पंडित रघुनंदन पणशीकर

ज्येष्ठ गायक पंडित रघुनंदन पणशीकर यांचा जन्म १४ मार्च १९६३ रोजी झाला.

रघुनंदन पणशीकर यांचा जन्म वेदशास्त्रसंपन्न घराण्यातला. ज्येष्ठ रंगकर्मी नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर हे त्यांचे वडील, तर वेदशास्त्रसंपन्न असे दाजी पणशीकर हे त्यांचे काका होत. तेव्हा ‘कला’ आणि ‘संस्कृत’ या दोन्ही गोष्टी त्यांच्या घरात होत्याच. प्रभाकर पणशीकर यांची ‘नाट्यसंपदा’ नावाची नाटक कंपनी होती.

तसेच त्यांनी पं. जसराज आणि पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांच्याकडे त्यांनी गाण्याचे शिक्षण घेतले. पण किशोरी अमोणकर यांच्याकडेच शिकायचे, हे त्यांच्यासाठी विधिलिखित होते.

रघुनंदन पणशीकर हे ज्येष्ठ गायिका किशोरी अमोणकर यांच्या खास शिष्या पैकी एक होय.

रघुनंदन पणशीकर हे किशोरीताईंकडं एक तपच नव्हे, तर तब्बल वीस वर्षं गाणे शिकले. आलापी ही किशोरीताईंची खासियत होती. आलापी कशी विकसित करत न्यायची, हे रघुनंदन यांना त्यांच्या कडून खास शिकता आली.

किशोरीताईंनी त्यांना गझल, मराठी-हिंदी भजनं, कानडी संगीतही शिकवलं. आपल्या शिष्यांचा आवाज चौफेर कसा तयार होईल, याकडं त्यांचं लक्ष असायचं.

गेल्या आठ वर्षांपासून रघुनंदन पणशीकर यांनी ‘गानसरस्वती महोत्सव’ सुरू केला आहे. किशोरीताईंच्या गानकर्तृत्वाला मानवंदना म्हणून हा महोत्सव साजरा केला जातो. अनेक दिग्गजांनी या महोत्सवात आपली कला सादर केली आहे. किशोरीताईंच्या कृपेनं हा महोत्सव सुरू झाला असून, तो पुढंही सुरूच राहील.

पंडित रघुनंदन पणशीकर यांनी भारतातील शहरांव्यतिरिक्त युरोप, अमेरिका आणि आखाती देशांतील श्रोत्यांना आपल्या गायकीने मंत्रमुग्ध केलेले आहे.

रघुनंदन पणशीकर यांना स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार व २०१७ मध्ये बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे दिला जाणारा देवगंधर्व भास्करबुवा बखले पुरस्कार मिळाला आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*