सोलापूर – नामवंत व्यक्तीमत्वे

सिद्धरामेश्र्वर – पूर्वीच्या काळी थोर शिवभक्त शिवयोगी सिद्धरामेश्र्वर सोलापुरात होऊन गेले. सिद्धारामेश्र्वर यांनी सोलापूरला अडुसष्ट (६८) शिवलिंगांची स्थापना करून येथील धार्मिक माहात्म्य वाढवले. आपल्या शिष्यांसह एका सुंदर तळ्याची निर्मिती केली. याच तळ्याच्या मध्यभागी शिवमंदिर आहे व येथेच सिद्धरामेश्र्वर यांची शिवयोग समाधी आहे. तळ्याच्या मध्यभागी हे शिवमंदिर असल्याने देशातील हे एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे.

संत शुभराय महाराज – तेलुगू भाषिक असलेले संत शुभराय महाराज हे देखील सुमारे ३५ वर्षे सोलापुरात होते. तेलुगूसह मराठी, उर्दू, संस्कृत, फारसी अशा अनेक भाषा त्यांना अवगत होत्या. शुभराय यांनी अस्खलित मराठीत भक्तिपर पदे रचली आहेत. ही पदे आजही महाराष्ट्रात व कर्नाटकात गायली जातात. विनोबा भावेंच्या रोजच्या प्रार्थनेत शुभरायांचे पद होते. शुभराय हे थोर ईश्र्वरभक्त होते, कवी होते तसेच ते संगीत साधक होते व उच्चप्रतीचे चित्रकारही होते. त्यांनी रामायण व महाभारतावर आधारीत सुमारे ५०० चित्रे काढलेली आहेत.

संत सावता माळी – कांदा, मुळा भाजी, अवघी विठाई माझी म्हणत भक्तीचा मळा फुलवणारे संत सावता माळी सोलापूर जिल्ह्यातलेच, संत चोखामेळा, कान्होपात्रा इथलेच आणि दुष्काळात बादशहाची धान्याची कोठारे लोकांना खुली करणारे संत दामाजीपंत याच जिल्ह्यातल्या मंगळवेढ्याचे.

श्री स्वामी समर्थ – श्री स्वामी समर्थ याच जिल्ह्यातील अक्कलकोट येथे २१ वर्षे वास्तव्यास होते. येथेच त्यांची समाधी आहे. आज अक्कलकोट हे महाराष्ट्रातील एक प्रमुख तीर्थस्थान बनलेले आहे.

राम जोशी – लावणीकार शाहीर राम जोशीही याच जिल्ह्यातले. राम जोशी लावण्याही रचत तसेच कीर्तनेही करत असत. शुभराय महाराजांनी राम जोशी यांना उपदेश केल्यानंतर राम जोशी यांनी डफ फोडून टाकला व लावणी सोडली अशी कथा सोलापुरात प्रसिद्ध आहे.

साहित्यसम्राट न.चि. केळकर – साहित्यसम्राट न.चि. केळकर यांचा जन्म जिल्ह्यातील मोडनिंब या गावी झाला, तर नवकवितेचे प्रवर्तक बा. सी. मर्ढेकर जिल्ह्यातील मर्ढे या गावचे.

डॉ. द्वारकानाथ कोटणीस – युद्धकाळात रुग्ण सैनिकांची सेवा करून भारताचे नाव जगभर उज्ज्वल करणारे डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे जन्मगाव सोलापूर असून, येथे त्यांचे स्मारकही आहे.

कवी संजीव (कृ. गं. दीक्षित) – तो शूरपणा आता रणात कसा नाही। इतिहास मराठ्यांचा स्मरणात कसा नाही।। अशा प्रखर कवितांसह सुंदर भावगीते लिहिणारे कवी संजीव (कृ. गं. दीक्षित) हेही सोलापूर जिल्ह्यातलेच होते.

प्रख्यात चित्रकार एम.एफ. हुसेन व ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातलेच. अक्करमाशी या कादंबरीतील वास्तवदर्शी लेखनातून महाराष्ट्राला हादरवून टाकणारे शरणकुमार लिंबाळे; साहित्य अकादमी पुरस्कार विजेते अनुवादक प्रा. निशिकांत ठकार, कवी लक्ष्मीनारायण बोल्ली हेही याच जिल्ह्यातले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*