सोलापूर जिल्हयाला आध्यात्मिक महत्व प्राप्त झाले आहे ते येथील महाराष्ट्राचे कुलदैवत व दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरपूर व अक्कलकोटसारख्या सुप्रसिध्द देवस्थानांमुळे. अनेक संतांच्या अस्तित्वामुळे सोलापूर जिल्ह्याला संतांची भूमी म्हटले जाते. मध्ययुगीन काळात बहामनी राजवटीत सोलापुरात बांधला गेलेला किल्लाबांधणी शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेला भुईकोट किल्ला हे या जिल्ह्याचे खास वैशिष्ट्य. पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचा जिल्हा; सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलुगू, कन्नड व मराठी असा भाषा-त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा म्हणून सोलापूर प्रसिद्ध आहे.