नाशिक जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

धार्मिक आणि अध्यात्मिक अधिष्ठान लाभलेला नाशिक जिल्हा पर्यटनाच्या विविध अंगांनी नटलेला आहे. नैसर्गिक आणि जैविक वैविध्य जिल्ह्याच्या समृध्दतेचे एक अविभाज्य अंग आहे. रामकुंड परीसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेथे मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला ते काळाराम मंदिरदेखील पर्यटकांचे खास आकर्षण राहिले आहे. याशिवाय सीतागुंफा, तपोवन, पांडव लेणी, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक गणले जाणारे त्र्यंबकेश्‍वर ही ठिकाणे प्रसिद्ध आहे.
निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या इगतपुरीतील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विपश्यना केंद्र, जवळच असणारे भंडारदरा धरण, धुक्यांच्या दुलईत हरवणारा कसारा घाट, कावनई व टाकेद सारखी ऐतिहासिक धार्मिक स्थळे पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहेत.महाराष्ट्रातील ‘चेरापुंजी’ म्हणून इगतपुरी तालुक्याची खरी ओळख असली तरी अवघा नाशिक जिल्हा गड-किल्ल्यांसाठी तेवढाच प्रसिद्ध आहे. रतनगड, साल्हेर-मुल्हेर, ओंधा-पट्टा, धोडप, कौळाणे, मरकडेय, रामशेज व अनकाई असे सह्याद्रीच्या रांगेतील अनेक गड-किल्ले पर्यटकांना खुणावत असतात. द्राक्षबागांनी बहरलेल्या निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर म्हणजे हजारो स्थलांतरित पक्ष्यांचे हक्काचे ठिकाण. वन विभागाच्या माहितीनुसार १५० जातींचे परदेशी व स्थानिक पक्षी येथे पाहायला मिळतात. फ्लेमिंगो, स्पुनबिन, ग्रे व परपल हेरॉन, पेंटेड स्कॉर्क, आयबीस, टिल्ट यांचा प्रामुख्याने त्यात समावेश आहे. पक्षीनिरीक्षणासाठी वन विभागाने येथे निरीक्षण मनोरे उभारले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*