चंदू तथा चंद्रकांत हरी डेगवेकर

डेगवेकर यांचे मूळ घराणे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील. डेगवेकर यांचा जन्मही इथलाच. त्यांचा जन्म १६ जानेवारी १९३४ रोजी झाला. इंग्रजी तिसरीपर्यंतचे त्यांचे शिक्षण श्रीवर्धन येथेच झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत आले. गिरगाव येथील विल्सन हायस्कूल येथे त्यांचे पुढील शिक्षण झाले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ‘मॅट्रिक’ झाल्यानंतर सुरुवातीला त्यांनी छोटी-मोठी कामे केली. पुढे ‘सीटीओ’ (पोस्ट अॅाण्ड टेलिग्राफ)मध्ये त्यांना ‘फोनोग्राम ऑपरेटर’ म्हणून नोकरी लागली.

गणेशोत्सवात वेगवेगळ्या नाटकांतून त्यांनी कामेही केली. गिरगावातील गायवाडी येथील बंडोपंत रानडे यांच्याकडे ते काही काळ गाणेही शिकले. त्या वेळी काही संगीत नाटकांतूनही त्यांनी छोट्या-मोठ्या भूमिका केल्या होत्या.

चंडू डेगवेकर यांनी राज्य नाट्य स्पर्धेत मराठा मंदिर कला केंद्र या संस्थेने सादर केलेल्या आणि बाळ कोल्हटकर यांनी गाजविलेल्या ‘मुंबईची माणसे’ या नाटकातील ‘वसंत’ ही भूमिका साकारली. या भूमिकेसाठी त्यांना राज्य नाट्य स्पर्धेचे पारितोषिक व चिंतामणराव कोल्हटकर पारितोषिक मिळाले.

‘पंडितराज जगन्नाथ’ या १९६८ साली आलेल्या नाटकाद्वारे ते नट म्हणून ठळकपणे पुढे आले. या त्यांच्या पहिल्याच नाटकात त्यांनी कलंदरखाँच्या इरसाल भूमिकेत गायलेले ‘इश्क के गहरे खतरे में बडे भी खा गये ठोकर’ हे कव्वालीवजा पद प्रचंड दाद घेऊन जाई.

पंडितराज जगन्नाेथमध्ये कलंदरखाँची भूमिका आधी शंकर घाणेकर करत असत. त्यांनी कंपनी सोडल्यानंतर ‘ललितकलादर्श’च्या भालचंद्र पेंढारकरांच्या हाताला चंदू डेगवेकर नावाचा हिरा लागल्याने. डेग्वेकरांनी अगदी आयत्यावेळी पंडितराज जगन्ना’थ या नाटकातली भूमिका वठवली. पुढे ‘बावनखणी’ या नाटकापर्यंत चंदू डेगवेकर हे ‘ललितकलादर्श’चे महत्त्वाचे नट होते.

डेगवेकर यांनी आत्तापर्यंत सुमारे ५० संगीत, सामाजिक, ऐतिहासिक नाटके तसेच फार्समधून विविध भूमिका साकार केल्या आहेत. ‘शारदा’ (कांचनभट), ‘सौभद्र’ (बलराम), ‘मृच्छकटीक’ (शकार), ‘मानापमान’ (धैर्यधर), ‘मत्स्यगंधा’ (भीष्म), ‘स्वयंवर’ (शिशुपाल), ‘संशयकल्लोळ’ (फाल्गुनराव),‘भावबंधन’ (प्रभाकर व कामण्णा), ‘एकच प्याला’ (भगीरथ, शरद), ‘पंडितराज जगन्नाथ’ (कलंदर), ‘मंदारमाला’ (भैरव), ‘सुवर्णतुला’ (नारद), ‘जय जय गौरी शंकर’ (शृंगी), ‘स्वरसम्राज्ञी’ (भय्यासाहेब), ‘बावनखणी’ (मोरशास्त्री) ही डेगवेकर यांची गाजलेली संगीत नाटके.

‘दुरितांचे तिमीर जावो’मधील त्यांनी साकारलेला ‘बापू’ही गाजला. ‘बेबंदशाही’, ‘ययाती आणि देवयानी’, ‘उद्याचा संसार’, ‘लग्नाची बेडी’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘देव दिनाघरी धावला’, ‘अपराध मीच केला’, ‘साष्टांग नमस्कार’ आदी ऐतिहासिक, सामाजिक नाटकांतूनतसेच ‘गीत सौभद्र’, ‘महाश्वेता’ आदी संगीतिकांमधूनही त्यांनी भूमिका केल्या. डेगवेकर यांना अखिल भारतीय मराठी नाटय़परिषदेच्या ‘जीवनगौरव’पुरस्कारासह गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे पुरस्कार, रंगशारदा संस्थेचा विद्याधर गोखले पुरस्कार, नाटय़ परिषद-पुणे यांचा केशवराव दाते पुरस्कार, गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार आदींनी सन्मानित करण्यात आले आहे. राज्य शासनाचा अण्णासाहेब किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*