भारतीय खाद्यसंस्कृती – भाग १३ – येणारा आधुनिक काळ

भारतीय खाद्यसंस्कृती या विषयावर डॉ. वर्षा जोशी यांनी “मराठीसृष्टी”च्या दिवाळी अंकात लिहिलेला प्रदिर्घ लेख क्रमश: स्वरुपात प्रकाशित करत आहोत.


आता यापुढचा जमाना तयार खाद्यपदार्थांचा आहे. लोणची – पापडच काय, डाळफ्राय, उपमा, बिर्याणीसारखे पदार्थ तयार मिळू शकतात. मायक्रोवेव्ह ओव्हनसारख्या उपकरणांनी स्वयंपाक आणखी सोपा केला आहे. एकविसावं शतक हे रिमिक्स आणि फ्युजनचं आहे. म्हणून मग स्प्रींगडोसा, नूडल्सपोहे, शेजवान वडापाव असं खाद्य आता नवीन पिढीचं खाद्य बनलं आहे. अमेरिकेतील केंटकी फ्राईड चिकन आणि मॅक्डॉनल्डस्चा बर्गर या गोष्टी छोट्यांच्या आवडत्या प्रकारांमधे मोडतात. इटालियन पिझ्झावर पनीरचं टॉपिंग घालून आपण त्याला भारतीयत्व बहाल करतोय.

हापूस आंबा, जांभूळ आणि शहाळं यांनी आईसक्रीममधे शिरकाव केलाय. आपले पदार्थही आता परदेशात खूप लोकप्रिय झाले आहेत. दूरचित्रवाणीच्या विविध वाहिन्यांवरले स्वयंपाकावरील कार्यक्रम, इंटरनेटवर मिळणारी माहिती आणि सर्वत्र उपलब्ध असणारे विविध अन्नपदार्थ व पाककृतीसंबंधीची भरपूर पुस्तके यामुळे खाद्यसंस्कृती आता एका देशापुरती मर्यादित नाही राहिली. हजारो वर्षांपासून आतापर्यंत विविध देशांमधील विविध पदार्थांना आपला साज चढवून आपण आपलंसं केलं. आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीत सामावून घेतलं. पण आरोग्याबद्दल जागरुकता निर्माण झाल्याने आपल्याला कळलंय की मसाले, मोड आलेले कडधान्ये, यांचा वापर असलेला, आपल्या संपूर्णपणे विज्ञानाधिष्टित अशा खाद्यसंस्कृतीचा वारसा सांगणारा आपला आहार हाच संतुलित आणि आरोग्याला योग्य असा आहार आहे आणि याचा सार्थ अभिमान आपण बाळगायला पाहिजे.

— डॉ. वर्षा जोशी

## भारतीय खाद्यसंस्कृती – भाग १३

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*