आजचा विषय कवठ

कवठ हे फळ साधारण जानेवारी ते मार्च या महिन्यात मिळते. कठीण कवच वा आवरण असलेल्या कवठाला संस्कृतमध्ये ‘दधिफल’ किंवा ‘कपित्थ’ असे म्हणतात तर इंग्रजीमध्ये ‘वुड अॅपल’ असे म्हणतात. कवठ हे रुटेसी कुळातील फळ आहे. या फळाची साल कठीण असते. फळाचा रंग करडा असून, आत मृदू गर आणि लांबट बिया असतात. चवीला हे फळ आंबट-गोड आणि तुरट असतं. हे अतिशय पौष्टिक फळ असून कवठाच्या शंभर ग्रॅम गरातही ३१ ग्रॅम कबरेदकं आणि २ ग्रॅम प्रोटिन मिळतं. त्याचा उपयोग सहसा चटणीसाठी, सरबतासाठी, मुरंबा व जॅमसाठी करतात. बऱ्याच वेळेला फळांच्या गरामध्ये गूळ घालून पोळीसोबत खाणे अनेकजण पसंद करतात. कवठामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे याच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. ‘क’ जीवनसत्त्वासह लोह, कॅल्शिअम, पिष्टमय पदार्थ, फायबर असे सर्व पौष्टिक मूलद्रव्य कवठामध्ये असतात. कवठ हे मधुर आम्लरसाचे असल्यामुळे भूक कमी लागत असेल तर याच्या सेवनाने भूक वाढीस मदत होते. अरुची, मळमळ, उलटी या विकारांवर कवठ सेवनाने रुची निर्माण होऊन ही लक्षणे कमी होतात. कवठ हे स्तंभनकार्य करीत असल्यामुळे जुलाब होत असतील तर कवठ सेवनाने जुलाब कमी होतात. अंगावर पित्त उठले असल्यास कवठाच्या पानांचा रस अंगाला लावल्यास फायदा दिसून येतो. कवठ हे वसंत ऋतूत येणारे फळ आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी कवठाची गूळ घालून चटणी करतात. भगवान शंकराचा प्रसाद म्हणून कवठाचे सेवन करतात. महाशिवरात्रीला कवठाच्या बीमध्ये अमृत उतरते अशी श्रद्धा आहे. दक्षिण महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाच्या वाडीला कवठाची बर्फी मिळते. अतिशय रुचकर असा हा खाद्य पदार्थ आहे. कवठाची बर्फी, चटणी अतिशय रुचकर, पित्तशामक, जिभेची चव वाढवणारी आहे. कवठाची पाने स्वच्छ धुऊन त्याची मेथीच्या भाजीसारखी भाजी बनवावी किंवा ही पाने पिठामध्ये मळून थालिपीठे बनवावी. कवठाच्या पानांमध्ये भरपूर पोषक घटक, फायबर व ‘ब’ जीवनसत्त्व असल्याने ती आरोग्यसाठी लाभदायक असतात. कवठाची पाने सुवासिक व वातशामक असतात. कवठ हे उत्तेजक असून अपचन, आमांश आणि अतिसार इ. विकारांवर उपयुक्त आहे. कवठ हे पिकलेलेच खावे, कच्चे कवठ खाल्ल्याने सर्दी, खोकला, डोकेदुखी होऊ शकते.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

कवठाचे काही पदार्थ
कवठाचं सॅण्डविच
साहित्य – १ पिकलेलं कवठ, कवठाच्या अर्धा गूळ, १ चमचा जिरेपूड, मीठ, कोथिंबीर, ४-५ ब्राउन ब्रेडच्या स्लाइस आणि बटर.
कृती – कवठाचा गर काढून त्यात गूळ, जिरेपूड, मीठ आणि कोथिंबीर घालून सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करावं. मिक्सरवर एकदा फिरवून घ्यावं. ब्रेडला बटर लावून त्यावर कवठाचं मिश्रण पसरवून वरून बटर लावलेली दुसरी स्लाईस ठेवावी. सॅण्डविचचे दोन ते तीन तुकडे कापून डब्यात भरावेत. हे सँडविच तव्यावर किंवा टोस्टरमधे टोस्ट करूनही छान लागतं. कवठाचं स्प्रेड लावून पोळीचा रोल बनवणं हाही एक हेल्दी पर्याय आहे.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
कवठाची चटणी
साहित्य – १ वाटी कवठाचा गर, अर्धी वाटी गूळ, २-३ टीस्पून लाल तिखट, २ टीस्पून जिरं, मीठ चवीनुसार
कृती – सगळं साहित्य मिक्सरच्या भांडयात घालून जाडसर चटणी वाटा.
हे दोन्ही पदार्थ जेवणात तोंडी लावण्याचे पदार्थ म्हणून मस्त लागतात.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
कवठाचं पंचामृत
साहित्य – मध्यम आकाराचं पिकलेलं एक कवठ किंवा कवठाचा वाटीभर गर, कवठाचा गर जर फार आंबट असेल तर अर्धी ते पाऊण वाटी गूळ अन्यथा पाव ते अर्धी वाटी गूळ, १ टेबलस्पून तिळाचा कूट, १-२ हिरव्या मिरच्या, २-३ कढीपत्त्याची पानं, १ टीस्पून मेथी दाणे, १ टीस्पून काळा मसाला, पाव टीस्पून लाल तिखट, मीठ चवीनुसार, २ टीस्पून तेल, थोडी मोहरी, चिमूटभर हिंग, चिमूटभर हळद
कृती – कवठाचा गर मिक्सरमध्ये जाडसर फिरवून घ्या. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घालून ती तडतडू द्या. आता त्यात हिंग, हळद, मेथी दाणे घाला. मेथी दाणे लाल झाले की कढीपत्त्याची पानं आणि मिरचीचे तुकडे घाला. जरासं हलवून त्यात कवठाचा गर घाला. तो फोडणीत नीट मिसळून त्यात पाव वाटी पाणी घाला आणि झाकण ठेवून गॅस मंद ठेवा. २-३ मिनिटं शिजू द्या. नंतर झाकण काढून त्यात गूळ, तिखट, मीठ, काळा मसाला, तिळाचं कूट घाला. नीट हलवून घ्या. पाण्याचं प्रमाण आपल्याला जितपत घट्ट /पातळ हवं असेल तितकं ठेवा. परत झाकण ठेवा आणि मंद आचेवर ५ मिनिटं शिजू द्या. गॅस बंद करा. कवठाचं पंचामृत तयार.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
उपवासाला चालणारे कवठाचे आंबील
साहित्य – पिकलेले व भरीव कवठ, उपवासाला करणार नसाल तर कोंथींबीर, लाल मिरचीची पावडर अर्थात लाल तिखट जिरे, चिरलेला गुळ कवठाला पुरेल इतका, भाजलेल्या शेंगदाणे टरफल काढून – कुट अथवा अख्खे सोललेले दाणे, मीठ, तेल
कृती : कवठाचा गर चमच्यानी काढून घ्या. गुळ चिरुन घ्यावा. स्वच्छ मिक्सरमधे तळात आधी कवठाचा गर घालावा. आणि ह्यात आता थोडी कोथींबीर, मग चिरलेला गुळ, मीठ, दाण्याचा कुट, तिखट हे सर्व घटक घालावे. हे सर्व मिश्रण मिस्करमधुन वाटून घ्यावे. वाटलेले मिश्रण खाताना रवाळ वाटायला हवे. गॅसवर मातीचे एक भांडे ठेवावे किंवा जाड बुडाची एखादी कढई/पातेलेही चालेल. मातीच्या भांड्यात आता तेल तापवून त्यात आधी जिरे घालावे. जिरे नीट तळल्या गेले की लगेच त्यात मिस्करमधील वाटण घालावे आणि मिक्सरमधे एक ग्लासभर पाणी घालून विसळून तेच पाणी पातेल्यात ओतावे. पळीने सर्वकाही एकजीव करावे. वाढताना थोडी कोंथींबीर चुरडून आंबील वाढावे. हा प्रकार थंडीच्या दिवसामधे तिळ घालून करावा कारण तिळ उष्ण असतात.
टिपा: आंबील जर उरले तर ते दुसर्यात तिसर्यार दिवशीही खाता येते. उलट चव मुरल्यामुळे ते अजून छान लागते. तुम्हाला जर पित्ताचा त्रास होत असेल. अंगावर जर पित्त उठले असेल. लाल लाल गुंथा आल्या असतील तर त्यावर कवठ अगदी रामबाण उपाय आहे.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
कवठाच्या वड्या
साहित्य:मध्यम आकाराची दोन कवठं, अर्धा कप दूध, साधारण दोन ते अडीच वाट्या नारळाचा चव, साधारण दोन ते अडीच वाट्या साखर, पाव वाटी पिठीसाखर.
कृती: कवठांचा गर काढुन घ्यावा. त्यात अर्धा कप दूध मिसळुन घ्यावे. त्यातल्या बिया मोडल्या जातील पण अगदी वस्त्रगाळ होणार नाही अशा बेताने मिक्सरमधे वाटून घ्यावे. तयार झालेल्या मिश्रणाच्या समप्रमाणात प्रत्येकी नारळाचा चव आणि साखर घ्यावे. हे सर्व एकत्र करुन कढईत मध्यम आचेवर ठेवावे. एकसारखे हलवत अटवावे. शेवटी शेवटी अगदी मंद आचेवर ठेवावे नाहीतर जळते. चांगला घट्ट गोळा तयार झाला की तुपाचा हात लावलेल्या ताटात/ट्रेमधे वड्या थापाव्यात. वरुन शोभेसाठी पिठीसाखर भुरभुरावी.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
कवठाची जेली
साहित्य: दोन वाटी कवठाचा गर, अडीच वाटी पाणी, अडीच ते तीन वाटी साखर
कृती: दोन वाटी कवठाचा गर अडीच वाटी पाण्यात नीट मिसळून घ्यावा. (हॅंड मिक्सरने थोडे घुसळून घेतले तरी चालेल.) हे मिश्रण एक उकळी येईस्तोपर्यंत मध्यम आचेवर उकळत ठेवावा. एक उकळी आल्यानंतर हा गर स्वच्छ फडक्यातून/गाळण्यातून नीट गाळून घ्यावा. ह्या गाळलेल्या मिश्रणात अडीच ते तीन वाटी साखर (आवडीप्रमाणे) मिसळावी. मग हा साखरमिश्रित गर पुन्हा शेगडीवर प्रखर आचेवर ठेवावा आणि सतत हलवत ठेवावा. ’पाकाची जीभ’ तयार व्हायला लागली की शेगडी बंद करून थंड होण्यास ठेवावा.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
कवठाचा जॅम
जॅम करण्यासाठी पूर्ण पिकलेली मोठ्या आकाराची कवठे घ्यावीत. कवठ फोडून स्टीलच्या सुरीने गर काढून घ्यावा.
एका पातेल्यामध्ये एक किलो गरास २00 मि.लि. पाणी मिसळून गर हाताने कुस्करून लगदा करावा.
लगदा स्टीलच्या चाळणीत घेऊन तो हाताने दाबून त्याचा गर पातेल्यात काढून घ्यावा. तयार गर जॅम करण्यासाठी वापरावा.
साहित्य – कवठाचा गर १ किलो, साखर १ किलो, सायट्रिक आम्ल २ ग्रॅम.
कृती – जॅम करण्यासाठी पातेल्यामध्ये गर आणि साखर एकत्र करून शेगडीवर ठेवावे.
पहिल्या उकळीनंतर त्यात सायट्रिक ऍसिड मिसळावे. गर घट्ट होत आल्यानंतर त्याचा ब्रिक्स मोजावा. ६८ डिग्री ब्रिक्सा येईपर्यंत जॅम शिजवावा. जॅम घरी तयार करत असताना एका प्लेटमध्ये पाणी घेऊन शिजवलेले मिश्रण चमच्याने थोडे घेऊन पाण्यामध्ये टाकावे. जर मिश्रण पाण्यामध्ये पसरले तर अजून शिजविण्याची गरज आहे असे समजावे. जर मिश्रण न पसरता गोळी तयार झाली तर जाम तयार झाला असे समजावे. तयार जॅम निर्जंतुक केलेल्या बाटल्यात भरावा. जॅमची दीर्घकाळ साठवण करायची असल्यास जॅमवर वितळलेल्या मेणाचा पातळ थर देऊन झाकण घट्ट लावावे.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
कवठाची उपासाची चटणी
साहित्य : एक कवठ( चांगले तयार कवठ हातात घेऊन हलवले तर आतल्या गाराचा खुळखुळ्यासारखा आवाज ऐकू येतो) , आवश्यकतेनुसार गूळ किंवा साखर ,चवीनुसार मीठ व जिरेपूड
कृती : कवट फोडून आतला गर एका मोठ्या काचेच्या बाउलमध्ये काढून घेऊन त्यात चवीनुसार गूळ किंवा साखर व मीठ आणि स्वादासाठी एक छोटा चमचा जिरेपूड घालून मिश्रण चांगले एकजीव होईपर्यंत ढवळा व मुरू द्या.
कच्च्या कवठाची भाजी
साहित्य : दोन कवठ, लसूण, आले, जिरे, कढीपत्ता, हळद, तिखट, मीठ, मेथीदाणो, बडीशेप, काळा मसाला, गूळ, मोहरी आणि हिरवी मिरची.
कृती: दोन कवठांना फोडून त्यातला आतला गर काढून घ्यावा. त्याचे छोटे छोटे चाकूने तुकडे करावे. कढईत तेल टाकून त्यात मोहरी टाकावी. त्यात हिरवी मिरची, आले, लसूण, हिंग, कढीपत्ता, कोथिंबीर यांचं वाटण टाकावं. त्यातच एक चमचा मेथीदाणो, बडीशेप, तेजपान टाकावं. फोडणी चांगली झाल्यावर हळद, लाल तिखट टाकावं. त्यात कवठय़ाच्या फोडी टाकाव्या. त्यावर मीठ टाकावं. फोडी चांगल्या परतल्यावर झाकणावर पाणी ठेवून एक वाफ येऊ द्यावी. त्यानंतर एक ग्लास पाणी टाकावं. त्यात थोडा गूळ टाकावा. त्यावर किसलेलं खोबरं घालावं. झाकण ठेवून भाजीे चांगली शिजू द्यावी. 15-20 मिनिटांत भाजी शिजेल. ही भाजी, भाकरी बरोबर किंवा पोळीबरोबर स्वादिष्ट लागते.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*