सावरकर, विश्वासराव

स्वा. सावरकर- नेताजी सुभाषचंद भेट, स्वा. सावरकर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर भेट, स्वा. सावरकर- गाडगे महाराज भेट, रत्नागिरी येथील पतितपावन मंदिराची स्थापना, स्वातंत्र्यवीरांचे दलितोद्धाराचे कार्य तसेच गांधीहत्येनंतर घडलेल्या अनेक घटना यांचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या विश्वासरावांनी बर्‍याच प्रमाणात लिखाणही केले आहे. ते एका मोठ्या, प्रदिर्घ व ऐतिहासीक कालखंडाचे महत्वपुर्ण व एकमेव साक्षीदार होते.

‘आठवणी अंगाराच्या’ या त्यांच्या पुस्तकातून त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातील काही महत्त्वाचे क्षण टिपणारे त्यांचे हे पुस्तक चांगलेच गाजले होते. दिवाभीताचे प्रलाप, कथा क्रांतिवीराच्या (स्वातंत्र्यवीरांचे क्रांतिकारक बंधू बाबाराव सावरकर यांच्या जीवनावरील ग्रंथ) ही विश्वासरावांची अन्य गाजलेली पुस्तके आहेत. गेले काही महिने वार्धक्यामुळे प्रकृती साथ देत नव्हती. त्यातच त्यांना कंपवाताने ग्रासले होते. तरीही त्यांचे लिखाणाचे काम अधूनमधून सुरू होते. विश्वासराव हे प्रत्यक्ष राजकारणात कधीही आले नाहीत. मात्र त्यांना राजकारणाची उत्तम जाण होती. स्वभावाने मितभाषी असलेले विश्वासराव स्वातंत्र्यवीरांच्या आठवणी सांगताना मात्र खुलून जात.

२२ जून १९४० रोजी नेताजी सुभाषचंद बोस स्वातंत्र्यवीर सावरकरांना भेटण्यासाठी सावरकर सदनात आले होते. या गुप्त भेटीतच नेताजींनी भारताबाहेर निसटून जपान, जर्मनीचे सहकार्य घ्यावे आणि ब्रिटिशांविरुद्ध प्रत्यक्ष लढा सुरू करावा याबाबतची योजना ठरली. या ऐतिहासिक भेटीचे विश्वासराव हे एकमेव साक्षीदार होते. रत्नागिरी येथे स्थानबद्धतेत असताना स्वातंत्र्यवीरांना भेटायला महात्मा गांधी कस्तुरबांसह तेथे गेले होते. त्यावेळी १२ वर्षांचे वय असलेल्या विश्वासरावांना या भेटीची चांगलीच आठवण होती.

महात्माजींना स्वातंत्र्यवीरांबद्दल खूप आदर होता आणि कस्तुरबाही स्वातंत्र्यवीरांची पत्नी यमुनाबाई यांचा आदर करीत, ही बाब विश्वासराव अभिमानाने सांगत. स्वातंत्र्यवीर मुस्लीमद्वेष्टे कधीही नव्हते, उलट सर सिकंदर हयात खान आणि बॅ. असफ अली तसेच दोन ख्रिश्चन व्यक्ती अभिनव भारत चळवळीत त्यांचे सहकारी होते, अशी माहिती विश्वासराव नेहमी देत. स्वातंत्र्यवीरांच्या विचारांबद्दल बहुसंख्य लोकांना माहिती नाही, म्हणून ते त्यांच्याबद्दल चुकीची वक्तव्ये करतात अशी खंत विश्वासराव व्यक्त करीत. सावरकर सदनाला ऐतिहासिक वास्तूचा दर्जा मिळविण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. परंतु दुदैर्वाने त्यांना त्यात यश आले नाही. तत्कालीन केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी अंदमानातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकावरील काव्यपंक्ती पुसून टाकल्या होत्या. त्याला विश्वासरावांनी कडाडून विरोध केला होता. एका महान क्रांतिकारकाचे पितृत्व लाभलेले विश्वासराव सर्वसामान्य माणसासारखे आयुष्य जगले. त्यांनी कधीही आणि कोणताही बडेजाव केला नाही. त्यांनी, वयोमानानुसार निवृत्त होईपर्यंत, हिन्दुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीत काम केले.

( संदर्भस्त्रोत- महाराष्ट्र टाईम्स )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*