रामचंद्र नरहर चितळकर (सी.रामचंद्र)

हिंदी तसंच मराठी चित्रपटसृष्टीतील विख्यात संगीत दिग्दर्शक व पार्श्वगायक असलेल्या सी.रामचंद्र यांचे मूळ नाव रामचंद्र नरहर चितळकर. त्यांचा जन्म पुणतांब्याजवळील चितळी या गावी १९१८ रोजी झाला! ‘सी. रामचंद्र’ हे संक्षिप्त नाव त्यांनी सिनेदिग्दर्शक जयंत देसाई ह्यांच्या सूचनेवरुन धारण केले. आपल्या निकटवर्तीय व आप्तेइष्टांमध्ये ते ‘अण्णा’ या नावाने प्रसिद्घ होते. “आर्.

एन्. चितळकर”,”श्यामू”,”राम चितळकर”,”सी. रामचंद्र” व “अण्णासाहेब” अशा विविध नावांनी त्यांनी संगीतदिग्दर्शन व पार्श्वगायन केले. त्यांचे वडील रेल्वेत नोकरीस होते.त्यामुळे त्यांच्या वडिलांची ठिकठिकाणी बदली होत.त्यांचे बालपण डोंगरगड, नागपूर, विलासपूर, गोंदिया अशा निरनिराळ्या ठिकाणी गेले. शालेय शिक्षणात त्यांना फारसे स्वारस्य नव्हते; पण संगीत क्षेत्राविषयी निस्सीम प्रेम व भक्ती असल्याने याच विषयात कारकीर्द गडवण्याच्या हेतूने नागपूरच्या ‘श्रीराम संगीत विद्यालया’त प्रवेश घेऊण त्यांनी संगीताचे पहिले धडे गिरविले. गांधर्व संगीत महाविद्यालयात त्यांनी पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्या हाताखाली गायकीचे धडे घेतले; व उत्तम गाणारा मुलगा असा लौकिक मिळविला.

‘न्यू थिएटर्स’ च्या चित्रपटांतल्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका ऐकून त्यांच्या स्वरलिप्या बनविणे हाही त्यांचा एक छंद होता. चित्रपटात काम करण्याचीही त्यांना आवड होती. “नागानंद” ह्या चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका करून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले; पण तो चित्रपट यशस्वी ठरला नाही. प्रसिद्घ चित्रपटनिर्माते आणि दिग्दर्शक सोहराब मोदी ह्यांच्या ‘मिनर्व्हा मूव्हिटोन’ ह्या संस्थेच्या संगीत विभागात हार्मोनियमवादनाचे काम त्यांना मिळाले आणि संगीतदिग्दर्शनाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली. तेथे “हूगन” आणि “मीरसाहेब” ह्या संगीतकारांशी त्यांचा संबंध आला. हूगन हे पाश्चात्त्य वाद्यांवर हिंदुस्थानी संगीत वाजवून दाखवीत. त्यांच्या संगतीने सी. रामचंद्रांनी मुंबईच्या मोठमोठ्या हॉटेलांतून इंग्लिश वादकांचे वादन ऐकले.

पश्चिमी संगीतातली उडती लय देशी गाण्यांना देता आली तर ती खूप लोकप्रिय होतील, ह्याचा अंदाज त्यांना आला. हूगन ह्यांनी तयार केलेल्या गाण्यांच्या चालींच्या स्वरलिप्या तयार करण्याचे काम त्यांच्याकडे होते. त्या करताना स्वतःला सुचलेले नवीन काही ते त्यांत घुसडून देत. हूगन ह्यांच्याकडून त्याबद्दल कधी आक्षेप आला नाही. मीरसाहेबांचे बनारसी पद्घतीच्या गायकीवर प्रभुत्व होते. चाली कशा बांधतात ह्याचे प्रात्यक्षिकच “मिनर्व्हा मूव्हिटोन” मध्ये सी. रामचंद्रांना मिळाले. थोर संगीतकार अनिल विश्वास ह्यांनी हिंदी संगीतात पाश्चात्त्य संगीताचे स्वर बेमालूमपणे मिसळण्याचे तंत्र आत्मसात केले होते. त्यांच्या चालींचे संस्कारही सी. रामचंद्रांवर झाले. पाश्चात्त्य संगीताचा बाज, सुरावट व वाद्यवृंद हिंदी सिनेसंगीतात आणून ते लोकप्रिय करण्याचे मुख्य श्रेय सी. रामचंद्र यांच्याकडे जाते.

हिंदी स्टंटपटांतून काम करणारे अभिनेते भगवान पालव ऊर्फ मास्टर भगवान यांच्याशी झालेल्या मैत्रीमुळे त्यांना “जयक्कोडी” हा तमिळ चित्रपट संगीतदिग्दर्शनासाठी मिळाला. सी.रामचंद्र यांनी संगीत असलेला हा पहिला चित्रपट. त्यानंतर “वनमोहिनी” हा आणखी एक तमिळ चित्रपट त्यांना मिळाला. मा. भगवान यांच्या “सुखी जीवन” ह्या चित्रपटातील ‘सारे जहाँसे अच्छा’ ह्या गीतामुळे संगीतकारांच्या जगात त्यांच्या नावाचा बोलबाला झाला. “जयंत देसाई प्रॉडक्शन्स” चे “जबान”,“मनोरमा”,“ललकार”, “चंद्रगुप्त” असे काही चित्रपटही त्यांनी केले. पुढे हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम कवी प्रदीपजी ह्यांच्यामुळे शशीधर मुखर्जी ह्यांच्या ‘फिल्मिस्तान’ या चित्रपटसंस्थेत सी.

रामचंद्रांचा प्रवेश झाला. या चित्रपटसंस्थेच्या शहनाई ह्या चित्रपटाला त्यांनी दिलेले संगीत-विशेषतः त्यातील “आना मेरी जान संडे के संडे” हे गाणे खुपच लोकप्रिय ठरले. या चित्रपटामुळे सी.रामचंद्र हे नाव सर्वत्र गाजले. ज्यामुळे चित्रपटांना संगीत देण्याची संधी त्यांना मिळू लागल्या.मा. भगवान यांच्या अलबेला ह्या अफाट लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटाला त्यांनी संगीत दिले. त्यामधील “भोली सूरत दिलके खोटे”, “शोला जो भडके”, “शाम ढले खिडकी तले”,”मेरे दिल की घडी करे टिक टिक”,”ओ बेटाजी ओ बाबूजी” ही गाणी देखील खुप गाजली.

त्यानंतर फिल्मिस्तानच्या “अनारकली”ने यशाची मजल गाठली. या यशात सी. रामचंद्रांच्या संगीताचा वाटा सर्वाधिक होता. “ये जिंदगी उसीकी है” हे त्यातले लता मंगेशकर यांनी गायलेले गीत अवीट गोडीच्या संगीतामुळे आजही रसिकांच्या ओटांवर रुंजी घालतेय.

सी.रामचंद्र यांच्या संगीत दिग्दर्शनातील आणखीन उल्लेखनीय चित्रपट म्हणजे “आझाद”, “इन्सानियत”, “तिरंदाज”, “यास्मिन”,“शहनाई”,“नवरंग”,“नास्तिक”,“झांझर”,“शिनशिनाकी बबला बू”,“दुनिया गोल है”;इत्यादी. तिरंदाज व यास्मिन या चित्रपटांच्या संगीताचं वैशिष्टयं म्हणजे सी.रामचंद्रनी अरबी संगीताचा कौशल्यतेनं केलेला वापर.

सी. रामचंद्र यांनी हिंदी सोबतच मराठी, तमिळ, तेलुगू व भोजपुरी चित्रपटांनाही संगीत दिले. सुरूवातीच्या काळात “आर्. एन्. चितळकर” या नावाने त्यांनी काही मराठी चित्रपटांत भूमिका केल्या व गाणीही गायिली. १९६० च्या दशकात त्यांनी “धनंजय” व “घरकुल” या मराठी चित्रपटांची निर्मिती केली, त्यांना संगीत देउन प्रमुख भूमिकाही केल्या. घरकुलमधील ‘पप्पा सांगा कुणाचे’ हे गाणे तर सुपरहिट ठरले.

भारताचे तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु ह्यांच्या उपस्थितीत सी. रामचंद्र यांनी लता मंगेशकर यांच्या आवाजात दिल्ली येथे २७ जानेवारी १९६३ रोजी सादर केलेल्या “ऐ मेरे वतन के लोगो” ह्या गीताला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद हा त्यांच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण होता. अतिशय हृदयस्पर्शी व प्रेरणादायी असे हे गीत आजही पूर्वीइतकेच लोकप्रिय आहे. सी. रामचंद्रांनी “माझ्या जीवनाची सरगम” हे आपले आत्मचरित्र १९७७ साली लिहिले आहे.

सी.रामचंद्र यांचे ५ जानेवारी १९८२ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.

संगीतदिग्दर्शक व पार्श्वगायक सी.रामचंद्र (5-Jan-2017)

अष्टपैलू संगीतकार सी. रामचंद्र (12-Jan-2017)

अष्टपैलू संगीतकार सी. रामचंद्र (12-Jan-2018)

अष्टपैलू संगीतकार सी. रामचंद्र (12-Jan-2019)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*