जयकुमार पाठारे

व्ही.आय.पी ब्रॅंडचे सर्वेसर्वा

व्यावसायिक व उद्योग वर्तुळात व्ही.आय.पी मॅन म्हणुन प्रसिध्द असलेल्या आणि व्ही.आय.पी ब्रॅंडचे सर्वेसर्वा जयकुमार पाठारे यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखं पण तितकंच प्रेरणादायी आहे.

कोल्हापूरात एका मध्यमवर्गीय कुटंबात जन्मलेल्या जयकुमार यांच्या वडिलांचं निधन जयकुमार लहान असतानाच झालं. आई पेशाने शिक्षिका परंतू अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही तिने मुलांना शिकवलं. जयकुमार यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरींग पूर्ण केलं व नोकरीसाठी ते मुंबईत दाखल झाले. राज्य विद्युत मंडळात ते अभियंता म्हणून रुजू झाले. १९५९ मध्ये त्यांची बदली उल्हासनगर येथे झाली. पण या बदलीने त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली. काम करत असताना झालेल्या अपघातामध्ये त्यांचा हात कायमचा तुटला. अशा परिस्थितीतसुध्दा विद्युत मंडळाने त्यांना नुकसान भरपाई न दिल्याच्या निषेधार्थ त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. पुढे महामंडळाचीच कामे कंत्राटी स्वरुपात ते घेऊ लागले. त्यानंतर त्यांनी होजिअरी उद्योगात पदार्पण केले.

व्ही.आय.पी या त्यांच्या मॅक्सवेल इंडस्ट्रीजचा ब्रॅण्डनी कमालीची लोकप्रियता मिळवली. या व्यवसायात उत्तम यश मिळाल्यानंतर त्यांनी शेती या उद्योगातही पदार्पण करण्याचे ठरवले. कल्याण तालुक्यातील रुंदे आणि फळेगावच्या दरम्यान काळू नदीकाठी १४० एकर जमीन घेतली. सुरुवातीच्या एका वर्षात जमिनीच्या मशागतीनंतर त्यांनी ६ बोअरवेल खणल्या. १ लाख लिटर क्षमतेच्या दोन टाक्या बांधल्या. म्हैसाणा जातीच्या ७० म्हशी विकत घेतल्या यामुळे शेकडो लिटर दूध मिळू लागले. याच जमिनीवर पालेभाज्या, फळभाज्या व आंब्याच्या विविध जातींची लागवड त्यांनी केली. बेहदाडा जांभूळ सारख्या १०० झाडांची आणि रसवंतीगृहासाठी लागणार्‍या ऊसाची लागवड ठाणे जिल्ह्यात यशस्वीरित्या करुन दाखवली. अवघ्या तीन वर्षातच शेतीतून १० लाखांचे उत्पन्न मिळवण्याची किमया जयकुमार यांनी साध्य केली.

आयुष्यातील स्वत:ची उद्दिष्टे व ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा ही आवश्यक असते. नोकरी त्यानंतर व्यवसाय आणि हौशेसाठी शेती अशा तिन्ही क्षेत्रात जयकुमार पाठारे यशस्वीरित्या वावरले व स्वकतृत्वाच्या बळावर शून्यातूनही विश्वाची निर्मिती करता येते हे जयकुमार यांनी सिध्द केलं आहे.

# Jaikumar Pathare
VIP Hosiery Brand

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*