आजचा विषय कोनफळ

कोनफळ हे नाव ऐकलेले असले तरी हा कंद सहसा मराठी लोकांत खाल्ला जात नाही. हा कंद मुंबईत थंडीच्या महिन्यात विकायला येतो. उंधीयू चा हा एक आवश्यक घटक असल्याने, त्या भाज्या विकणार्याल लोकांकडे असतोच. याला गुजराथीमधे कंद असाच शब्द आहे. मराठीत गराडू असेही म्हणतात. बाजारात हा साधारण बटाट्याच्या आकारात विकायला येतो. जास्तीत जास्त ओंजळीएवढ्या आकारात येतो, पण याची लागवड केल्यास तो बराच मोठा होऊ शकतो. या कंदाच्या वरचा भाग पेरल्यास त्याचा वेल येतो. हा वेलही शोभिवंत असतो. चमकदार हिरवी पाने व जांभळे देठ असतात. याला खुपदा माती लागलेली असते. तसेच घेताना त्यावर फार वळ्या नाहीत असा बघून घ्यावा, म्हणजे कापायला सोपे जाते. कापल्यावर आतून हा असा सुंदर जांभळ्या रंगाचा असतो. इंग्रजीमधे जांभळ्या रंगांच्या विविध छटांसाठी वेगवेगळी नावे आहेत (पर्पल, लॅव्हेंडर, मॉव्ह वगैरे) तशी मराठीत नाहीत पण अपवाद हा. पैठणीत पण रंग असतो. या छटेला कोनफळी असेच नाव आहे. बाहेरून साधारण सुरणासारखं दिसणारं पण आतून जांभळ्या रंगाचं हे कोनफळ पौष्टिक तर आहेच शिवाय चवदार आणि पोटभरीचं आहे. कोनफळात पचनाला आवश्यक असं फायबर, क आणि ब६ जीवनसत्व, पोटॅशियम, िझक, मॅग्नेशियम आणि बिटा कॅरोटिन आहे. कोनफळाच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, रक्तदाब नियंत्रणात राहतो, कोलोस्टोरॉल कमी होण्यास मदत होते, शरीरातील इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते. कोनफळाची साल काढून किसलं तर कीस अतिशय बुळबुळीत होतो पण तो कीस शिजला किंवा कोनफळ उकडलं की बुळबुळीतपणा नावालाही राहात नाही. कोनफळ किंवा कंद या नावानं ओळखलं जाणारं कंदमूळ आहे. हे कापल्यावर किंवा उकडल्यावर जांभळ्या रंगाचं दिसतं. उकडल्यावर याचे नुसते तुकडे खायला गोडसर व रुचकर चवीचे लागतात. कोनफळातही चांगल्या दर्जाची जीवनसत्त्व, कबरेदकं, प्रथिनं व शरीरातील विषद्रव्यं खेचून बाहेर काढणारी रसायनं आहेत. उकडलेल्या कोनफळाची किसून खीर, कटलेट करतात.
या भाजीला खाज नसते. शिजवल्यावरही हा रंग तसाच राहतो. याला खास वेगळा स्वाद नसला तरी चव मात्र असते.हा उपवासाला चालतो. याचे बरेच प्रकार करता येतात. हा शिजतोही पटकन. कोनफळाचे अनेक प्रकार करता येतात, तुकडे करून तूपात परतून वर मीठ मसाला घालून खाता येते. भजी , कापं करता येतात. हिरव्या वाटाण्याच्या भाजीत याचे तुकडे छान दिसतात. उकडून लगदा करून त्यात हिरवी चटणी भरून पॅटीसही करता येतात. उंधियूची भाजी कोनफळ शिवाय पूर्ण होत नाही.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

काही कृती कोनफळाच्या

उंधियो
साहित्य. पाऊण किलो कोवळी सुरती पापडी (शिरा काढून दोन भाग करा), एक मध्यम आकाराचा कंद किंवा कोनफळ (चौकोनी मोठे तुकडे केलेले), ३-४ मध्यम रताळी ( सालं काढून मोठे तुकडे केलेले), १४-१५ लहान जांभळी वांगी (भरून करतो तशा चिरा द्या ), १४-१५ अगदी लहान बटाटे (भरून करतो तशा चिरा द्या), प्रत्येकी अर्धी वाटी तुरीचे, मटारचे आणि हरभ-याचे कोवळे दाणे, २-३ पिकलेली केळी (सालासकट मोठे तुकडे करा), अर्धी वाटी आंबेहळद आणि साधी हळद एकत्र किसून, २ वाट्या मेथी बारीक चिरून, प्रत्येकी २ टेबलस्पून धणे-जिरे पूड, २ टीस्पून तिखट, मीठ चवीनुसार, २ लिंबांचा रस, १ ते दीड वाटी तेल.
मेथी मुठियांचं साहित्य. १ मोठी जुडी मेथी, प्रत्येकी २ टीस्पून धणे-जिरे पूड, २ टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून हळद, मीठ चवीनुसार, १ टीस्पून साखर, चिमूटभर हिंग, २ वाट्या डाळीचं पीठ, तळण्यासाठी तेल
वाटण मसाला साहित्य. १ मोठी जुडी ओली लसूण पात, तेवढीच कोथिंबीर, २ इंच आलं, ८-१० कमी तिखट हिरव्या मिरच्या, २ मोठ्या लिंबांचा रस, १ नारळ खोवलेला, ३-४ टीस्पून साखर
कृती. मेथी मुठियांची कृती. मेथी धुवून बारीक चिरून घ्या. त्यात सगळे मसाले घाला. सगळं नीट मिसळून थोडा वेळ तसंच ठेवा. नंतर त्यात डाळीचं पीठ घाला. पीठ घट्ट भिजवा. भाजीच्या मिश्रणात बसेल असं प्रमाण धरून तितकं पीठ कमी-जास्त करा. हातानं बोरापेक्षा थोडे मोठे लांबट आकाराचे मुठिये करून घ्या. कडकडीत तेलात लाल रंगावर तळा. बाजूला ठेवा. मुठियांमधे पीठ कमी आणि मेथी भरपूर दिसायला हवी. मुठिये आदल्या दिवशी करून ठेवले तरी चालतात. करायचे नसतील तर फरसाणाच्या दुकानात तयार मिळतात ते वापरा.
वाटण मसाला. मसाल्यासाठीचं सगळं साहित्य मिक्सरमधे घालून एकजीव वाटून घ्या. मसाला फारवेळ फिरवून वाटू नका नाहीतर तो काळपट रंगाचा होतो. मसाला हिरवागार दिसायला हवा. म्हणून वाटतानाच लिंबाचा रस घाला म्हणजे रंग छान येईल.
कृती. एका मोठ्या आकाराच्या कुकरमधे तेल गरम करा. तेल गरम झालं की त्यात किसलेली हळद घाला. जरासं परतून त्यात सुरती पापडी घाला. नीट हलवून घ्या आणि झाकण घालून मध्यम आचेवर मधूनमधून हलवत पापडी चांगली शिजू द्या. पापडीला चांगली वाफ आली की त्यात कंद आणि रताळ्याचे तुकडे घाला. परत झाकण घालून ५ मिनिटं एक वाफ येऊ द्या. नंतर त्यात बटाटे आणि वांगी घाला. नीट मिसळून घ्या. आता त्यात तिखट, मीठ, धणे-जिरे पूड घाला. छान हलवून घ्या. लगेचच तुरीचे, मटाराचे आणि हरभ-याचे दाणे घाला. परत झाकण घालून २-३ मिनिटं वाफ येऊ द्या. नंतर त्यात वाटलेला मसाला घाला. लिंबाचा रस घाला. चव बघून हवी असल्यास अजून साखर घाला. उंधियो आंबट-गोड-तिखट असायला हवा. सगळं नीट एकत्र करून घ्या. २ मिनिटं शिजू द्या.
आता त्यात ४ भांडी पाणी घाला. नीट हलवून घ्या. पाण्याचं प्रमाण आपल्याला हवं तसं कमी जास्त करा. पाणी जरा जास्त असेल तर उंधियो कोरडा न होता ओलसर होतो आणि चांगला लागतो.
त्यात मेथी घालून परत हलवून घ्या. शेवटी वर मेथी मुठिये आणि केळ्याचे तुकडे ठेवा.
कुकरचं शिटीसकट झाकण लावा. एक शिटी झाली की गॅस बंद करा. प्रेशर सुटलं की उंधियो भांड्यात काढा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

कोनफळ मटार भाजी
साहित्य : कोनफळाची साले काढून त्याचे एक वाटीभर बारीक चौकोनी तुकडे,एक वाटीभर मटारचे दाणे,दोन टेबलस्पून ओल्या नारळाचा खोवलेला चव,एक टेबलस्पून तेल किंवा तूप,एक चमचा जिरे,एक चमचा धणे पूड,एक छोटा चमचा हिंग,चवीनुसार २/३ हिरव्या मिरच्या,अर्धी मूठ कोथिंबीर,एक चमचा लिंबाचा रस.
कृती : गॅसवर एका पॅनमध्ये तेल कींवा तूप तापवून त्यात हिंग, जिरे, हिरव्या मिरचीचे तुकडी घालून तडका फोडणी करा ( फोडणीत हळद घालू नये ) मग त्यात कोनफळाचे तुकडे व मटारचे दाणे एकत्र टाकून परतून घ्या. आता पॅनवर झाकण ठेवून दोन्ही छान शिजवून घ्या. कोनफळ व मटारचे दाणे शिजले की त्यात चवीनुसार मीठ व ओल्या खोबर्याेचा चव घाला. एक वाफ काढून गॅस बंद करा.
गासवरून खाली उतरवून कोथिंबीर व लिंबाचा रस घाला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

कोनफळाचे थालिपीठ
साहित्य. अर्धा किलो कोनफळ, पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, एक चमचा लाल तिखट, एक चमचा जिरेपूड, चवीला मीठ, तूप.
कृती. कोनफळाची साले काढून ते किसावे. किसात मीठ, जिरेपूड, तिखट, दाण्याचे कूट घालून कालवावे.
अतिशय बुळबुळीत असा लगदा तयार होईल. गरम तव्यावर तूप घालून हा लगदा पसरावा. अगदी पातळ पसरला जातो. दोन्ही बाजूंनी थालिपीठ चुरचुरीत करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

कोनफळ चीज पॅनकेक
साहित्य. पाव किलो कोनफळ, पाव वाटी चीज, प्रत्येकी अर्धा चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि जिरं, पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, चवीला मीठ, तिखट, तेल.
कृती. कोनफळाची साल काढून तो किसावा. किसात मीठ, तिखट, दाण्याचं कूट, जिरं घालवून कालवावं, तव्यावर चमचाभर तेल टाकून त्यावर हा कीस पातळ पसरावा एक बाजू झाल्यावर पॅनकेक उलटावा. वर चीज आणि हिरवी मिरची पसरावी आणि एक मिनिट झाकण ठेवावं. चीज वितळलं की पॅनकेक काढा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

कोनफळाची खीर
साहित्य.पाव किलो कोनफळ, अर्धा लिटर दूध, अर्धी वाटी साखर, अर्धा चमचा वेलचीपूड, थोडेसे बदामाचे काप.
कृती. कोनफळाची साले काढून कुकरमध्ये उकडावे. गार झाल्यावर किसावे. दूध उकळत ठेवावे.
साखर घालून उकळावे. कीस घालून १-२ मिनिटे उकळून वेलची पावडर घालावी. बदामाच्या कापांनी सजवावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on आजचा विषय कोनफळ

Leave a Reply

Your email address will not be published.


*