नाईक, वसंतराव

 

वसंतराव नाईक यांची मुख्यमंत्री म्हणून एक तपाची कारकीर्द स्थैर्य व गतिमान विकास यासाठी उल्लेखनीय ठरली. दोन युद्धे, तीन मोठी राज्यव्यापी अवर्षण यासारख्या संकटांना तोंड देतानाच त्यांनी शेतीचा अमूलाग्र विकास करुन महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत जवळजवळ स्वयंपूर्ण बनविला; म्हणूनच त्यांना महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे प्रणेते मानले जाते. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील
गहुली या छोट्याशा खेडेगावातून वसंतरावांचे नेतृत्व उदयास आले. त्यांच्या निवडीने महाराष्ट्राचे नेतृत्व खेड्यातच नव्हे, तर दर्‍याखोर्‍यांतील झोपडीपर्यंत पोहचले. आज देशभरात पोहोचलेली “रोजगार हमी योजना” महाराष्ट्रातच उगम पावली आहे. अर्थात याचे बरेचसे श्रेय वसंतराव नाईक यांना द्यावे लागते. त्यांच्या कारकिर्दीत जमिनी ओलिताखाली आणण्याचा धडक कार्यक्रम राबविण्यात आला. मोठ्या प्रमाणात विहिर, तलाव दुरुस्ती करण्यात आली. नव्या शेतीतंत्राला चालना देण्यात आली. संकरित बी-बियाणे वापराबरोबरच, “पाणी अडवा, पाणी जिरवा” मोहिमेला प्रोत्साहन देण्यात आले. आरे कॉलनीचा विकास करण्यात आला. पशुपालन, कुक्कुटपालन उद्योगाला प्रोत्साहन दिले गेले. कृषी विद्यापिठांची स्थापना कृषी मालाच्या भावावर नियंत्रण, एकाधिकार धान्य खरेदी, शेतीमालाला किफायतशीर किंमत याविषयीचे धोरण आखण्यात आले. स्वातंत्र्य सैनिकांना निवृत्ती वेतन, मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज व सवलती देण्यात आल्या. शेतीक्षेत्रातील वसंतराव नाईक यांचे योगदान अतुलनीय आहे. एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द सदैव स्मरणात राहणार आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*