आजचा विषय केळी भाग एक

केळ्याचा वापर पूर्वापार केला जात आहे. केळ्याला वंशवृद्धीचे प्रतीक मानले जाते. सर्वांत उत्तम जातीच्या केळ्यांचे उत्पादन भारतात होते. केळ्याचे मूळ स्थान भारत व दक्षिण आशियाचा प्रदेश आहे. कुठल्याही शुभ कार्यात केळ्याचे महत्त्व आपण मानतो. सत्यनारायण पूजा, गृहप्रवेश, लग्नकार्य अशा शुभ कार्यामध्ये केळीचे खुंट वापरले जातात.
केळी’ हे उत्तम पौष्टिक व शक्तिवर्धक फळ असून त्यात भरपूर प्रमाणात काबरेदके असतात. केळी मुख्यत: गरिबांचे फळ समजले जाते. कारण ते स्वस्त व भरपूर प्रमाणात वर्षभर उपलब्ध असते. भारतातून सौदी अरेबिया, इराण, कुवेत, जपान, व युरोपीय बाजारपेठेत केळीची निर्यात होत असून परकीय चलन मिळवून देणारे हे नगदी पीक आहे. महाराष्ट्रात जळगाव नंतर कोकण किनारपट्टीतील हवामान केळी या पिकास अतिशय पोषक आहे. शिवाय केळफुले व कच्ची फळे भाजीसाठी वापरली जातात. जाम, मुरंबे, चिप्स, वेफर्स इत्यादी पदार्थ बनवले जातात. तर उत्सवात केळीचे पान मंगलचिन्ह म्हणून वापरतात. केळ हे फळ जवळपास बाराही महिने बाजारात उपलब्ध असतं. त्यामुळे आपल्या आहारातही बऱ्याच प्रमाणात त्याचा वापर होतो; पण केळ्याचे आहाराच्या दृष्टीने चांगले-वाईट गुणधर्म जाणून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे केळ्याचा आपल्या जेवणात अधिक डोळसपणे उपयोग करता येऊ शकेल. असे म्हटले जाते, की सकाळी केळ खाल्ले, तर त्याची किंमत तांब्याइतकी असते, दुपारी खाल्ले, तर त्याची किंमत चांदीइतकी असते आणि संध्याकाळी खाल्ले, तर त्याची किंमत सोन्याइतकी असते. केळ्यामधील ग्लुकोजमुळे त्याला गोडी येते. ग्लुकोज ही नैसर्गिक शर्करा आहे, ज्यामुळे पोषण व शक्ती पुरविण्यास मदत होते. आयुर्वेदानुसार दूध व केळ हे विरुद्ध अन्न आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

काही पदार्थ केळ्याचे
केळ्याचे कोफ्ता
साहित्य: चार ते पाच नग कच्ची केळी, रेड ग्रेव्ही १ वाटी, गरम मसाला १ चमचा, आलं-लसूण पेस्ट २ चमचे, तिखट १ चमचा, हळद छोटा अर्धा चमचा, मीठ चवीनुसार, धने-जिरे पावडर १-१ चमचा, भाजलेली कणीक २-३ चमचे, तळायला तेल पाव वाटी
रेड ग्रेव्ही तयार करण्याकरिता साहित्य:- पाव किलो टोमॅटोची प्युरी, काजू मगज पेस्ट ३ वाटय़ा (१ वाटी काजू व २ वाटय़ा मगज स्वच्छ पाण्यात घेऊन १५-२० मिनिटे उकळावेत. त्यानंतर स्वच्छ धुऊन मिक्सरमध्ये बारीक करावेत.) आलं-लसणाचे द्रावण १ वाटी, धने पावडर १ चमचा, जिरे पावडर १ चमचा, कसुरी मेथी १ चमचा, खडा मसाला पावडर १ चमचा, हळद पाव चमचा, मीठ, साखर व तिखट चवीप्रमाणे, रेड ऑरेंज रंग छोटा अर्धा चमचा, व्हिनेगर २ चमचे, तेल अर्धी वाटी, तेजपान ३-४.
कृती : पातेल्यात तेल घेऊन, ते गरम झाल्यावर आलं-लसणाचे द्रावण टाकावे. मिश्रण उकळल्यावर, पारदर्शक झाल्यावर, तयार केलेली टोमॅटो प्युरी, काजू मगज पेस्ट घालून थोडेसे पाणी व तेजपान घालावे. मिश्रणाला तेल सुटल्यावर उर्वरित सर्व मसाले, मीठ घालून पुन्हा उकळी येईस्तोवर किंवा तेल सुटेस्तोवर परतावे. ग्रेव्ही थंड करून फ्रिजमध्ये ठेवावी.
केळ्याचे कोफ्ता कृती:- एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात थोडी हळद व मीठ घालावे व या पाण्यात केळ्याचे दोन तुकडे करून भिजवून घ्यावेत. साल काढून हे केळे कुस्करून घ्यावे. यात आलं-लसूण पेस्ट, धने-जिरे पावडर, तिखट, हळद, मीठ चवीनुसार घालून एकजीव करून घ्यावे. भाजलेल्या कणकीच्या साहाय्याने गोळे करून मंद आचेवर तळून घ्यावे. फ्राय पॅनवर ग्रेव्ही घेऊन पाणी घालून गरम करून त्यात कोथिंबीर व तळलेले कोफ्ते घालून पोळीबरोबर सव्‍‌र्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

क्रिस्पी बनाना
साहित्य:- ४-५ केळांची स्वच्छ धुतलेली साल, कॉर्नस्टार्च अर्धी वाटी, मीठ चवीनुसार, आलं, लसूण पेस्ट १ चमचा, अर्धा लिंबाचा रस, चाटमसाला, १ चमचा, तिखट १ चमचा, तेल तळायला.
कृती : केळाची साल स्वच्छ धुऊन त्याच्या छान बारीक लांब पट्टय़ा कापून घ्याव्यात. त्याला लिंबू, मीठ, आलं-लसूण पेस्ट चोळून ठेवावी. त्यानंतर कोरडय़ा कॉर्नस्टार्चमध्ये घोळवून डीप फ्राय करावे. वरतून चाट मसाला लावून सव्‍‌र्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

केळ्याची बाकरवडी
साहित्य:- ६ कच्ची केळी, २ लहान चमचे आले-मिरची पेस्ट, एका लिंबाचा रस, २ भांडी मैदा, २ लहान चमचे चिरलेली कोथिंबीर, २ चमचे तेल, चवीला मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती :- केळी वाफवून घ्या. त्यानंतर ती सोलून कुस्करा. त्यात आले-मिरची पेस्ट, लिंबाचा रस, मीठ, कोथिंबीर घालून मळून घ्या व दोन भाग करा. मैद्यात मीठ व तेल मिसळून मळून घ्या. याचेही दोन भाग करा. एक भाग चपातीप्रमाणे लाटा व केळ्याचे मिश्रण त्यावर पसरून गुंडाळी करा व कडा बंद करा. आता या रोलचे स्लाइस करा व गरम तेलात तळून घ्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

बनाना फिंगर तीळ
साहित्य :- ४ ब्रेड स्लाइस, १ लहान चमचा पांढरे तीळ, २ वाफवलेली कच्ची केळी, १ बारीक चिरलेला टोमॅटो, १ बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरचीचे तुकडे, कोथिंबीर, लिंबाचा रस, काळे मिरेपूड, मीठ.
कृती :- उकडलेली केळी किसून घ्या. ब्रेड व तीळ सोडून सर्व साहित्य एका भांड्यात एकत्र करा. ब्रेडवर हे मिश्रण लावा. मग तीळ लावा. ओव्हनमध्ये सोनेरी रंगावर ग्रील करा. प्रत्येक स्लाइसचे तीन उभे तुकडे कापा सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

बनाना फ्रेंच टोस्ट
साहित्य:- १ केळे, अर्धा पेला दूध, पाऊण चमचा दालचिनीपूड, अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स, ५ ब्रेडचे स्लाईस, तेल.
कृती :- केळे कुस्करून त्यात दूध, दालचिनीपूड, इसेन्स मिसळा व फेटा. तवा गरम करा व हे मिश्रण ब्रेडच्या तुकड्यांना लावून फ्राय करा. एक बाजू फ्राय झाल्यावर दुसऱ्या बाजूवर मिश्रण लावून थोडे फ्राय करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

केळ्याचा डोसा
साहित्य:- ४ पिकलेली केळी, ६ मोठे चमचे साखर, २ मोठे चमचे तांदळाचे पीठ, ३ मोठे चमचे मैदा, १ लहान चमचा बेकिंग पावडर, अर्धा पेला दूध.
कृती :- मिक्सपरमधून सर्व साहित्य बारीक करून घ्या. तयार पीठ तव्यावर टाकून डोसा बनवा. गरमागरम डोसा मधासोबत सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*