तळेकर, गंगाराम

Talekar, Gangaram

Gangaram Talekar

कुशल संघटन कौशल्य आणि हजरजबाबीपणा या गुणांवर कॉर्पोरेट जगताला मॅनेटमेंटचे धडे देणारे आणि मुंबईतल्या प्रसिध्द अश्या डबेवाला संघटनेचे अध्यक्ष असलेले गंगाराम तळेकर हे मूळचे पुण्यातील गडद जिल्ह्यातले; त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले असले तरी आपल्या व्यवसायात उत्तुंग यश संपादन केले .

१८९० साली महादेव हवाजी बच्चे यांनी १०० सहकार्‍यांसह डबे पोहोचविण्याचा व्यवसाय सुरू केला. आपल्या आजोबांना, म्हणजेच लक्ष्मण तळेकरांच्या व्यवसायात हातभार लावण्यासाठी वयाच्या चौदाव्या वर्षी या कामाला सुरुवात केली. बेताची परिस्थिती असल्यामुळे शिक्षण अर्धवट सुटले असले तरी साहित्य-कलेचा व्यासंग सुटला नाही. ग्रंथोपासना, आध्यात्मिक निरुपणासोबतच रोजच्या जगण्यातल्या व्यवहारातलं तर्कशुद्ध व्यवस्थापनही त्यांनी समजून घेतले. स्वतः पहाटे उपाशी घराबाहेर पडणारा, मात्र इतरांना वेळेवर डबा पोहचवणार्‍या डबेवाल्याच्या कार्यपद्धतीचे नेमके विश्लेषण त्यांनी केले व त्याची लेखी नोंदही ठेवली. अभ्यासवह्यांमधून या कार्यपद्धतीचा एक आराखडा तयार केला.

तीन दशकांहून अधिक काळ अविरतपणे हे काम करणारे तळेकर एका अर्थाने डबेवाल्यांचे कुशल संघटक तर होतेच, पण ते या अल्पशिक्षित कष्टकर्‍यांचे गुरुही होते. गेल्या सव्वाशे वर्षांतल्या इतिहासात अनेक स्थित्यंतर झाली असली तरी त्यांचा व्यवसाय आजतागायत सुरु आहे; म्हणूनच अवघ्या चौतीस सदस्यांसोबत सुरु झालेल्या या संघटनेचे आज मुंबईत चार हजारांहून अधिक सदस्य आहेत आणि त्यातूनच स्वयंरोजगाराची निर्मिती झाली आहे. गुणवत्तेनुरुप जबाबदारीचे वाटप अन् सहकार्‍यांवरचा पूर्ण विश्वास हे त्यांच्या कार्याचे गमक होते. सत्तेची सूत्रं स्वतःकडे न ठेवता “ना मालक ना कामगार” तत्वाने त्यांनी डबेवाल्यांची संघटना वाढवली. त्यात कामाचे श्रेय ज्याचे त्याला दिले.

बदलत्या काळानुसार गंगाराम तळेकरांनी संघटनेच्या कामाची नाळ विविध सामाजिक उपक्रमांशी बांधली. दहीहंडीमधील जखमी गोविंदाना मदत करणे असो किंवा बेळगाव प्रश्नी आवाज उठवणे, तळेकरांनी डबेवाल्यांमध्ये सामाजिक जाणीव देखील निर्माण केली. संघटनेला जागतिक व्याप्तीकडे नेतानाच त्यांनी आळंदीमध्ये डबेवाल्यांसाठी धर्मशाळा बांधण्याचं स्वप्नही पाहिले होते. ते स्वप्न अधुरे राहिले असले तरी ते पूर्ण करण्याची जिद्द ते आपल्या डबेवाल्यांत पेरून गेले.

कायम पांढरा झब्बा, लेंगा आणि गांधी टोपी अशा मराठमोळ्या वेषात वावरणार्‍या तळेकरांनी आपल्या संस्कृतीचे दर्शन जगाला करुन दिले. इंग्लंडचा राजपुत्र “प्रिन्स चार्लस्” यांनी तळेकरांना इंग्लंडला बोलावून त्यांचा खास सन्मान केला होता. अमेरिकेत फिलाडेल्फिया येथे झालेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात डबेवाल्यांचे प्रतिनिधी म्हणून गंगाराम तळेकर हे रघुनाथ मेदगे यांच्यासह उपस्थित होते. लंडनमधील जमाल इराणी यांनी सुरु केलेल्या “टिफिन बाईटस्” या उपहारगृहाचा प्रसारासाठी तळेकर यांचं बहुमोल असे योगदान आहे

“मुंबईचा डबेवाला” या पुस्तकामधून समाजाच्या प्रत्येक वर्गापर्यंत डबेवाल्यांची कार्यपद्धती पोहचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. २९ डिसेंबर २०१४ या दिवशी म्हणजे वयाच्या ६८व्या वर्षी ह्रदयविकराच्या तीव्र झटक्याने गंगाराम तळेकर यांचे निधन झाले.

(लेखन व संशोधन – सागर मालडकर)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*