आजचा विषय आवळा भाग दोन

रक्त विकारांमध्ये उदा. नाकाचा घोळणा फुटला असेल, शौचामधून रक्त पडत असेल, आवळा, हिरडा, बेहडा ही द्रव्ये समप्रमाणात घेऊन त्याचं चूर्ण बनवावं यालाच त्रिफळा चूर्ण असं म्हणतात. हे चूर्ण रोज पाण्यात भिजत घालून सकाळी ते पाणी वस्त्रगाळ करून गाळलेल्या पाण्याने डोळे धुवावेत. असं केल्याने डोळ्यांचं तेज वाढतं. तसंच रात्री झोपताना गरम पाण्यातून एक चमचा त्रिफळा चूर्ण घेतलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी शौचास साफ होतं. जर डोकंदुखीचा त्रास होत असेल तर आवळ्याचं चूर्ण, तूप व खडीसाखर समप्रमाणात घेऊन एकत्र करावं. सकाळच्या वेळी उपाशी पोटी हे मिश्रण सेवन केल्याने डोके दुखीचा त्रास नाहीसा होतो.

केसांच्या तक्रारींवर उदा. केस गळणं, पांढरे होणं, कोंडा होणं, केस निस्तेज होणं या सर्वावर आवळा, शंखपुष्पी, ब्राम्ही, जास्वंद यांनी युक्त तेल केसांना लावावं. काही दिवसांमध्येच केसांची वाढ चांगली होते. केस गळणं थांबतं. केसांचा रंग टिकून राहतो व रात्री शांत झोप लागते. तोंड बेचव होऊन मळमळ किंवा उलटी होत असल्यास आवळ्याचा रस व मध यांचं चाटण करावं. तोंडास रुची प्राप्त होते. गर्भारपणात स्त्रीला उलटी व मळमळ वारंवार होत असते. अशा वेळी आवळा सुपारी, कँडी व सरबत यांचा वापर करावा. यामुळे तोंडास रुची निर्माण होऊन मळमळ कमी होते.

नियमित आवळा सेवनाने शरीरातील रसरक्तभिसरण क्रिया सुरळीत चालू राहते व त्यामुळे कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी होऊन हदयविकार टाळता येतो. नियमितपणे आवळा सेवन केल्यास त्यात असणाऱ्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे हृदय, केस, मांसपेशी व शरीरातील अनेक ग्रंथींना बळ मिळतं व त्यामुळे तारुण्यावस्था जास्त दिवस टिकून ठेवता येते. म्हणूनच वार्धक्यावस्था टाळण्यासाठी च्यवनऋषींनी आवळ्यापासून बनविलेला च्यवनप्राशावलेह सेवन केला व तारुण्यप्राप्त करून घेतलं. म्हणूनच बाराही महिने रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहण्यासाठी व त्यातून आरोग्य टिकण्यासाठी नियमितपणे च्यवनप्राश सेवन करावा. आवळकाठी पाण्यात वाटून अंगाला उटण्याप्रमाणे लावून ठेवली व काही वेळाने स्नान केले तर कांती उत्तम राहते, त्वचा सुरकुतत नाही.

आवळकाठी व पांढरे तीळ रात्रभर पाण्यात भिजत घालावे. सकाळी बारीक करून तयार झालेला कल्क डोळे बंद करून पापण्यांवर लावल्यास डोळ्यांची आग शमते, डोळे थंड राहतात. उष्णता वाढल्याने नाकातून रक्त पडते, त्यावर तुपात परतलेली आवळकाठी कांजीत वाटून टाळूवर लावल्यास फायदा होतो. अंगावर पित्त उठते, त्यावर आवळकाठी रात्रभर गोमूत्रात भिजत घालावी, सकाळी वाटून घ्यावी व नारळाच्या दुधात मिसळून अंगावर चोळावी. याने पित्ताच्या गांधी येणे बंद होते.

ताप वाढल्याने डोके फार तापले असता आवळकाठी दुधासह बारीक करून लेप करण्याने डोके शांत राहते. वाढत्या वयामुळे शरीराची झीज होणे स्वाभाविक असते. पण ही झीज कमीत कमी व्हावी, धातूंची संपन्नता टिकून राहावी यासाठी मदत करणारी द्रव्ये म्हणजे वयःस्थापन द्रव्ये. शतावरी, गोक्षुर, अश्वदगंधा अशी अनेक द्रव्ये वयःस्थापन करणारी असतात, मात्र यात आवळा सर्वश्रेष्ठ सांगितला आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

आवळा बी चूर्ण
आवळ्याच्या बिया वाळवून त्याची वस्त्रगाळ पूड करावी. त्यात थोडेसे पाणी घालून पेस्ट करावी. ही पेस्ट चेहऱ्याला व अंगाला लावली असता चेहरा व त्वचा मऊ होते.
संजीव वेलणकर पुणे.
पुणे ९४२२३०१७३३

घराच्या घरी च्यवनप्राश
साहित्य:- एक किलो डोंगरी आवळे, एक किलो साखर, दोनशे ग्रॅम चांगला मध, पन्नास ग्रॅम नवसारी लेंडी पिंपळी, पन्नास ग्रॅम अश्वगंधा मूळ, पन्नास ग्रॅम शतावरी मूळ, पन्नास ग्रॅम गुळवेल कांड, पन्नास ग्रॅम ज्येष्ठमध कांड्या,गाईचे तूप.
कृती:- नवसारी लेंडी पिंपळी, अश्वगंधा मूळ, शतावरी मूळ, गुळवेल कांड, ज्येष्ठमध कांड्या या पाच द्रव्यांचे अत्यंत बारीक चूर्ण करावे. प्रथम आवळे स्वच्छ धुऊन कुकरमध्ये उकडून घ्यावेत. उकडल्यानंतर आवळ्यामधील बी काढून टाकावी. राहिलेल गर मिक्सरमध्ये वा पुरणयंत्रात चांगला मऊ, एकजीव करून घ्यावा. नंतर तो गर, गाईचे तूप थोडे थोडे घालून खरपूस परतून घ्यावा.
एक किलो साखरेत पुरेसे पाणी घालून त्याचा एकतारी पाक करावा. या पाकात आवळ्याचा परतलेला खवा घालून मंदाग्नीवर ते मिश्रण पुन्हा शिजवावे. हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात पाच द्रव्यांचे बनवलेले वरणगाळ चूर्ण हळूहळू मिसळून मधही घालून सर्व मिश्रण चांगले एकजीव करावे व काचेच्या स्वच्छ बाटलीत भरून ठेवावे.
टीप.मुंबई-कोकणच्या दमट हवेत नंतर एखाद्या वेळेस थोडी बुरशी आली तर या च्यवनप्राशास तापवून चटका द्यावा, म्हणजे झाले. हा च्यवनप्राश दोन वर्षांपर्यंत उत्तम गुणकारी राहतो.
संजीव वेलणकर पुणे.
पुणे ९४२२३०१७३३

आवळ्याच्या चटपटीत वड्या
साहित्य:- दहा ते बारा चांगले मोठे आवळे, एक छोटा चमचा हिंग पूड, अर्धा छोटा चमचा लाल तिखट व तेवढेच मीठ, दोन छोटे चमचे ओवा व जिरे पूड, अर्धा छोटा चमचा शेंदेलोण व पादेलोण.
कृती:- प्रथम आवळे चांगले मऊ शिजवून घ्यावेत. त्यातील बी काढावे. सर्व आवळ्याचा गर अगदी बारीक कुस्करावा किंवा वाटण करावे. त्यात बाकीचे सर्व साहित्य घालून खूप कालवावे. तयार लगद्याचे आपण सांडगे घालतो तशा लहान लहान वड्या प्लॅस्टिकच्या कागदावर घालून उन्हात वाळवाव्यात. खडखडीत वाळल्या, की बाटलीत भरून ठेवाव्यात. या वड्या चविष्ट लागतात व तोंडाला रूची आणतात.
संजीव वेलणकर पुणे.
पुणे ९४२२३०१७३३

आवळ्याची सुपारी
साहित्य:- १ किलो आवळे, २५ ग्रॅम सैंधव मीठ, १० ग्रॅम काळी मिरी,
कृती:- आवळे स्टीलच्या किसणीने किसून घ्यावेत. सैंधव मीठ कुटून त्याची पूड करावी. मिरी बारीक कुटावी. हे दोन्ही एकत्र करून आवळयाच्या किसाला ते लावून ठेवावं. किस फडक्यात घेऊन ते स्टीलच्या पातेल्यात रात्रभर ठेवावा. हा कीस सकाळी फडक्यावर पसरून सावलीत वाळवावा. या सुपारीनं तोंडाला चवच येते.
संजीव वेलणकर पुणे.
पुणे ९४२२३०१७३३

आवळा सुपारीच्या गोळ्या
साहित्य:- ५०० ग्रॅम आवळे, १५ ग्रॅम आलं, २ चमचे जिरेपूड, अर्धा चमचा काळी मिरीपूड आणि चवीप्रमाणे मीठ.
कृती:- प्रथम आवळे चांगले उकडून घ्यावेत. बिया काढून टाकाव्यात. आल्याचं वरचं साल सोलून घ्यावं. आवळ्याच्या पाकळ्या बारीक वाटाव्यात. नंतर सर्व जिन्नस एकत्र करून त्याच्या बोराएवढय़ा गोळ्या करून उन्हात वाळवाव्यात.
संजीव वेलणकर पुणे.
पुणे ९४२२३०१७३३

आवळ्याची गोड सुपारी
साहित्य:- १ किलो आवळे, चवीप्रमाणो सैंधव मीठ, १० ग्रॅम काळी मिरीपूड, १० ग्रॅम ओवापूड, १० ग्रॅम आल्याचा रस आणि ५०० ग्रॅम साखर
कृती : सर्वप्रथम आवळे चांगले उकडून घ्यावेत. बिया काढून टाकाव्यात. साखरेचा पाक घट्ट करावा आणि त्यामध्ये आवळ्याच्या पाकळ्या, मीठ, जिरेपूड, मिरेपूड, आल्याचा रस, ओवापूड हे सर्व साहित्य एकत्र करावं. चार दिवस भिजत घालावं. नंतर भिजलेल्या आवळ्याच्या पाकळया चाळणीनं चाळून घ्याव्यात. पाकळया ताटामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या कागदावर उन्हात वाळवाव्या.
संजीव वेलणकर पुणे.
पुणे ९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*