बीड जिल्हा

 भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी असलेलं परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यात आहे. तसेच या परिसराशी जोडले गेलेले रामायणातील संदर्भ, अंबेजोगाई येथील श्री योगेश्र्वरी देवीचे स्थान यामुळे बीड जिल्हा संपूर्ण भारतात धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांसाठी हा जिल्हा प्रसिद्ध असून नायगाव येथे मोरांसाठीचे अभयारण्य आहे. आद्यकवी मुकुंदराज, संतकवी दासोपंत, स्वामी रामानंदतीर्थ इत्यादी व्यक्तिमत्त्वांमुळेही बीड जिल्हा महत्त्वपूर्ण असल्याचे लक्षात येते. हैद्राबाद (मराठवाडा) मुक्ती संग्रामात स्वामी रामानंदतीर्थ यांच्या नेतृत्वाखाली बीडची भूमिका महत्त्वाची होती.