खोत, चंद्रकांत

Khot, Chandrakant

चंद्रकांत खोत यांचा जन्म भीमाशंकर येथे ७ सप्टेंबर १९४० रोजी झाला. त्यांची घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांच्या वडिलांनी सर्व मुलांना सातवीपर्यंत शिक्षण घेऊ दिले. पण त्यानंतर नोकरीधंद्याचे बघा असे सांगितले. मात्र शिक्षणाची ओढ असलेले चंद्रकांत खोत यांनी स्वत:चे पुढील शिक्षण स्वकष्टाने पूर्ण केले. एम.ए. झाल्यावर त्यांनी पीएच.डी. करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी सत्तरच्या दशकातील कवितांचा मागोवा घेतला. पण पीएचडीसाठी गाईड न मिळाल्यामुळे खोत यांचे डॉक्टरेटचे स्वप्न अधुरेच राहिले. पण तोपर्यंत खोत यांनी साहित्य क्षेत्रात स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले होते. विशेष म्हणजे खोत यांना पीएचडी करता आली नसली तरी त्यांचाच मुळगावातील एका तरुणाने खोत आणि त्यांचे साहित्य यावर पीएच.डी. करुन डॉक्टरेटची पदवी मिळवली होती.

चंद्रकांत खोत हे साहित्य क्षेत्रात पदार्पण केले ते कवी म्हणून. १९६९ मध्ये प्रकाशित झालेला “मर्तिक” हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. यानंतर ते कादंबरी लेखनाकडे वळले. १९७० मध्ये पुरुष वेश्या या बोल्ड विषयावर आधारित “उभयान्वयी अन्वय” ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध झाली व साहित्य क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली.

त्यानंतर दोन वर्षांनी “बिनधास्त” आणि १९७४ मध्ये प्रसिद्ध झालेली “विषयांतर” ही कादंबरीदेखील लैंगिक विषयावर आधारीत होती. या कादंबर्‍यांमध्ये कामगार वस्तीतील जीवन, या भागांमध्ये होणार्‍या लैंगिक घुसमट याचे वर्णन अगदी हुबेहुब केले होते.

“अबकडई” या दिवाळी अंकाचे चंद्रकांत खोत यांनी अनेक वर्षे संपादन केले. रुळलेल्या वाटेवरून चालणार्‍या
मराठी साहित्यिकांना या अंकांनी आणि त्यांच्या वेगळ्या बोल्ड शैलीने अनेक धक्के दिले.खोत यांनी कादंबरी,
चरित्र, कथा या साहित्यप्रकारात विपुल लेखन केले यामधील उल्लेखनीय म्हणजे; अंकाक्षर ज्ञान (संपादित
अंकलिपी), अनाथांचा नाथ (साईबाबांचे आत्मनिवेदनात्मक चरित्र), अपभ्रंश (कवितासंग्रह किंवा कादंबरी),
अलख निरंजन (नवनाथांच्या जीवनावर), गण गण गणात बोते (गजानन महाराजांचे चरित्र), चनिया मनिया
बोर (मुलांसाठी कथा), दोन डोळे शेजारी (शारदामाता यांच्या जीवनावरील आत्मनिवेदनात्मक कादंबरी), मेरा
नाम है शंकर (धनकवडीच्या शंकर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी), संन्याशाची सावली (विवेकानंदांच्या
जीवनावरील कादंबरी), हम गया नही, जिंदा है (स्वामी समर्थांच्या जीवनावरील कादंबरी), दुरेघी (दोन
दीर्घकथा).

त्यासोबतच यशोदा या चित्रपटासाठी गीतलेखन देखील केले यामधील “घुमला हृदयी नाद हा”, “धर धर धरा”,
“माळते मी माळते” ही गीते लोकप्रिय ठरली;

मुंबईच्या परळ-लालबागच्या वातावरणात वाढलेले खोत मालवणी मुलखातला ठसक्यात कुणाचाही मुलाहिजा न
ठेवता बोलत असत. १९९५ नंतर ते अज्ञातवासात गेले होते. सुमारे १५ वर्षांनी ते प्रकट झाले तेव्हा त्यांच्या
डोक्‍यावरील फरकॅप गायब झाली होती. पठाणी वेशातील त्यांचे व्यक्तिमत्त्व लोप पावले होते. पांढरीशुभ्र मोठी
दाढी त्यांच्या छातीवर रुळत होती. ते कुठे होते, हे त्यांनी कुणालाही सांगितले नाही. मात्र काही जण म्हणत
असत की खोत हिमालयात गेले होते, कारण त्यांचा कल आध्यात्मिकतेकडे झुकला होता. भगवी वैराग्यवृत्ती
अंगावर वागवत ते चिंचपोकळीजवळच्या डिलाईल रोडवरील साईबाबा मंदिरात बसून नास्मस्मरणात वेळ
व्यतित केला.

चंद्रकांत खोत यांचे अखेरचे जीवन अत्यंत हालाखीचे गेले. कारण त्यांना रहाण्यासाठी हक्काचे घर देखील
नव्हते. त्यांनी अखेरचा श्‍वासही साईबाबा मंदिरात घेतला. १० डिसेंबर २०१४ रोजी त्यांचे निधन झाले. तत्पूर्वी
म्हणजे ७ सप्टेंबर २०१४ला त्यांचा मित्र परिवाराने अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा केला होता.

( लेखन व संशोधन – सागर मालाडकर )

1 Comment on खोत, चंद्रकांत

  1. अबकडई हे दिवाळी अंक कोणत्या सालपासून कोणत्या सालपर्यंत निघाले हे कळू शकेल काय?

Leave a Reply

Your email address will not be published.


*