आजचा विषय बोरे

नारंगी, पिवळसर, लालसर रंगाची आणि विविध आकारांची चवीला आंबट-गोड बोरांचा हंगाम सुरू झाला आहे. डिसेंबर, जानेवारी महिन्यात बोरांचा हंगाम बहरात असतो. फेब्रुवारी महिन्यात हा हंगाम संपतो. बोरं ही अग्निप्रदीपक असतात. स्वस्त आणि मस्त असं हे फळ असतं. बोर हे एक लालसर पिवळट रंगाचे आंबटगोड चवीचे फळ आहे. याचे फार मोठे वृक्ष होत नाहीत. या झाडांना काटे असतात. याच्या बी असते. तिला ‘आटोळी’ म्हणतात. बोरांचे वेगवेगळे प्रकार आहेत. यात उमराण, चन्या-मन्या, चमेली, चेकनेट, बकुळा बोर, ऍपल बोर ,बनारसी बोर, बाणेरी बोर यांचा समावेश होतो. काही बोरं गावठी असतात. काही समुद्राकाठची तर काही अहमदाबादी बोरंही असतात. चवीला रुचकर, पचण्यास हलके असे बोर मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, वातदोषास कमी करते, जुलाब थांबवते, रक्तविकार, श्रम, शोष वगैरे त्रासातही हितकर असते. आंबट-गोड बोरात व्हिटॅमिन ए, सी, फॉस्फरस, कॅल्शियम, प्रोटीन, कार्बोहायड्रेट इत्यादी जीवनाश्यक सत्वे आढळतात. यांच्या नियमित सेवनाने मुत्रपिंडातील खडा, अतिसार, हगवण, वातविकार यावरती अतिशय लाभदायक होऊ शकते. मूठभर वाळलेली बोरे घ्या आणि ग्लासभर पाण्यामध्ये उकळत टाका. निम्या प्रमाणात पानी आटले की ते पाणी थंड करा. हा बोरांचा काढा अशाप्रकारे तयार करावा. त्यात चवीसाठी साखर किंवा मध टाकून रोज रात्री झोपण्यापूर्वी प्या. यामुळे मेंदूचा थकवा दूर होऊन स्मरणशक्ती वाढते. हे सर्वात स्वस्तच प्रभावी ‘ब्रेनटॉनिक’ होऊ शकते. बी काढलेली बोरे जाळून त्याचे भस्म व लगदा यांच्या मिश्रणात थोडासा लिंबाचा रस टाकून मलग तयार करा. हे मलम चेहऱ्यावरच्या मुरमांवर लावल्यास मुरमे नाहीशी होतात.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

बोरांचा साखर भात
साहित्य:- आठ ते बारा चांगली मोठ्ठी टपोरी व पिकलेली बोरे, १ वाटी बासमती तांदूळ, १ वाटी साखर, अर्धीवाटी नारळाचा चव, अर्धा चमचा चहाचा चमचा वेलची पूड, ७-८ काड्या केशर, १ मोठा चमचा साजूक तूप, ४ ते ५ लवंगा, १ चिमूट मीठ.
कृती:- प्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन त्यात चिमूटभर मीठ घालून मोकळा भात शिजवून परातीत उपसून थंड होण्यासाठी ठेवावा. बोरे धुऊन मोठे तुकडे करावेत. कढईत तूप गरम झाल्यावर त्यात लवंगा घालाव्यात. मग साखरेत ती भिजेल इतपत पाणी घालून एकतारी पाक करावा. त्यात शिजवलेला भात, बोरांचे तुकडे, वेलदोडा पूड, केशर काड्या व खोवलेले खोबरे घालून झाकण ठेवावे. वाफ येऊन भात आळला (घट्ट) की खाली उतरावा. हा भात गार वा गरम सर्व्ह करावा. वर साजूक तूप घालावे.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

बोराची चटणी
एक किलो पिवळसर रंगाची बोरे निवडून त्यांचा किस करून घ्यावा. बोराच्या किसापासून साधारणतः १.५०० ते १.७५० किलो चटणी तयार होते.
साहित्य:- पिवळसर बोराचा किस १ किलो, मिरची पूड २० ग्रॅम, कांदा बारीक वाटलेला २, लसूण बारीक वाटलेला १, वेलदोडे पावडर १५ ग्रॅम, दालचिनी पावडर १५ ग्रॅम, व्हिनेगार १८० मिली, साखर २ चमचे, मीठ चवीनुसार
कृती:- बोराच्या किसामध्ये साखर आणि मीठ मिसळून ते मिश्रण गरम करण्यास ठेवावे व सर्व मसाल्याचे पदार्थ मलमलच्या कापडाच्या पुरचुंडीमध्ये बांधून मिश्रणात सोडावी. अधून-मधून ही पुरचुंडी थोडीशी पळीने दाबावी म्हणजे मसाल्याचा अर्क उतरण्यास मदत होईल. हे मिश्रण थोडे शिजवावे व त्यात व्हिनेगार टाकावे. मिश्रण पुन्हा गरम करावे. गरम असतानाच ही तयार झालेली चटणी रुंद तोंडाच्या निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटलीमध्ये भरावी.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*