मिलिंद तुळाणकर यांचा जन्म २५ फेब्रुवारीला भंडारा येथे झाला.
मिलिंद तुळाणकर हे सुमारे ३५ हून अधिक वर्षं जलतरंग वाजवत आहेत. जलतरंग हे प्राचीन भारतीय वाद्य असून ते वाजविणाऱ्या व्यक्ती दुर्मीळ आहेत. ‘ही ६४ कलांमधील एक कला आहे. या वाद्याला जलवाद्य किंवा ‘जलतंत्री वीणा’ असेही म्हणतात. यात कमीतकमी १२, तर जास्तीत जास्त २६ भांडी असतात. भांड्यांची रचना मोठ्यापासून छोट्यापर्यंत, अर्धवर्तुळाकार स्वरूपात केली जाते.
मिलिंद तुळाणकर यांचे आजोबा (आईचे वडील) पंडित शंकर कान्हेरे हे त्यांचे जलतरंगातले गुरू होत. मिलिंद तुळाणकर यांच्या घरी आणि आजोळीही सांगीतिक वातावरण होतं. त्यांची आजी स्नेहलता कान्हेरे साताऱ्याच्या होत त्या शाळेत संगीत शिक्षिका होती. त्या दिलरुबा वाजवत असत. मिलिंद तुळाणकर यांची आई सरिता तुळाणकर गायिका तर वडील श्रीराम तुळाणकर हे सतारवादक.
पुढे मिलिंद तुळाणकर यांचे दहावीपर्यंतचं शिक्षण सातार्या त झालं. सहावी- सातवीत असल्यापासून ते हार्मोनियम वाजवत असत. कडक शिस्तीच्या आजोबांनी मिलिंद तुळाणकर यांना जलतरंग शिकवायला सुरुवात केली तीही योगायोगानेच. आजोबा घरात नसताना छोटा मिलिंद आजोबांचं जलतरंग वाजवत असत, राग कोणता? वगैरे त्यावेळी समजत नसलं तरीही आजोबा जसे वाजवत तसेच वाजवायचा. एक दिवस त्यांच्या आजीनेच आजोबांना सांगितले की ‘मिलिंद अगदी हुबेहूब तुमच्यासारखा वाजवतो’, तेव्हा आजोबांसमोर मिलिंदजींनी पहिल्यांदा जलतरंग वाजवले आणि आजोबांनी जलतरंगासारख्या दुर्मिळ वाद्याचा वसा मिलिंदजींना दिला.
अर्थात, घरात सांगीतिक वातावरण असलं की लोकांच्या अपेक्षाही खूप असतात आणि त्याचा कधी कधी तोटाही होतो. पण सुदैवाने मिलिंदजींच्याबाबतीत असं घडलं नाही. उलट बी.ए च्या शेवटच्या पेपरच्याच दिवशी आकाशवाणीवर ऑडिशन असूनही आजोबांनी ‘पेपर नंतर देऊ शकशील, आत्ता ऑडिशन दे’ असा पाठिंबा दिला होता.
मिलिंद तुळाणकर यांनी अनेक परदेशी वाद्यवादकांबरोबरही जुगलबंदी केली आहे. गुड डे बिस्किटांच्या जाहिरातीच्या संगीतात मिलिंद तुळाणकर यांनी वाजवलेल्या जलतरंगाचा प्रामुख्याने वापर झाला आहे.
मिलिंद हे रागदारी बरोबर, पण सर्वसामान्यांमध्ये या वाद्याची गोडी निर्माण व्हावी यासाठी नाट्यगीत, भावगीत व चित्रपटगीतंही वाजवतात. चित्रपटांसाठी त्यांनी जलतरंगवर हिंदी, मराठी, इंग्रजी व तमीळ गीतंही वाजवली आहेत.
मिलिंद तुळाणकर यांना सुरसिंगार संसदेचा सुरमणी पुरस्कार, पुण्याचा कलागौरव पुरस्कार, राजीव गांधी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
जलतरंग आणि मिलिंद तुळाणकर यांच्याबद्दलची अधिक माहिती आणि त्यांच्या जलतरंगवादनाचे काही ऑडिओ/व्हीडिओ तुम्हाला त्यांच्या www.jaltarang.com या वेबसाईट वर पाहता येतील.
Leave a Reply