आजचा विषय भोकर

भोकर हे एक फळ आहे. या फळाचा लहान सुपारी एवढा आकार असतो. भोकर फळाला मराठीत गोंदण, हिंदीत लासोरा, संस्कृत मध्ये श्लेष्मातक, इंग्रजी मध्ये इंडियन चेरी असे ही म्हणतात.

भोकराच्या फळाचा आकार गोलाकार असतो, बोरांएवढी, पिकल्यावर चकचकीत, पिवळसर किंवा गुलाबी पिवळसर रंगाची दिसतात. पिकलेले भोकर चवीला गोड असते. भोकर फोडल्यानंतर घटट् चिकट द्रव बाहेर येतो. आयुर्वेदातही भोकराचा उल्लेख आढळतो. आदिवासी लोक भोकराच्या झाडाची पाने चवीने खातात. विशेष म्हणजे भोकराचे झाडात औषधी गुण आढळतात. भोकर हे शक्तीवर्धन फळ मानले जाते. भोकराच्या झाडाची सुकलेली साल आणि कापूर यांचे मिश्रण करून सुजलेल्या भागावर मालिश केल्याने आराम मिळतो. भोकराच्या बिया बारीक करून गजकरण झालेल्या जागेवर लावल्याने त्वरीत आराम मिळतो. भोकराच्या झाडाच्या साल उकळून त्याचा काढा नियमित घेतल्याने गळ्याचे सर्व आजार बरे होतात. भोकराच्या झाडाची पाने वाटून त्याचा रस पिल्याने अतिसार तसेच कावीळ सारखे आजार बरे होतात. भोकराच्या झाडाची साल (२०० ग्रॅम) पाण्यात उकळून घ्यावी. पाणी कोमट झाल्यानंतर गुळण्या कराव्या. दांत आणि हिरड्यांचे आजार बरे होतात.भोकरच्या झाडांच्या पानांचा रस अनेक आजारांवर रामबाण औषध आहे. भोकराच्या सालीचा काढा प्यायल्याने महिलांच्या मासिक पाळीच्याही समस्या दूर होतात.

भोकराचे औषधी गुणधर्म
फळे स्नेहन व संग्राहक आहेत. भोकराचे फळ कृमिनाशक, कफोत्सारक व खोकल्यापासून आराम देणारे आहे. फळ मूत्रवर्धक व सारक गुणधर्माचे आहे. कोरडा खोकला, छाती व मूत्रनलिकेचे रोग, पित्तप्रकोप, दीर्घकालीन ताप, तहान कमी करणे, मूत्र जळजळ, जखम व व्रण भरण्यासाठी भोकरीचे फळ उपयुक्त आहे. सांधेदुखी, घशाची जळजळ यासाठीही भोकरीचे फळ उपयोगी आहे. फळे शोथशामक असल्याने खोकला, छातीचे रोग, गर्भाशय व मूत्रमार्गाचे रोग तसेच प्लिहेच्या रोगात भोकरीची फळे वापरतात. भोकरीची साल संग्राहक व पौष्टिक आहे. भोकरीची साल स्तंभक असल्याने फुफ्फुसांच्या सर्व रोगात उपयुक्त आहे. साल फांटाच्या रूपात गुळण्या करण्यासाठी वापरतात. सालीचा रस खोबरेल तेलाबरोबर आतड्याच्या व पोटाच्या दुखण्यावर उपयुक्त आहे. साल सौम्य शक्तिवर्धक म्हणून उपयोगी आहे. सालीचे चूर्ण बाह्य उपाय म्हणून खाजेवर व त्वचारोगांवर वापरतात. सालीचा काढा जीर्णज्वरात आणि पुष्टी येण्यास देतात. कफ ढिला होण्यास, लघवीची आग कमी होण्यास व अतिसारात फळांचा काढा देतात. यामुळे आतड्यास जोम येतो. भोकराच्या सालीची राख तेलात खलून व्रण लवकर भरून येण्यासाठी लावतात. पिकलेले भोकर फळ, अडूळसा पाने व बेहडा फळे समप्रमाणात घेऊन काढा करून खोकल्यावर देतात. अतिसारावर भोकरीची साल पाण्यात उगाळून देतात. मोडशीवर भोकरीची साल हरभऱ्यांच्या आंबीत उगाळून द्यावी. भोकरीची पाने व्रण व डोकेदुखीवर उपयुक्त आहेत. भोकराच्या भाजीचे औषधी गुणधर्म भोकराच्या फळांची भाजी करतात व लोणचे बनवितात. भोकराच्या कोवळ्या पानांचीही भाजी करतात. भोकराच्या फळांच्या भाजीचा उपयोग अतिसारात होतो. या भाजीमुळे आतड्याची ताकद वाढते व पुष्टी येते. भोकराच्या फळांचे लोणचे खूप चविष्ट असून, हे राजस्थान, गुजरात व महाराष्ट्रात अगदी प्रसिद्ध आहे. भोकराचे लोणचे अग्निवर्धक, भूक वाढविण्यास व पचनासाठी चांगले आहे. रक्तपित्तात भोकरीच्या पानांची भाजी उपयोगी आहे. रायगड भागात जास्त पिकलेली भोकरे, कोंडा आणि गूळ वापरून एक केक करतात. हे मिश्रण रात्रभर मातीच्या तवलीत(भांडे) घालून मंद आचेवर ठेवतात. सकाळी याचा केक तयार होतो. कोकणात उन्हाळी वाळवणात ताकात भोकरं भिजवून नंतर वाळवून ठेवतात. सणासुदीला तळणीच्या पदार्थांमध्ये याचाही समावेश असतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

काही भोकरा पासून बनवलेले पदार्थ
भोकराचे सरबत
साहित्य:- तयार भोकराचा गर, लिंबू, मीठ व साखर, पाणी.
कृती:- भोकराचा गर, लिंबू, मीठ व साखर, पाणी ह्या सर्व गोष्टी एकत्र करून फ्रीज मध्ये ठेवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

भोकराच्या पानांची भाजी
साहित्य:- भोकराची कोवळी पाने, भिजवलेली मूगडाळ, हिरव्या मिरच्या, कांदा, तेल, हळद, मीठ.
कृती:- भोकराची कोवळी पाने निवडून, स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. पानांचे देठ काढून टाकावेत व पाने बारीक चिरून घ्यावीत. तेलात चिरलेला कांदा व मिरच्या परतून तांबूस होईपर्यंत तळून-भाजून घ्यावे. नंतर चिरलेली भाजी व भिजवलेली मूगडाळ घालावी. नंतर हळद, मीठ घालून सर्व भाजी चांगली परतून घेऊन अगदी थोडे पाणी घालून शिजवून घ्यावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

भोकराच्या फळांची भाजी
साहित्य:- भोकरीची हिरवी कच्ची फळे, तीळ, खसखस, ओले खोबरे, आले, लसूण, तेल, तिखट, मीठ, हळद, कांदा इत्यादी.
कृती:- भोकराची कोवळी फळे धुऊन चिरावीत. बिया काढून टाकाव्यात व परत फळे चिरून घ्यावीत. तीळ, खसखस थोडे भाजावेत. ओले खोबरे किसून घ्यावे. नंतर तीळ, खसखस, खोबरे, लसूण, आले मिक्सचरमध्ये बारीक करून ओला मसाला तयार करावा. तेलात चिरलेला कांदा भाजून घ्यावा व त्यात चिरलेली फळे घालावीत. हळद, तिखट, मीठ घालून भाजी परतून घ्यावी व नंतर ओला मसाला घालून परतावी. नंतर भाजी शिजवून घ्यावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

भोकराच्या फळांचे लोणचे प्रकार एक
साहित्य:- भोकराची हिरवी कच्ची फळे, तेल, मिरेपूड, मोहरी डाळ, मिरची पावडर, मीठ, हिंग, हळद, मेथी पावडर, लोणच्याचा मसाला इत्यादी.
कृती:- भोकराची कोवळी फळे धुऊन चिरावीत व त्यातील बिया काढून टाकाव्यात व परत फळांच्या (गरजेप्रमाणे) फोडी कराव्यात. काही ठिकाणी फळे न चिरता अखंड फळे लोणच्यासाठी वापरतात. नंतर फोडींना मीठ लावून चोळावे. तेल गरम करून त्यात मोहरी डाळ, मिरची पावडर, मिरेपूड, हिंग पावडर, मेथी पावडर, हळद टाकून फोडणी करावी. फोडणी थंड झाल्यानंतर मीठ लावलेल्या फोडींवर ओतावे व सर्व मिश्रण चांगले मिसळून घ्यावे. आवश्‍यकता असल्यास लोणच्याचा मसाला घालावा. नंतर हे सर्व बरणीत भरावे व झाकण बंद करून काही दिवस ठेवावे व नंतर लोणच्याचा वापर करावा
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

भोकराचे लोणचे प्रकार दोन
साहित्य:- कच्ची भोकरे एक किलो, कैरीच्या सालासकट फोडी अर्धा किलो, एक वाटी मेथीचा जाडसर रवा, तीन चे चार चमचे हिंग, अर्धी वाटी मोहरीची डाळ, चार चमचे हळद, एक वाटी लाल तिखट, तेल.
कृती:- भोकरे जरा ठेचून, त्यांना मीठ लावून, त्यांतील बिया व चिकट पदार्थ असतो, तो काढून टाकावा. मीठ लावल्याने चिकटपणा कमी होतो. कैरीच्या सालीसकट फोडी कराव्या. मेथीचा रवा तेलात बदामी रंगावर करून घ्यावा व मग त्या तेलात हिंग, मोहरी व हळद घालून, फोडणी करून, ती गार झाल्यावर त्यात लाल तिखट, मीठ, मोहरीची डाळ व वरीलप्रमाणे तयार केलेला मेथीचा रवा घालून एकत्र कालवावे. हे मिश्रण भरल्या वांग्याप्रमाणे भोकरात भरावे. नंतर भरलेली भोकरे व कैरीच्या फोडी एकत्र करून, बरणीत भरून, त्यावर लोणचे चांगले बुडेपर्यंत तेल घालून ठेवावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

2 Comments on आजचा विषय भोकर

Leave a Reply

Your email address will not be published.


*