मनुका/ बेदाणे

सुक्या मेव्यातील एक महत्त्वाचा स्वस्त घटक म्हणजे मनुका. मनुका मधुर रसाच्या असल्याने उत्तम असतातच. त्या पचायला सोप्या असतात. मनुका शीतवीर्य व त्रिदोषशामक असतात. लहानपणी पोट खराब झाले असता पाण्यात मनुका उकळवून ते पाणी प्यायल्याचे व उरलेल्या मनुका चावून चावून खाल्ल्याचे स्मरणात आहे. ताप येणे, हिमोग्लोबिन कमी होणे, ताकद कमी होणे या सर्वांसाठी मनुका उपयोगी असतात. मनुकांमधल्या बिया काढून त्यापासून धात्री रसायनासारखी औषधे आयुर्वेदात बनविली जातात. घरातील प्रत्येकाला बदाम, पिस्ते, काजू असा सुका मेवा हातावर ठेवणे सगळ्यांना परवडते असे नाही, पण लहान मुलांचा अबरचबर देण्याऐवजी त्यांच्या हातावर चार मनुका ठेवल्या जाणे चांगले. शौचाला साफ होत नसेल तर मनुका तुपावर भाजून काळे मीठ लावून खाल्ल्या तर इतर कोणताही त्रास न होता शौचाला साफ होण्यास मदत मिळते.

पायाची, शरीराची आग होत असेल तर मनुका व खडीसाखर एकत्र करून खाल्ल्याचा उपयोग होतो. म्हणूनच प्रसादामध्ये मनुका व खडीसाखर यांचा उपयोग केलेला दिसतो. मोठ्या आजारातून उठल्यामुळे अशक्तपपणा जाणवत असल्यास मनुका अवश्यो खाव्यात. जागरण करणाऱ्यांनी मनुका अवश्यू खाव्यात, जेणेकरून डोळ्यांची आग होत नाही. पित्त वाढल्यामुळे उलट्या होत असल्यास मनुका व साळीच्या लाह्या पाण्यात भिजवून कुस्कराव्या व पाणी गाळून घ्यावे. या पाण्यात थोडी खडीसाखर टाकून थोडे थोडे घेतल्यास फायदा होतो. मोठ्या आजारातून उठलेल्याला, वारंवार जागरण होत असणाऱ्यांना, अन्न नीट पचत नसल्यास, अंगात कडकी असल्यास मनुका उत्तम काम करतात. गोवर, कांजिण्या येऊन गेल्यावर अंगात उष्णता राहते, अशा वेळी मनुका-तूप खाण्याने फायदा होतो.

बेदाण्यांचा उपयोग द्राक्षासारखाच होतो. प्रसादाचा शिरा, पुलाव वगैरे पदार्थांमध्ये बेदाणे वापरण्याची पद्धत आहे. कारण ते निर्बीज असल्यामुळे स्वयंपाकात वापरायला बरे पडतात. बेदाण्यांच्या गोडव्यामुळे या पदार्थांची लज्जत आणखीनच वाढते. काविळ झालेल्या लहान मुलांना काळ्या मनुक्याचं पाणी आणि प्रौढ व्यक्तींना पाण्यात भिजवलेले काळे मनुके खाण्यास द्यावेत. बध्दकोष्ठ – रात्री झोपतांना एक कप दुधांत उकळलेले एक अंजीर व बिया काढलेले दोन मनुके चांगले चावून खावे. नंतर ते दुध सुद्धा प्यावे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*