जोशी, सुहास

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री 

सुहास  जोशी यांच्या शब्दात त्यांची कहाणी. 

संदर्भ : इंटरनेट

लहानपणी गाणं शिकले. अगदी शास्त्रोक्त पद्धतीने विशारदपर्यंत. तंबोरा आणि पेटीही वाजवायचे. मात्र, अभिनय आणि मुलाबाळांमध्ये रमता रमता माझा गाता गळा कधी हरवला तेच कळलं नाही. आता गाणं गायचं म्हटलं तर श्वास धरता येत नाही. लगेच दम लागतो… सांगत आहेत ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी.

लग्नाआधी मी पुण्यात वास्तव्याला होते. आई-वडिलांना गाण्याचं ज्ञान होतं. काका उत्तम पेटी वाजवत. घरात गाण्याच्या छोट्या छोट्या मैफलीही रंगायच्या. मला गाणं शिकवायला गुरुजी घरी यायचे. विशारदपर्यंत मी गाण्याचं शिक्षणही घेतलं. अभिनयाचे धडे गिरवायला दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये गेल्यानंतर तिथेही मी गात होते. माझे पतीही संगीतवेडे होते. मुलगाही गातो. पेटी आणि ऑर्गनही सुरेख वाजवतो. रात्रीच्या जेवणानंतर आमच्या गप्पांमध्ये अनेकदा गाण्यांचेच विषय असायचे. त्यामुळे गाणं हा जणू माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटकच होता. परंतु नाटक, सिनेमात एकापाठोपाठ मिळत गेलेल्या उत्तमोत्तम भूमिका आणि कौटुंबिक जबाबदारी यात गाता गळा कधी हरवला ते कळलंच नाही. नाट्यक्षेत्रात पदार्पण केल्यानंतर मला नाट्यसंगीत गायचं नव्हतं. गाण्याचं शिक्षण घेतलं असलं तरी ख्याल गायकी माझ्यासाठी अवघड होती. दादरा वगैरे गाणं आपल्याला झेपणारं नाही हेही पक्कं ठाऊक होतं. त्यामुळे त्याच्या वाट्याला कधी गेले नाही. ‘लेकुरे उदंड झाली’मध्ये जसं गाणं आहे तसं काही रंगमंचावर गायला मिळावं, अशी मनोमन इच्छा होती. मात्र दुर्दैवाने तशी संधी कधी मिळालीच नाही.

आजही माझ्या घरात तंबोरा आणि तबला आहे. मात्र साफसफाई करण्याव्यतिरिक्त त्याला फारसा हात लागत नाही. कुणी पेटी वाजवावी, कुणी तबल्यावर ताल धरावा आणि आपण गाणं गावं, असं वाटत असतं. गाण्याच्या या वेडापोटी चार मित्रमंडळी जमवून घरातच गाण्याची मस्त मैफल रंगवण्याचे प्रयत्न अनेकदा केले. मात्र, या बैठकांमध्ये गाण्यांपेक्षा गप्पाच जास्त रंगू लागल्या. आता वयही झालंय. गाणं गाण्याचा पूर्वीसारखा उत्साह राहिलेला नाही. दोन तीन गाणी म्हटली की दम लागतो. श्वास धरता येत नाही. गात्या गळ्याला मर्यादा येत असल्या तरी संगीत ऐकण्याचा आनंद मात्र मी मनमुराद लुटत असते. शास्त्रीय संगीताच्या मैफलींना जाण्याचा योग फारसा येत नसला तरी माझ्या घरी क्लासिकल संगीताचा भरपूर स्टॉक (रेकॉर्डिंग) आहे. गुलामअली, शोभाताई गुर्टू माझ्या ऑल टाइम फेव्हरेट आहेत. बिस्मिल्लांची सनई, रवी शंकरांची सतार, राम नारायणांची सारंगी असं वाद्यसंगीतही मी वेड्यासारखं एन्जॉय करते.

नाटक करत असताना असंख्य चांगल्या भूमिका माझ्या वाट्याला आल्या. त्या काळी भक्ती बर्वे किंवा मी असे दोनच प्रमुख पर्याय निर्मात्यांसमोर असायचे. ‘पुरुष’ नाटक मी इंग्रजीत केलं. सत्यदेव दुबेंसोबत ‘प्रतिबिंब’ हे हिंदी नाटक करण्याचाही योग आला. मात्र, त्यानंतर फारशी हिंदी नाटकं करण्याची संधी मिळाली नाही, ही खंत मला नेहमी बोचते. हिंदी नाटकांच्या तालमी मुंबईतच व्हायच्या. ती जागा सर्वांच्याच सोयीची असायची. मी मात्र ठाण्यात राहायचे. त्यामुळे नियमित मुंबई वारी मला शक्य होत नसे. ठाण्यात हिंदी कलाकारांचा असा वेगळा ग्रुप नव्हता. त्यामुळे हिंदी नाटकांचं स्वप्नही अधुरंच राहिलं. हिंदीत काम केलं असतं तर माझ्या अभिनयाचा प्रेक्षकवर्ग विस्तारण्यास मदत झाली असती. मुंबईत घर नसल्याने आपण अनेक अनुभवांना मुकलो, अशी अशी चुटपूट मला लागते. मुंबईत घर असतं तर शास्त्रीय संगीताच्या मैफलींना बिनधास्त जाता आलं असतं, फिल्म फेस्टिवल्सचा मनमुराद आनंद लुटता आला असता, मोठमोठ्या कलाकारांच्या नियमित गाठीभेटी घेता आल्या असत्या, त्यातून काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळाली असती, असे विचार नेहमी मनात डोकावतात. त्यातून अनेकदा मला मुंबईत घर घेण्याची खुमखुमी येते. परंतु आथिर्कदृष्ट्या ते शक्य नसल्याचं लक्षात आल्यानंतर उत्साह मावळतो.

माझं घर ठाण्यात असलं तरी इथली शांतता हे एक वेगळंच सुख आहे. मुलीचं लग्न झालंय. मुलगा शिक्षणासाठी परदेशात आहे. घरी मी एकटीच असते. सिरिअल्स, नाटक आणि सिनेमा अशी भरपूर कामं हाती असली तरी आता बराच फावला वेळ मला मिळतो. त्यात बहुतेक वेळ मी वाचनात घालवते. पण वाचणार तरी किती? कधी कधी त्या वाचनाचाही कंटाळा येतो. तेव्हा असं वाटतं की विणकाम, भरतकाम अशी एखादी कला आपल्याला अवगत असती तर हा वेळही सार्थकी लागला असता. बालवयात मी पेंटिंग आणि भरतकाम करायचे. परंतु माझ्या आळसामुळे तेही मागे पडलं. बराच प्रयत्न केल्यानंतरही आपल्याला ड्रायव्हिंग जमलं नाही याची भयंकर चीड येते. वाहन चालविण्यासाठी जो बेसिक कॉन्फिडन्स लागतो तोच कधी माझ्यात आला नाही. गाडी शिकण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकदा ट्राफिक जॅममध्ये अडकल्यानंतर हरवलेला आत्मविश्वास पुन्हा कधी गवसलाच नाही. ड्रायव्हिंग सीटवर बसण्याची आता माझी हिम्मतच होत नाही. नीना (कुलकर्णी), भारती (आचरेकर) मस्त गाड्या चालवतात. वंदना (गुप्ते) तर सुसाटच गाडी हाकते. मात्र रिमा, स्वातीला आणि मला ते कधी जमलंच नाही.

मध्यंतरी सॅनफ्रान्सिस्कोला मुलाकडे जाण्याचा योग आला होता. तिथली ड्रामा थिएटर बघून अक्षरश: हेवा वाटला. न्यूयॉर्कला तर अवघ्या १२ प्रेक्षकांसाठी थिएटर बांधलंय. अप्रतिम नाटकं तिथे सादर केली जातात. प्रेक्षकही तितकेच कसलेले असतात. सणसणीत तिकीट आकारतात. मात्र नाटकाचा आनंद पैसा वसूल करणारा असतो. त्या तुलनेत आपल्याकडची नाट्यगृहं आणि तिथे कलाकारांना मिळणार्‍या सुविधांचा विचार केला तर अंगावर काटाच येतो. स्वच्छ मेकअप रूम, तिथे बसण्यासाठी खुर्च्या, पंखे, पुरेसा लाइट अशा साध्या साध्या गोष्टीदेखील नाट्यगृहांमध्ये नसाव्यात हे दुर्दैव आहे.

आपल्याकडे उत्तमोत्तम प्रायोगिक नाटकं होत असतात. गावखेड्यातही तगडे अभिनेते दडलेले आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन आणि व्यासपीठ हवं असतं. मध्यंतरी माझ्या येऊरच्या जागेत अशा कलाकारांसाठी काही अॅक्टिव्हिटी सुरू केल्या होत्या. महिन्यातून एकदा तिथे अॅमॅच्युअर नाटकांचे प्रयोगही आम्ही करायचो, खूप मजा यायची. परंतु ती जागा विकावी लागल्याने या मोहिमेत खंड पडला. मध्यंतरी अभिनयाचे धडे देण्यासाठी दोन वर्षांचा घरगुती कोर्सही सुरू केला. परंतु तिथे फार आशादायी प्रतिसाद मिळाला नाही. नव्या पिढीसाठी ठाण्यात उत्तमोत्तम एकांकिका स्पर्धा व्हायला हव्यात, असं सारखं वाटत असतं. आपला अनुभव नव्या पिढीशी शेअर करून त्यांना मार्गदर्शन करावं अशी प्रबळ इच्छा आहे. त्यासाठी जमेल तेवढे प्रयत्न करायचा विचार करतेय. बघुयात कितपत यश येतंय ते…. अशी ही राहून गेलेल्या, कराव्याशा वाटणार्‍या गोष्टींची भलीमोठी यादी!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*