भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ७ – मौल्यवान ग्रंथसंपदा

भारतीय खाद्यसंस्कृती या विषयावर डॉ. वर्षा जोशी यांनी “मराठीसृष्टी”च्या दिवाळी अंकात लिहिलेला प्रदिर्घ लेख क्रमश: स्वरुपात प्रकाशित करत आहोत.


बुद्ध आणि जैन कालात कमी झालेलं मांसाहाराचं महत्व सुंग कालात पुन्हा वाढलं. सातवाहन आणि पल्लवांसारखे हिंदू राजे मांसभक्षण करीत होते. चरकसंहिता आणि सुश्रूतसंहिते सारखे ग्रंथ त्या काळात निर्माण झाले. जवळ जवळ चाळीस प्रकारचा तांदूळ, साठ प्रकारची फळे, ज्यात बदामासारख्या सुक्या फळांचा समावेश होता, आणि एकशेवीस पेक्षा जास्त प्रकारच्या भाज्या त्यावेळी भारतात वापरल्या जात होत्या. वेगवेगळया भागांतील लोकांनी वेगवेगळया ऋतूंमधे कोणत्या गोष्टी भक्षण कराव्यात याचं शास्त्रशुद्ध विवेचन ग्रंथात होतं. अनेक नवीन पदार्थांच्या कृती दिलेल्या होत्या. मांसांचं सूप
आरोग्याला उत्तम असल्याचं आणि दारू योग्य प्रमाणात घेतल्यास आरोग्याला उत्तम असल्याचं चरक संहितेत सांगितलं होतं. फळांच्या रसापासून बनवलेले पदार्थ आणि तर्‍हेतर्‍हेची मिठाई यांच्या कृती दिलेल्या होत्या. कुशाण काळात ग्रीस, इटलीसारख्या देशांबरोबर भारताच्या असलेल्या व्यापारामुळे देशात सर्व प्रकारची समृद्धी होती त्याचाच हा परिणाम असावा.

उच्चभ्रु लोकांची मेजवानी म्हणजे तेव्हांही मोठा समारंभ असे. ज्या क्रमाने पदार्थ वाढले जाणार तो क्रम ठरलेला असे. कश्यपसंहितेतील नोंदीप्रमाणे मेजवानीच्या वेळी मधून संगीत वाजवले जाई. आताच्या काळातही हे केलं जातंच. पान खाणे आणि सुवासिक पदार्थांनी युक्त सिगार ओढणे या गोष्टी या समाजात नेहमीच्या होत्या. सुश्रुतसंहितेतही मांसाच्या वेगवेगळया पाककृती दिलेल्या आहेत. खरं तर स्वयंपाकावरचंच ते एक पुस्तक आहे असं म्हणायला हरकत नाही. चरकसंहिता हे देखील पाककृतींवरचं पुस्तक आहे असंच म्हणावं लागेल. उदाहरणादाखल त्यावेळच्या काही पदार्थांकडे पाहू. गव्हाचं पीठ (रवा) तुपात भाजून त्यात दूध व साखर घालून आपल्या शिर्‍यासारखा ‘साम्यव’ नावाचा पदार्थ केला जाई. त्यात वेलची, मिरी आणि सुंठ घातली जाई. त्यात खवलेला नारळ घातला की घृतपुरा नावाचा पदार्थ तयार होई. तांदूळ आणि गव्हाचं पीठ वापरून त्या पारीत मध भरून तो गोळा तुपात तळत. याला पुपलिका म्हणत. तांदूळाचं पीठ, तूप आणि साखरेचा पाक वापरून उल्कलिका आणि नर्टिका नावाच्या मिठाया बनवल्या जात.

या दोन्ही ग्रंथांमधे अन्नाचा विविध रोगांवर आणि आरोग्यावर होणारा परिणाम या विषयावर विवेचन केलेले आहे. यानंतर सातव्या शतकात अन्नपदार्थ आणि त्याचे आरोग्याला असणारे औषधी उपयोग यावर वाङ्भटाने लिहिलेले दोन ग्रंथ ‘अष्टांगहृदयसंहिता ‘आणि ‘अष्टांगसंग्रह’ हे विशेष महत्वाचे आहेत कारण ते पूर्णपणे विज्ञानाधिष्ठित आहेत. सातव्या किंवा आठव्या शतकात नागार्जुन या दक्षिणेकडील बौद्ध भिक्षू आणि वैद्याने लिहिलेल्या ‘रसरत्नाकर’ या ग्रंथात आरोग्यासाठी असलेले धातूंचे महत्व सांगितलेले आहे. एकूणच त्या काळात अन्नपदार्थांच्या कृती आणि त्यांच्या औषधी उपयोगांसंबंधी संपूर्णपणे विज्ञानाधिष्टित विचार होऊन आयुर्वेदासारखं अजोड, अमोल शास्त्र उदयाला आलं आणि ती कामगिरी करणार्‍या बुद्धिमान लोकांनी अमूल्य अशी ग्रंथ निर्मिती सर्व पुढच्या पिढ्यांसाठी करून ठेवली ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे.

— डॉ. वर्षा जोशी

## भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ७

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*