दिवाळीच्या फराळातील खास मानाचा पदार्थ अनारसे

दिवाळीतील अनारसे आणि त्याचे विविध प्रकार पाहिले, की तोंडाला पाणी सुटतेच. डायबिटीस मुळे ज्यांना गोड खाण्याची बंधने आहेत, अशा लोकांचीही त्यातून सुटका होत नाही. फराळाचे पदार्थ विकत घेत असले तरी घरी तयार केलेल्या अनारस्याची चव न्यारीच.
अनारसे हा पदार्थ कधीही घाईत केला जाऊ नये. त्याकरिता तीन दिवस अगोदर तांदूळ भिजत घालावे व त्याची पिठी करावी. त्यानंतर त्यात वजनाने बरोबरीने गूळ व गरजेपुरते तूप मिसळून एकत्र कुटावे. त्याचा कणकेसारखा घट्ट गोळा करावा. हा गोळा जमल्यास आठ-दहा दिवस मुरला तरी चालतो. अनारसे करताना भिजलेल्या पिठाच्या गोळ्या करून खसखसीच्या साहाय्याने थापाव्यात. तळताना तूप प्रथम तापवून घ्यावे. चुकूनही गार तूप नको. अनारसे गुलाबी रंगाचे झाले पाहिजेत.
अनारस्याचे प्रकार
पारंपारीक अनारसा प्रकार एक
दोन वाटी तांदूळ चांगले धुऊन घ्यावेत. चार दिवस भिजत ठेवावेत व रोज पाणी बदलावे. चार दिवसांनंतर धुऊन घरात सुकवावेत व बारीक पीठ तयार करावे. त्यात दीड वाटी पिठीसाखर, आवडीनुसार वेलदोडा पावडर घालावी. पीठ एकजीव करून ठेवावे. पीठ आपोआप ओलसर होते. दुसऱ्या दिवशी अर्धा चमचा मलई घालून मळून ठेवावे (हे पीठ एका महिनाभर टिकते. फ्रिजमध्ये ठेवू नये). अनारसे करताना पीठ घट्ट वाटत असेल तर थोडी मलई घालून करता येईल. तुपात, तव्यावर तळावे, कढईत तळू नये. अनारसे तयार करताना पेपरवर खसखस लावून बोटीच्या आकाराच्या तयार करायच्या. पुरीसारखा लाटायचा नाही. आपण काजू बदाम लावून करू शकता. हे पीठ बाहेर चांगले टिकते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

पारंपारीक अनारसा प्रकार दोन
साहित्य- पाव कि. तांदूळ, पाव कि. गूळ, साजूक तूप, खसखस, तळणीसाठी रिफाइंड तेल.
कृती- शक्यतो जुने तांदूळ घेऊन ते ३ दिवस भिजत ठेवावे. रोज त्यातील पाणी बदलावे. नंतर ते धुवून, थोडे कोरडे करून मिक्सरमधून पीठ करून घ्यावे. पीठ सपीटाच्या चाळणीने चाळून घ्यावे. पीठ किंचित ओलसर व हाताला गार लागते. नंतर त्यात गूळ घालावा. आवडीनुसार गुळाऐवजी साखर किंवा दोन्ही निम्मे निम्मे घातले तरी चालेल. दोन वाटय़ा पीठ असेल तर खायचे चार चमचे तूप त्यात घालावे. मिश्रण एकजीव करून चांगले कुटावे. गोळे करून डब्यात भरून ठेवावे. आठ-दहा दिवसांनी पीठ अनरसे करावयासाठी तयार होते. प्रत्यक्ष अनरसे करताना पीठ जास्त कोरडे वाटल्यास थोडे केळे त्यात कालवून घ्यावे. पीठ मळून पुरीसाठी घेतो तसा गोळा करून घेऊन एका प्लास्टिकच्या पिशवीला तूप लावून त्यावर तो थापावा व ती जाड पुरी खसखशीत घोळून घेऊन गरम तेलात अनरसा तळून घ्यावा. खसखस लावलेली बाजू तळताना वर ठेवावी व त्यावर झाऱ्याने तेल उडवून मंद आचेवर तळावा. तळताना तो उलटू नये.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

चॉकलेटी अनारसे
साहित्य : चार वाट्या तांदळाचे पीठ, दीड वाटी साखर, दोन चमचे चॉकलेटचा चुरा,दोन चमचे आयसिंग शुगर, अडीच वाटी तूप, एक चमचा बदाम तुकडे,एक चमचा पिस्ता तुकडे, दोन चमचे खसखस,एक चमचा वेलदोडेपूड, दोन मोठे चमचे दूध.
कृती : तांदळाचे पीठ, चॉकलेटचा चुरा, साखर व आयसिंग शुगर एकत्र करून त्यात सव्वा वाटी तूप पातळ करून घालावे. ते घट्ट भिजवून त्याचे चार,पाच गोळे करावेत. पातेल्यात पातळ फडके झाकून तीन दिवस तसेच ठेवावे. जेव्हा करायचे असेल त्या वेळी हे गोळे फोडून त्यात दूध घालून मळावे व त्याचे लहान लहान गोळे करावेत. या गोळ्याला बोटाने खड्डा करून त्यात थोडीसी वेलची पूड, खसखस व बदाम-पिस्त्याचा एकेक तुकडा भरावा. गोळ्याचे तोंड बंद करून हातावर अनारसा थापावा व तुपात मंद आचेवर गुलाबी रंगावर तळावे. गार झाल्यावर प्लेटमध्ये सजवताना अनारशांवर चॉकलेटचा चुरा व सुक्‍या मेव्याचे तुकडे परावेत, चॉकलेटच्या चवीचे हे अनारसे लहान मुलांना फारच आवडतील.
टीप : चॉकलेट शक्‍यतो कॅडबरीचे वापरावे.
चुरा करण्यासाठी चॉकलेट किसून घ्यावे.
अनारसे करताना गोळे फोडून दूध, गुलाबपाणी यांपैकी कशाचाही वापर करावा.
अनारशांचे गोळे तीन दिवसांत वापरावेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

नाचणीचे अनारसे
कृती : प्रथम नाचणी तीन दिवस भिजत घालावी. त्यातील पाणी रोज बदलावे. तिसऱ्या दिवशी पाण्यातून काढून निथळत ठेवावी. नंतर थोडा वेळ एक तासभर पसरवून सुकवावी. नंतर मिक्‍सरमधून बारीक पीठ तयार करावे. ते चाळून घ्यावे. आवडीप्रमाणे त्यात गूळ किसून कालवावा. थोडी विलायची व चिमूटभर मीठ घालून गोळा तयार करावा. तो एक दिवस तसाच ठेवून (फ्रिजमध्ये नाही) दुसऱ्या दिवशी अनारसे करावेत. हे अनारसे अगदी खुसखुशीत होतात. ते अतिशय रुचकर व पौष्टिकही आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

बेक अनारसे
साहित्य : दोन वाटी मैदा, दीड वाटी तूप (डालडाही चालेल), दोन वाट्या पिठीसाखर, एक वाटी खोबरा किस, पाऊण चमचा विलायची, खसखस, बदाम, काजू, बेदाणे, टुटी-फ्रुटी सजवण्यासाठी.
कृती : तूप गरम करून घ्यावे. त्यात मैदा, साखर, किस व विलायची पावड टाकून एकजीव करावे. नंतर अॅल्युमिनियमच्या भांड्यात खसखस टाकून छोटा गोळा घेऊन थापावे. नंतर बदाम, काजू लावून सजावट करावी. ओव्हनमध्ये ठेवून “बेक’ करावा. ओव्हन नसल्यास तव्यावर वाळू ठेवून त्यावर भांडे ठेवावे, भांड्यावर झाकण ठेवावे. खरपूस भाजून घ्यावे. हे अनारसे वेगवेगळ्या आकारात करता येतात. भरपूर दिवस टिकतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*