आजचा विषय चवळी

चवळीचे दोन प्रकार असतात. वेलीची चवळी आणि रोपाची चवळी. रोपाची चवळी ‘तांदूळजा’ किंवा ‘तण्डुलीया’ या नावाने ही भाजी ओळखली जाते. भाजी पचायला हलकी, थंड गुणधर्माची असते. ही भाजी खाल्ली असता भूक वाढते. शरीरात निर्माण होणारी विषद्रव्यं म्हणजे ‘टॉक्सिन’ शरीराबाहेर टाकण्यासाठी चवळीचा उपयोग केला जातो. मासिक पाळीचा त्रास असणा-या स्त्रियांनी पावसाळयात चवळीच्या भाजीचा जेवणात समावेश करावा. या त्रासात भाजीचा रस पिण्यासाठी घ्यावा. या भाजीमुळे लघवीस भरपूर होतं. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. वेलीच्या चवळीच्या टोकांना कोकणात ‘बोके’ म्हणतात. या टोकांचीही भाजी केली जाते. तंतुमय अशा सारक भाजीची चव काहीशी तुरट असते. चायनीज स्पिनच, काऊ-पी, चवळी किंवा चवळीची पानं आणि अमरनाथ लिव्हज अशा विविध नावांनी चवळीची भाजी ओळखली जाते. काबरेहायड्रेट्स, प्रथिनं, जीवनसत्त्व के, बी ६, अ आणि क यांचा भरपूर साठा असतो. त्यामुळे शरीराला आवश्यक असणारी नैसर्गिक ऊर्जा या भाजीतून मिळते. मँगनीज, लोह, तांबं, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि फॉस्फरस असल्यामुळे शरीराला आवश्यक असणा-या खनिजांचा साठय़ाचं प्रमाण योग्य राखण्यास मदत होते. फायबरचं प्रमाण उच्च असल्यामुळे पाचकशक्ती सुधारते. बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी या भाजीचं आवर्जून सेवन करावं. ही भाजी वजन कमी करण्यास मदत करते. कारण यात असलेलं प्रोटिन रक्तातील इन्शुलिनची पातळी कमी करण्यास मदत करते. तसंच शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे अतिरिक्त वाढलेली चरबी कमी करण्यात मदत करते. लालसर पानं असलेली चवळी रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी वाढवण्याचं काम करते.अतिसारामुळे बेझार असलेल्या रुग्णांना ताज्या चवळीच्या पानांचा रस प्यायला दिल्याने आराम पडतो. चवळीच्या शेंगांमध्ये असणारा चांगल्या दर्जाचा तंतूमय पदार्थ आतड्यातील चिकटलेली घाण आणि विषजन्य पदार्थ बाहेर काढतो. आधुनिक आहारशास्त्राच्या संशोधनानुसार, चवळीच्या शेंगांमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आणि काही प्रमाणात प्रथिनंही आहेत. ताज्या पानांचा नियमित रस प्यायल्याने केस गळणे किंवा अकाली पांढरे होण्याचे प्रमाण कमी होते. कॅल्शिअमचं प्रमाण अधिक असल्याने ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारावर नियंत्रण मिळतं. म्हणूनच भरपूर प्रमाणात कॅल्शिअम मिळत असल्याने या भाजीचं आवर्जून सेवन करावं. कॅन्सरपासून बचाव करण्याची क्षमतादेखील यात असते. दोन चमचे पानं एक कप पाण्यात दहा मिनिटं उकळून त्यानंतर त्या पाण्याने गुळण्या केल्यास तोंडातील अल्सरचं किंवा घसा सुजणे यावर आराम पडतो. गरोदर महिलांनी याचं आवर्जून सेवन करावं. कारण गरोदरपणात होणारी कॅल्शिअमची झीज भरून काढते आणि बाळाची योग्य वाढ करते. प्रसूतीला त्रास होत नाही तसंच प्रसूतीनंतर मातेला भरपूर दूध येण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

चवळीची भाजी
साहित्य:- चवळीची जुडी, दोन कांदे, तिखट, मीठ, साखर चवीप्रमाणे, दोन मोठे चमचे तेल आणि फोडणीची तयारी.
कृती:- भाजी निवडून धुऊन चिरून घ्यावी. कांदे बारीक चिरून घ्यावेत. कढईत तेल घालून फोडणी करावी. मग कांदा बारीक चिरून फोडणीत परतून घ्यावा. मग त्यांत चिरलेली चवळी घालावी. चांगली वाफ आल्यावर तिखट, मीठ, चवीला साखर घालावे. परत वाफ आणून भाजी सव्‍‌र्ह करावी.कोकणात या भाजीत वाफ आल्यावर खोबरं खवून घातलं जातं.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*