मीना प्रभू

ज्येष्ठ लेखिका व प्रवासवर्णनकार यांचा जन्म २७ ऑगस्ट १९३९ रोजी पुणे येथे झाला.

मूळच्या पुणेकर, पण विवाहानंतर लंडनमध्ये स्थिरावलेल्या आणि मराठीत प्रवासवर्णनपर लेखन सातत्याने करणाऱ्या डॉ. मीना प्रभू यांची प्रवासवर्णनाबरोबर कादंबरी आणि कवितासंग्रहही प्रकाशित झाले आहेत. पण त्यांची मराठी साहित्यात अमीट ओळख बनली आहे ती प्रवासवर्णनकार म्हणूनच. मराठी प्रवासवर्णनांचा परीघ डॉ. मीना प्रभू यांनी थेट पाचही खंडांपर्यंत नेऊन भिडवला. त्यांचे पहिले पुस्तक होते ‘माझं लंडन’.

मीना प्रभू यांचे शालेय शिक्षण पुणे व महाविद्यालयीन शिक्षण स. प. महाविद्यालयात झाले. येथे झाले. मीना प्रभू यांनी पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमधून त्यांनी एम.बी.बी.एस. केले. त्यानंतर मुंबईला जाऊन त्या डी.जी.ओ. झाल्या. १९६६ मध्ये लग्न झाल्यानंतर त्या इंग्लंडला गेल्या. त्यांनी अनेक वर्षे लंडनमध्ये भूलतज्ज्ञ आणि जनरल प्रॅक्टिशनर म्हणून काम केले.

प्रभू यांनी जगातल्या अनेक देशांत प्रवास करून प्रवासवर्णने लिहिली आहेत. मीना प्रभूंनी डझनभर प्रवासवर्णने केवळ लिहिली नसून, त्यातून जगातील निरनिराळ्या ठिकाणांची ज्ञान देणारी व रंजन करणारी विस्तृत माहितीही दिली आहे. प्रवासवर्णनावरील तब्बल बारा पुस्तके लिहिणाऱ्या मीना प्रभूंची ‘माझं लंडन’, ‘इजिप्तायन,’ ‘तुर्कनामा,’ ‘ग्रीकांजली,’ ‘चिनी माती’ अशी सारी पुस्तकं वाचकांच्या पसंतीस उतरली.

मीना प्रभू यांनी गोवा येथील महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले आहे. तसेच मीना प्रभू यांना दि. बा. मोकाशी पारितोषिक-२०१०, गो. नी. दांडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मृण्मयी पुरस्कार-२०११, न. चिं. केळकर पुरस्कार-२०१२ असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार पण मिळाले आहेत.

मीना प्रभू यांनी २०१७ मध्ये पुण्यात ‘प्रभू ज्ञानमंदिर’ हा अत्याधुनिक किंडल लायब्ररीचा प्रकल्प चालू केला आहे.

मीना प्रभू यांची पुस्तकं:

माझं लंडन : लंडनचा इतिहास आणि संस्कृतीचा आढावा, माय लंडन (हिंदीमध्ये), डायाना चार्ल्स : मुखवटयांमागचे चेहरे (कादंबरी), सुखनिधी तुझा माझा (कवितासंग्रह)

दक्षिणरंग : दक्षिण अमेरिकेतील प्रवासवर्णन, चिनीमाती : नवीन आणि जुन्या चीनबद्दलची माहिती, चिनी संस्कृती, इतिहास यांचे विश्लेषण,

मेक्सिको पर्व : सांस्कृतिक, भौगोलिक स्वरूप आणि जीवनशैली, इजिप्तायन : आहार, वारसा, सांस्कृतिक, इतिहास, गाथा इराणी : इराण,

तुर्कनामा : तुर्कस्तान

ग्रीकांजली : कला, साहित्य आणि संस्कृती अशा तीन अंगाने रोमबद्दलची माहिती, रोमराज्य : अ‍ॅमस्टरडॅम ते रोम (१), नेपल्स ते व्हेनिस (२), वाट तिबेटची : तिबेटचं खरं स्वरूप शोधण्याचा प्रयत्न,

न्यूयॉर्क-न्यूयॉर्क : एका नगरातील जग (न्यूयॉर्कची सगळी माहिती), जलपर्यटन, पूर्वेकडील देशांतील भटकंती, आफ्रिका खंडातील पर्यटन.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*