मोडक, जनार्दन बाळाजी

अतिशय विद्वान व लोकप्रिय शिक्षक व संस्कृत भाषेचे गाढे आभ्यासक म्हणून मान्यता असलेल्या जनार्दन बाळाजी मोडक यांची १८८२ मध्ये ठाण्याच्या नामांकित बी. जे. हायस्कुलमध्ये मुख्याध्यापक म्हणून नेमणूक झाली. भारताच्या प्राचीन संस्कृत साहित्याच्या नानाविध पैलुंबद्दल, विशेष संशोधन व उत्खनन केल्यामुळे भारताच्या असंख्य परंपरांमधून वाहणार्‍या ज्ञानगंगोत्रीचे तीर्थ ते कोळून प्यायले होते.

ठाण्याच्या ऐतिहासिक छटांना गडद करणारे, व सांस्कृतिकरित्या समृध्द अशा नगरीची अचूक उहापोह व उलगडा करणारे पहिले पुस्तक जनार्दन मोडक यांनी लिहीले होते. यामध्ये ठाण्याच्या इतिहासाविषयी इत्यंभूत माहिती देण्यात आली होती. आजही लोक एक बिनचूक मार्गदर्शक या नात्याने या पुस्तकाचा संदर्भ घेत आहेत. काही काळ काव्योतिहास संग्रह या मासिकाशी त्यांचा निकटचा संबंध होता.

लेखन व संशोधनशास्त्राबरोबरच भारताच्या प्राचीन ज्योतिषशास्त्राविषयी त्यांच्या मनी प्रचंड उत्सुकता होती. या शास्त्राच्या विवीध पैलुंची उकल करून त्याला नव्या विज्ञानवादी, ज्ञानप्रवाहांचा आयाम द्यायचा हे त्यांचे स्वप्न होते. ठाण्याचे सुप्रसिध्द ज्योतिषविद्वान शंकर बाळकृष्ण दिक्षित यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्याकाळातील ज्योतिर्विषारद विसाजी कृष्णा लेले यांच्या सायनेवादावरील लेखनाने ते खुपच प्रभावित झाले होते. या दोघांनी व ठाण्यातील प्रसिध्द कवी भास्कर पाळंदे अशा तिघा विद्वानांनी मिळून मराठी भाषेतील पहिल्या पंचांगाची निर्मिती करुन ते प्रसिध्द केले. त्यांच्या ज्योतिषाशास्त्राच्या सखोल आभ्यासामुळे तसेच परिपक्व व्यासंगामुळे, पाश्चात्य इतिहासकार फ्लांट व डॉ. सेबेल यांना भारतीय कालगणना करणे सोपे गेले.

 दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*