किर्लोस्कर, शांताबाई

Kirloskar, Shantabai

 

संपादक, कथाकार असलेल्या शांताबाई किर्लोस्कर या महाराष्ट्रात नावाजलेल्या किर्लोस्कर कुटुंबातील एक सदस्य. शांताबाईंचा जन्म ५ एप्रिल १९२३ रोजी बारामती येथे झाला. त्यांचे सर्व शिक्षण आजोळी पुणे येथे झाले. माध्यमिक शिक्षण भावे स्कूल येथे तर फर्ग्युसन महाविद्यालय आणि सांगलीच्या विलिग्डन महाविद्यालयात त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. पूर्वाश्रमीच्या त्या शांता वैद्य. १९४३ साली त्यांचा मुकुंदराव किर्लोस्कर यांच्याशी विवाह झाला. त्यानंतर त्या किर्लोस्कर हायस्कूलमध्ये शिक्षिका होत्या. तसेच किर्लोस्कर, स्त्री आणि मनोहर या त्या काळी अत्यंत गाजलेल्या मासिकांच्या संपादनात त्यांचा सहभाग होता. त्यांची विचारसरणीची ठेवण पुरोगामी. या मासिकांद्वारे त्यांनी बरेच लेखन केले. त्यांच्या अनेक कथाही प्रसिद्ध झाल्या आहेत. ‘डाक्क्याची साडी’, ‘शोध’ हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘देणगी’, ‘बायकांचा जन्म’ इ. अनुवादीत पुस्तके तर ‘भातुकली’ ही कादंबरी आणि स्त्री जीवनाशी संबंधित ‘लालनपालन’, ‘कसं गं माझं सोनं’ आणि ‘प्रकाशाचा वेध’ या ग्रंथांचे लेखन त्यांनी केले. शिक्षक पालकांसाठी एक चळवळ त्यांनी चालविली होती. शांताबाईंनी एक अतिशय मोठं केलेलं कार्य म्हणजे १९२० ते १९८४ या ६५ वर्षांच्या काळातील किर्लोस्कर, स्त्री आणि मनोहर यातील २६१२ अंकांचा अभ्यास करून त्यातील लेखांचा आणि वाटचालीचा विस्तृत इतिहास ‘गोष्ट पासष्ठीची’ या ग्रंथात अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडला आहे. या
ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे या कालखंडातील वैचारिक, सामाजिक आणि साहित्यिक बदलांचा संपूर्ण आलेखच तयार झालेला दिसतो. त्यांचे हे कार्य अनेक पिढ्यांना उपयोगी पडेल असेच आहे.

1 Comment on किर्लोस्कर, शांताबाई

Leave a Reply

Your email address will not be published.


*