प्रविण कारखानीस

भुंगा जसा चंचलपणे एका फुलावरून दुसरीकडे उडून प्रत्येक फुलामधील मधाचा आस्वाद घेत असतो तश्याच प्रकारे काही व्यक्तींना सतत दुसर्‍या देशांना व अगदी दुसर्‍या टोकांवर असलेल्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्याची हुरहुर लागलेली असते व अशा प्रवासवेड्या कलंदरांमध्ये प्रवीण कारखानीस यांचे नाव आवर्जुन घ्यावेसे वाटते. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे त्यांनी निरनिराळ्या देशांना व तिथल्या ऐतिहासिक स्थळांना आभ्यासपुर्ण भेटी देवून तिथल्या संस्कृतींशी समरस होण्यात, व तिथल्या पारंपारिक कलांचा व पदार्थांचा आस्वाद घेण्यातच आपल्या जीवनातील बराचसा काळ व्यतित केला आहे.

आभ्यासपुर्ण भेटी अशासाठी की या प्रवासाद्वारे, व अफाट भटकंतीनंतर, त्यांनी या विवीध देशातल्या रहिवाशांची जीवनशैली व त्यांचे अंतरंग न्याहाळुन ते केवळ स्वतःपुरते मर्यादित ठेविले नाही तर अनेक रंजक व उत्कंठावर्धक पुस्तके लिहुन हे अनुभव त्यांनी मराठी रसिकांना उलगडुन दाखविले. आज, इतक्या वर्षांनंतर देखील त्यांनी लिहीलेली प्रवासवर्णने अगदी कालपरवाच घडलेली, व नुकत्याच उमललेल्या फुलासारखी तजेलदार, व टवटवीत वाटतात व त्यामुळे त्यांची गणती मराठीमधील मोजक्या, व दर्जेदार प्रवासवर्णनकारांपैकी होते. त्यांच्या भ्रमंतीचे वैशिष्ट्य म्हणजे, जगभरामधील पर्यटकांकडुन वाखाणली गेलेली स्थळेच त्यांनी फक्त पालथी घातली आहेत असे नाही तर आफ्रिकेच्या निर्जन जंगलांमध्ये देखील ते तेवढयाच उत्साहाने व तन्मयतेने भटकले आहेत. निडरपणा व स्वच्छंदीपणाचे मुर्तीमंत उदाहरण म्हणून आज त्यांच्याकडे अतिशय आदराने पाहिले जाते.

1977 साली त्यांनी मोटारसायकलवरून आपल्या सात भ्रमंतीवेडया साथीदारांसह हातात नकाशे व गळ्यामध्य शबनमी झोळी घेवून अफगाणिस्तान, इराण, तुर्कस्तान, बल्गेरिया, युगोस्लाविया, अशी मजल दरमजल करीत शेवटी इटलीमध्ये थांबुन आपल्या प्रवासाची मुहुर्तमेढ रोवली होती. त्या रोमांचक प्रवासात त्यांना झालेले विश्वदर्शन व हजारो कडु-गोड अनुभव नंतर ‘अष्टचक्री रोमायण’ या पुस्तकामधुन, त्यांच्या प्रतिभावंत लेखणीतून जसेच्या तसे झिरपले. 1980 साली त्यांनी मोटारसायकलीवरून आफ्रिकेमधील जंगले तुडवली, व केवळ अमर्याद जिद्दीचे बंधन बाळगुन मोटारसायकलवरून झिम्बाब्वेमध्ये प्रवेश करणारे ते पाहिले ते पहिले वहिले भारतीय ठरले. आफ्रिकेमधील त्यांच्या संस्मरणीय अनुभवांचे, अंगावर शहारे आणणारे चित्रण त्यांनी भ्रमंती देश विदेशाची या पुस्तकातुन केले आहे. भ्रमणवेड्या भुंग्यांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक असण्याप्रमाणेच, ते अत्यंत प्रेरणादायी सुध्दा आहे, त्यामुळे या पुस्तकाचे वाचन म्हणजे अस्सल पर्यटकांसाठी आनंदाची पर्वणीच ठरते. त्यांची गाथा गुणीजनांची व हावडा ब्रिजवरून ही पुस्तके देखील वाचकप्रिय ठरली आहेत. नुकतेच त्यांच्या अष्टचक्री रोमायण व भ्रमंती देश विदेशची या पुस्तकांचे इ बुक प्रसिध्द झाले.

2004 सालच्या मार्च महिन्यात पाकिस्तानात झालेल्या भारत पाक क्रिकेट सामन्याच्या निमीत्ताने कारखानीसांनी अगदी एकट्याने पाकिस्तानमध्ये जावून, तिथल्या सामान्य नागरिकांमध्ये मिसळुन, बेडरपणे भटकंती केली होती व मंजील ए मकसुद या पुस्तकाद्वारे, त्या क्षणांदरम्यान उचंबळुन आलेल्या असंख्य भावनांना वाट मोकळी करून दिली होती.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*