बीड जिल्ह्याची भौगोलिक माहिती

बीड जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या जवळजवळ मध्यभागी स्थित आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात मोडतो. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे.या जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र बीड हे आहे. महाराष्ट्रातील ऊसतोड़ कामगारांचा जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे,त्यामुळे राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर ऊसतोडीसाठी बहुधा बीडचा कामगार असतो. बीड हा जिल्हा सहकारी तत्त्वावरील म्हणूनही ओळखला जातो. बीड हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात मराठी व्यतिरीक्त हिंदी, तेलुगू, उर्दू या भाषादेखील बोलल्या जातात.
बीड जिल्ह्याचा अधिक भाग हा दुर्गम अणि डोंगराळ आहे. जिल्ह्यातील उत्तर भाग सपाट मैदानं आहे. जिल्ह्याच्या मध्य-दक्षिण भाग बालाघाटच्या डोंगराळ आहे. येथे चिंचोली, नेकनुर भाग येतो. या भागास मांजरथडी असेही म्हणतात. मांजरसुभाहून बीडकडे जाताना पालीघाट लागतो. गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. या भागास गंगथडी असेही म्हणतात. हा सुपीक भाग गाळापासून बनला आहे. यामध्ये गेवराई, माजलगाव व परळी या तालुक्यांचा समावेश होतो.
हवामान:
जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणत: उष्ण व कोरडे आहे. स्थळपरत्वे जिल्ह्यातील हवामानात थोडाफार फरक आढळतो. उन्हाळा मोठा व कडक असतो तर हिवाळा कमी कालावधीचा पण सौम्य असतो. डिसेंबर महिन्यात तापमान कमीतकमी असते. उन्हाळ्यात दिवसा तापमान बरेच वाढत असले तरी रात्री ते कमी होते. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील उंचावरील बालाघाट डोंगराळ प्रदेशातील हवामान काहीसे थंड आहे तर सखल भागात ते उबदार व थोडेसे दमट आहे. अंबेजोगाई तालुक्यातील हवामान अधिकच आल्हाददायक असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधील पाऊस पडतो पण पावसाचे प्रमाण अतिशय कमी असून त्यामध्ये अनियमितता आहे. त्यामुळे जिल्ह्याचा बराचसा भाग अवर्षणग्रस्त आहे. जो पाऊस पडतो त्याचे जिल्ह्यातील वितरणही असमान आहे. पावसाचे प्रमाण पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होत गेलेले आढळून येते. जिल्ह्याच्या पूर्वेकडील अंबेजोगाई, केज, माजलगाव,परळी, धारूर आदी तालुक्यात तो तुलनात्मकदृष्टया अधिक पडतो तर गेवराई, आष्टी, पाटोदा, शिरूर यांसारख्या तालुक्यात तो खूपच कमी पडतो. जिल्ह्यातील गेवराई, पाटोदा, बीड, माजलगाव, केज, आष्टी या तालुक्यांचा केंद्र शासनाने निश्चित केलेल्या अवर्षणप्रवण क्षेत्रात समावेश होतो.
नद्या:
गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. काही अंतरापर्यत तिने औरंगाबाद-बीड, जालना-बीड व परभणी-बीड अशा जिल्ह्य सीमा निश्चित केल्या आहेत. गोदावरीची वाहण्याची दिशा साधारणपणे वायव्येकडून आग्नेयेकडे आहे. ती जिल्ह्याच्या गेवराई, माजलगाव व परळी तालुक्यांतुन वाहत जाते. जिल्ह्यातील सिंधफणा, वाण, सरस्वती या गोदावरीच्या उपनद्या आहेत. रेना नदी, वाण नदी व सरस्वती नदी या बीड जिल्ह्यातील मध्य डोंगराळ भागात उगम पावतात व दक्षिणकडे वाहत जाऊन पुढे गोदावरीस मिळतात.
मांजरा ही बीड जिल्ह्यातील दुसरी महत्त्वाची नदी आहे. ही नदी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यातील हरिश्चंद्र बालेघाटच्या पर्वतरांगामध्ये उगम पावते. ही नदी सुरुवातीस उत्तर-दक्षिण असा प्रवास करून नंतर जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहत जाऊन पुढे लातूर जिल्ह्यात प्रवेशते. तिचा बराचसा प्रवास गोदावरीला काहीसा समांतर असा होतो. बर्‍याच ठिकाणी या नदीने अहमदनगर-बीड, उस्मानाबाद-बीड व लातूर-बीड या जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमेचे कार्य केले आहे. सुमारे ७२५ कि.मी. अंतराचा प्रवास करत आंध्र प्रदेशात जाऊन गोदावरी नदीस मिळते. बीड जिल्ह्यातील केज, रेना, लिंबा व चौसाळा या मांजरा नदीच्या उपनद्या असून त्या बालाघाटच्या डोंगराळ प्रदेशात उगम पावून जिल्ह्यातच मांजरा नदीस मिळतात.
सिधंफणा नदी पाटोदा तालुक्यात चिंचोली टेकडयात उगम पावते. प्रथम उत्तरेकडे, नंतर पूर्वेकडे व तदनंदर पुन्हा उत्तरेकडे, किंबहुना ईशान्येकडे प्रवास करीत माजलगाव तालुक्यात मंजरथजवळ गोदावरीस मिळते. सिधंफणा नदीवर बीडजिल्ह्यातील मोठा धरण आहे. बिंदुसरा नदी बीड तालुक्यातील डोंगराळ परिसरात उगम पावते. ही सिधंफणाची एक उपनदी आहे. बिंदुसरा नदीवर बीडजवळ जिल्ह्यातील मोठा धरणप्रकल्प आहे. बिंदुसरा नदी बीड शहरातून वाहत जाऊन पुढे सिंधफणेस मिळते. पुढे सिंदफणा गोदावरीला मिळते. कुंडलिका ही सिंधफणेची एक उपनदी बीड जिल्ह्यातच उगम पावून जिल्ह्यातच सिंधफणेस मिळते. सीना नदी जिल्ह्याच्या व आष्टी तालुक्याच्याही नैऋत्य सीमेवरून वाहते. काही अंतरापर्यत तिने अहमदनगर व बीड जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमा म्हणून काम केले. आहे. त्याच वेळी तिने अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुका व बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका यांची सीमारेषाही स्पष्ट केली आहे. पाटोदा तालुक्यातील डोंगराळ परिसरात उगम पावणारी विंचरणा नदी वाहत जाऊन पुढे सौताडा येथे विंचरणेचा प्रवाह सुमारे सत्तर मीटर उंचीवरून दरीत कोसळतो.

Auf der https://schreib-essay.com/bachelorarbeit/ anderen seite ist zu gewährleisten, dass die erarbeitung gewissen grundlegenden prinzipien gerecht wird

1 Comment on बीड जिल्ह्याची भौगोलिक माहिती

Leave a Reply to Umesh egade Cancel reply

Your email address will not be published.


*