नंदू भेंडे

रॉक स्टार नंदू भेंडे यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५६ रोजी झाला.

नंदू भेंडे यांचे खरे नाव सदानंद भेंडे. ज्या काळात मराठी घरांमध्ये पॉप आणि रॉक संगीत हे शब्द अनभिज्ञतेच्या किंवा विनाकारण हेटाळणीच्या सुरात उच्चारले जात, त्या काळात नंदू भेंडे यांनी छेडलेली मराठी रॉकची तार आज अन्य कितीतरी जणांमुळे झंकारत राहिली आहे.

मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे आणि आशा भेंडे यांचा नंदू हा मुलगा. त्यांचे मामा कवी निस्सीम इझिकेल. रॉक पहिल्यांदा मुंबईतच ऐकल्याची आठवण नंदू यांनी लिहिली आहे. सुगम आणि शास्त्रीय संगीताची आवड त्यांना होती, पण नव्याचे स्वागत करण्याची ऊर्मीही होती. त्यातून आधी ॲ‍गलेक पदमसींच्या ‘जीझस ख्राइस्ट सुपरस्टार’ या नाटकात ज्युडासची भूमिका (१९७४) मग पुलंच्या ‘तीन पैशांचा तमाशा’या रूपांतरित संगीतिकेत ‘अंकुश’ची भूमिका केली.

‘गेलो होतो रानात’ सारख्या मराठी गाण्यांना त्या वेळच्या दूरदर्शनवर प्रसिद्धी मिळाली. मग ‘डिस्को डान्सर’ या हिंदी चित्रपटासाठीही पार्श्वगायन केल्यावर बप्पी लाहिरींखेरीज चित्रपटसंगीतातही आर.डी बर्मन आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल अशा प्रख्यात संगीतकारांसह त्यांनी काम केले.

नंदू भेंडे यांना केवळ सुरांचे नव्हे, सुरांमागच्या तंत्राचेही आकर्षण होते. संगणकीय संगीताच्या जमान्याशी त्यांनी सहज जुळवून घेतले, ते याचमुळे. इव्हेंट मॅनेजमेंट वगैरे क्षेत्रात त्यांनी हातपाय पसरून पाहिले व तेथेच राहणे त्यांना कठीण नव्हते, परंतु तरुणांना आवाज आणि संगीत-तंत्र यांचे शिक्षण देण्यात ते अधिक रमले होते.

नंदू भेंडे यांचे ११ एप्रिल २०१४ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*