ. विजय पांढरीपांडे ह्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

१९८३ साली उस्मानिया विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागात प्राध्यापक म्हणून रूजू होणारे ते सर्वात तरुण उमेदवार ठरले. उस्मानिया विद्यापीठात त्यांनी मायक्रोवेव्ह इंजिनीयरिंग, नेव्हिगेशनल इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रांत महत्त्वपूर्व संशोधन केले व अनेक अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारल्या. ‘मानव संसाधन मंत्रालय’ तसेच ‘मिनिस्ट्री ऑफ इन्फमेर्शन टेक्नॉलॉजी’ या दोन जागतिक प्रकल्पांचे समन्वयक म्हणूनही योगदान दिले. विभाग प्रमुख, चेअरमन बोर्ड ऑफ स्टडीज, डीन ऑफ इंजिनीयरिंग, सिनेट सभासद अशा अनेक पदांच्या माध्यमातून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयरिंग शिक्षण प्रणालीत गुणवत्ता वाढीसाठी अनेक प्रकल्प राबविले, व यशस्वी करून दाखविले.

डॉ. पंढरीपांडे यांचे विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय जर्नल्समधून १४० शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. हैदाबादच्या वास्तव्यात त्यांनी त्यावेळी संरक्षण प्रयोगशाळेचे निर्देशक असलेल्या डॉ. अब्दुल कलाम यांच्याबरोबर देखील काम केले आहे. आंध्र प्रदेश सरकारचा ‘उत्कृष्ट शिक्षण पुरस्कार’, उस्मानिया विद्यापीठाच्या इंजिनीयर्सचा ‘सर विश्वेश्वरय्या पुरस्कार’, इंडियन सोसायटी ऑफ टेक्निकल एज्युकेशनचा ‘अण्णा युनिव्हसिर्टी राष्ट्रीय पुरस्कार’, इन्स्टिट्युट ऑफ टेलीकम्युनिकेशन इंजिनीयर्स या संस्थेचे दोन पुरस्कार तसेच टीचर्स

अ‍ॅकॅडमी हैद्राबादच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दिलेला ‘जीवन गौरव पुरस्कार’ अशा विविध सन्मानांचे मानकरी असलेले डॉ. पंढरीपांडे मराठीचे मान्यवर लेखक देखील आहेत. त्यांची एकूण १८ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ‘मटा’ सह अनेक वृत्तपत्रांतून, मासिकांतून त्यांनी भरपूर प्रासंगिक तसेच ललित स्वरूपाचे लेखन केले आहे.

 

संदर्भस्त्रोत- महाराष्ट्र टाईम्स

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*