आजचा विषय कडधान्य भाग २

मोड आलेले मूग आणि चणे खाल्ल्यामुळे पचन संस्थाही चांगली होते. यामध्ये असलेल्या प्रोटीनमुळे शरीर चांगलं काम करतं. मोड आलेले मूग आणि चण्यांमुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही कमी होतात.

या कडधान्यांचे एवढे फायदे असले तरी अनेकांना ती नुसती खायला आवडत नाहीत. त्यामुळे त्याला सलाड बनवूनही तुम्ही खाऊ शकता. पण लक्षात ठेवा मोड आलेल्या या कडधान्यांना उकडलं किंवा तळलं तर त्यामधली पोषक तत्त्व निघून जातात. त्यामुळे ही कडधान्य उकडून सलाडसारखीच खा.

या कडधान्यांना तुम्ही टोमॅटो, कांदा आणि काकडीबरोबरही खाऊ शकता. तसंच त्यामध्ये गरजेनुसार मीठ आणि चाट मसाला टाकून तुम्ही त्याला आणखी भेळे सारखे चविष्ट बनवू शकता.

कडधान्यांना मोड आणण्यासाठी ती रात्री भरपूर पाणी घालून भिजत ठेवावीत. सकाळी निथळून घेऊन भाजी धुण्याच्या रोळीत ठेवून बहुतेक कडधान्यांना 24 ते 36 तासांत चांगले मोड येतात. हिवाळ्यात थोडे उशिरा तर उन्हाळ्यात मोड लवकर येतात. काही कडधान्ये तर फक्त 7-8 तास पाण्यात भिजत ठेवून नंतर मोडाशिवाय वापरली जातात. छोले, राजमा, वाटाणा बहुधा मोडाशिवाय वापरले जातात.

आपण नियमितपणे कडधान्यांच्या उसळी करतो. कधी आमटीही करतो. मटकी, मूग ही कडधान्ये वापरून केलेली कोल्हापुरी मिसळ वा पुणेरी दहीमिसळ खूप लोकप्रिय आहे. पांढऱ्या वाटाण्याचा रगडाही सर्वांना आवडतो. कडधान्यांची भेळ, कडधान्ये घालून सॅलड्‌सही आता बनवली जातात.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

काही कृती कडधान्यांची
कडधान्याचे पॅटिस
साहित्य :- एक वाटी मोड आलेली कडधान्ये (मूग, मटकी, मसूर, चवळी आवडीनुसार), सहा उकडलेले बटाटे, बारीक चिरलेला कांदा एक वाटी, दोन चमचे हिरवी मिरची-आले पेस्ट, दोन चमचे कॉर्नफ्लोअर, फोडणीचे साहित्य, मीठ, साखर, लिंबूरस चवीनुसार, तेल.
सारणाची कृती :- कडधान्ये वाफवून घ्या. फोडणी करून त्यात कांदा परता. त्यामध्ये मीठ, साखर, कडधान्ये घालून परतून घ्या. वाफ आली, की कडधान्ये गॅसवरून खाली उतरवून थोडी ठेचून घ्या. लिंबू पिळा.
पारीची कृती :- उकडलेल्या बटाट्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोअर व थोडे मीठ घालून मळा आणि गोळा तयार करा. या मिश्रणातून छोटा भाग घेऊन पारी तयार करा. त्यामध्ये उसळ भरा. पारीचे तोंड बंद करून तळहातावर दाबून तिला चपटा गोल आकार द्या. वर तांदळाचे पीठ भुरभुरून तळा व गरमागरम सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

मिक्स कडधान्याचे धिरडे
साहित्य: १ वाटी वरपर्यंत भरून मिश्र कडधान्य (मूग, मटकी, काबुली चणे, मसूर, उडीद, चवळी आणि हिरवे वाटाणे) ३ ते ४ हिरव्या मिरच्या किंवा चवीनुसार १ चमचा जिरे १/४ वाटी तेल १/४ वाटी कोथिंबीर, बारीक चिरून चवीपुरते मीठ
कृती: सर्व कडधान्ये एकत्र करून पाण्यात ८ ते १० तास भिजवावीत. कडधान्ये नीट भिजली की त्यातील न भिजलेली, कडक राहिलेली कडधान्ये वेचून काढून टाकावीत. स्वच्छ केलेली कडधान्ये कापडात बांधून मोड यायला उबदार जागी ठेवावी. ७ ते १० तासांनी मोड येतील. मोड आले की मिक्सरमध्ये कडधान्ये, मिरच्या, मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून किंचित भरडसर राहील असे फिरवावे. इडली पिठाएवढे घट्ट असावे. चिरलेली कोथिंबीर, जिरे आणि मीठ घालावे. नॉन-स्टिक तवा गरम करून त्यावर थोडेसे तेल घालावे. डावभर पीठ घालून ते जमेल तेवढे पातळ पसरवावे. आच मध्यम ठेवावी. झाकण ठेवून २-३ मिनिटे वाफ काढावी. नंतर झाकण काढून धिरडय़ाच्या कडेने तेल सोडावे. बाजू पालटून दुसरी बाजूही नीट शिजू द्यावी. टोमॅटो केचप किंवा आवडीचे तोंडी लावणे घेऊन गरमच खावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

मिक्स बिन्स बर्गर
साहित्य :-
बर्गर :- २ वाटय़ा शिजवलेला राजमा, १ वाटी शिजवलेले ब्लाक बिन्स, १ मोठा उकडलेला बटाटा
२ पाव स्लाईस, बर्गर ब्रेड , लेटूसची पाने, हिरवी मिरची, धणेपूड, एक छोटा तुकडा आलं किसून, जिरेपूड, चाट मसाला, मीठ चवीप्रमाणे
चिंचेची चटणी : चिंचेचा कोळ ६ चमचे, गूळ ३ चमचे, ३-४ खजूर बिया काढून, लाल मिरची १ टीस्पून किंवा आवडीप्रमाणे, मीठ चवीप्रमाणे.
चिंचेची चटणी कृती :- चिंचेचा कोळ, गूळ, लाल मिरची, ३-४ खजूर बिया काढून, मीठ एकत्र करा आणि थोडे पाणी घालून मिक्सरवर वाटून घ्या.
कृती:- एका बाउलमध्ये शिजवलेला राजमा, शिजवलेले ब्लाक बिन्स, उकडलेला बटाटा घेऊन एकत्र करावे. त्यात लागेल तसे पावचे स्लाईस कुस्करून घ्यावे.
त्यात आवडीप्रमाणे हिरवी मिरची, एक छोटा तुकडा आलं किसून, धणेपूड, जिरेपूड, चाट मसाला घाला. चवीप्रमाणे मीठ घालून नीट मळून घ्या. या गोळ्याचे चपटे गोल आकाराचे बर्गर करून घ्या.
तवा गरम करावा. तव्यावर तेल घालून बर्गर शालो फ्राय करा. आता बर्गर ब्रेडवर एका बाजूला चिंचेची चटणी लावा. त्यावर लेटूसचे एक पान ठेवा, त्यावर बर्गर ठेवा. त्यावर टॉमेटोची एक चकती, एक कांद्याची चकती ठेवा. वर अजून थोडी चिंचेची चटणी लावा आणि उरलेला बर्गर स्लाईस त्यावर ठेवून बर्गर बंद करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

मटकीची आमटी
साहित्य :- एक वाटी मोडाची मटकी, एक कांदा, चार हिरव्या मिरच्या, ८-१० लसूण पाकळ्या, एक चमचा धने, जिरेपूड, एक चमचा काळा मसाला, दोन आमसूले, गूळ, तेल, मीठ.
कृती :- कांदा बारीक चिरावा. एक चमचा तेलावर मटकी, लसूण, हिरव्या मिरच्या, कांदा, थोडी कोथिंबीर घालून परतावे. थंड झाल्यावर मिक्सळरमधून जाडसर वाटावे. कढईमध्ये दोन चमचे तेलाची मोहरी, जिरे, हळद, कढीलिंब घालून फोडणी करावी. वाटलेली मटकी घालून थोडे परतावे. चार वाट्या पाणी, मीठ, आमसुले, गूळ, धणेजिरे पूड, काळा मसाला घालावा. चांगले उकळावे. आमटीत मिळून येण्यासाठी एक चमचा हरभरा डाळीचे पीठ थोड्या पाण्यात मिसळून आमटीत घालावे. खमंग, चटकदार आमटी भात, भाकरीबरोबर वाढावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

फ्रूट, स्प्राऊटेड, पनीर सॅलड
साहित्यः पाव बाउल मोड आलेले मूग-मटकी-चणे-राजमा, एक चमचा उकडलेले दाणे, मीठ, मिरपूड, साखर, एक पेर, एक सफरचंद, एक संत्र, एक काकडी.
कृतीः मोड आलेली कडधान्ये वाफवून घ्या. फळांचे तुकडे करून त्यावर एक चमचा लिंबूरस घालून हलक्याम हाताने हलवून ठेवा. काकडीच्या पातळ चकत्या त्यावर घाला. दोन-तीन चमचे घट्ट दही घेऊन मीठ, साखर, मिरपूड चवीप्रमाणे घाला. दह्यात वरील फळे, कडधान्ये घाला. हवे असल्यास आले किसून घाला. त्यात पनीर बारीक चिरून घाला. त्यावर उकडलेले दाणे व पुदिन्याची तीन-चार पाने बारीक चिरून घाला. लिंबू पिळून खायला द्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

मोड आलेल्या मुगाची उसळ
साहित्य :- मुग १ वाटी, ३ वाट्या पाणी, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमाटो, अर्धा चमचा तिखट,. धणे जिरे पूड प्रत्येकी १ चमचा
गोडा मसाला २ चमचे, अर्धा चमचा हळद,आलं लसूण किसून प्रत्येकी अर्धा चमचा, फोडणीसाठी तेल, कढीपत्ता ७ ते ८ पानं, मीठ चवीनुसार
कृती :- अख्खे मुग ३ पाण्यात भिजत घालावेत. रात्रभर मुग भिजले की सकाळी त्यातील पाणी निथळून हे मुग एका पातळ कपड्यात हलक्या हाताने बांधून ठेवावेत. खूप घट्ट बंधू नयेत. हे बांधलेले मुग एका पातेल्यात ठेवून वरून झाकावेत व उबदार जागी ठेवावेत. उन्हाळ्याच्या दिवसात कुठल्याही कडधान्याला मोड लवकर येतात. हिवाळ्यामध्ये मोड यायला साधारणपणे दीड दिवस लागतो. मुगाला मोड आले की अगदी जेवढे मुग तेवढेच पाणी घेऊन कुकर मध्ये शिजवून घ्यावेत. मुग शिजले की एका कढईमध्ये ३ ते ४ चमचे तेल घेऊन ते तापले की त्यात मोहरी, हिंग व कढीपत्ता घालावा. कढीपत्ता तडतडला की त्यात चिरलेला कांदा व आलं लसूण घालावे. कांदा मऊ होईपर्यंत परतावे. मग त्यात हळद, तिखट, धणे जिरे पूड, गोडा मसाला हे सर्व घालून मिनिटभर परतावे. मग चिरलेला टोमाटो घालावा. तो मऊ झाला की त्यात मोड आलेले शिजलेले मुग घालावेत. ही उसळ पातळ फावी असेल तर थोडे पाणी व चवीनुसार मीठ घालून छान उकळी आणावी. कोथिंबीर घालून छान सजवावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

व्हिटॅमिन भेळ
साहित्य – १०० ग्रॅम मोड आलेले मूग, १०० ग्रॅम मोड आलेले हरभरे, १०० ग्रॅम मोड आलेली मटकी, २ गाजर, ८-१० फ्रेंचबिन्स, २ बटाटे, ४ मोठे टोमॅटो, २ काकड्या, २ कांदे, बारीक शेव आणि कोथिंबीर.
हिरवी चटणी – ८-१० हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, १ वाटी डाळ्या, १ वाटी पुदिन्याची पानं, मीठ आणि साखर हे मिक्सरमध्ये बारीक वाटावं.
कृती – सर्व कडधान्यं थोडं मीठ घालून वेगवेगळं वाफवून घ्यावं. गाजर, फ्रेंचबिन्स, बटाटे वाफवून घ्यावे. टोमॅटो-कांदे-काकडी-कोथिंबीर बारीक चिरून घ्यावेत. डिशमध्ये आधी उसळी, भाज्या, हिरवी चटणी क्रमानं घालावी. बटाट्याच्या फोडी घालून कांदा-काकडी-टोमॅटोचे काप पेरावे. बारीक शेव आणि थोडा चाट मसाला पेरून ही भेळ लगेच खाण्यास द्यावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

हुलगा उसळ
साहित्य : मोड आलेला हुलगा २ वाटया, कांदा कापलेला १ छोटा, सुके खोबरे वाटून २ मोठे चमचे, लाल तिखट, मीठ, गुळ चवीप्रमाणे, नेहमी भाज्यांसाठी वापरतो तो मसाला दीड चमचा, तेल २ छोटे चमचे, फोडणीचे साहित्य.
कृती : मोड आलेला हुलगा थोडेसे पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्या. कढईत फोडणी तयार करून त्यात कांदा, वाटलेले खोबरे हे सर्व परतून घ्या. नंतर उकडलेला हुलगा घालून परत. मसाला तिखट, मीठ, गुळ चवीप्रमाणे घालून चांगली उकळी आल्यानंतर बंद करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

डाळींबी भात
साहित्य:- १/२ कप मोड आलेले व सोललेले वाल, कप तांदुळ(स्वच्छ धुतलेले), ४ हिरव्या मिरच्या+४ लसुण पाकळ्या ठेचुन, १ १/२ टीस्पून गोडा मसाला, १ १/२ टीस्पून धने पुड
१ टीस्पून जिरे पुड, २ टेबलस्पून गुळ, ३/४ कप नारळाचे दुध, १ १/४ कप पाणी, चवीनुसार मीठ, चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी
फोडणीसाठी साहित्य :- २ टेबलस्पून तेल, कढीपत्ता, १/४ टीस्पून मोहरी, १/४ टीस्पून जिरे, १/४ टीस्पून हळद,.
कृती:- कुकर मध्ये तेल गरम करून फोडणी करा. फोडणीत मोड आलेले वाल, मिर्ची व लसणीचा ठेचा घाला. एक वाफ आणा. नंतर त्यात तांदुळ घाला आणि परता. मग त्याचात धने-जीरे पुड, गोडा मसाला, मीठ, नारळाचे दुध आणि पाणी हे सर्व साहित्य घाला. एक उकळी आली की कुकरचे झाकण लावुन २ शिट्ट्या द्या आणि नंतर मंद आचेवर भात शिजू द्यावा. ५-७ मिनिटांनी आच बंद करावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*