यादव, स्वप्नाली

वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये अल्पवयीन भारतीय खेळाडुंनी दाखविलेले प्राविण्य आता जगमान्य झाले आहे. या क्रीडाप्रकारांमध्ये  आव्हानात्मक क्रीडाप्रकाराची भर पडली आहे ती म्हणजे जलतरण ! जगभरातून वाखाणल्या गेलेल्या या क्रीडाप्रकाराच्या रथी-महारथींमध्ये आपल्या अफाट कौशल्याच्या व आत्मविश्वासाच्या जोरावर अढळस्थान मिळविणारी मराठी मुलगी म्हणजेच स्वप्नाली यादव.

खर्‍या अर्थाने ती आज समुद्राच्या लाटांवर राज्य करते आहे, मास्यांनाही हरवेल असा वेग व उर्जा तिने कमावली आहे. लहानपणापासून तिने केलेल्या अथक परिश्रमांच्या व सरावांच्या एकत्रीकरणामुळे, जलतरणाच्या [पोहण्याच्या] जवळजवळ सर्व शैल्या, तंत्रे व कौशल्ये तिने अतिशय उत्साहाने व प्रभावीपणे आत्मसात केली आहेत. सहा वर्षांची असताना वडिलांसह ती अंधेरीच्या जलतरण तलावामध्ये जायची. पाण्यात मनसोक्त खेळता खेळता, तंत्रशुध्द पोहोण्याची आवड तिला जडली. त्यानंतर आठ वर्षांची असल्यापासुन उरण ते धरमतर, ग्रीस चॅनल, बर्म्युडा बेटावरील स्पर्धा, अमेरिकेत अठरा वर्षांखालील मुलींमध्ये प्रथम क्रमांक तसेच ऑष्ट्रेलियातील कॅनबेरा येथील स्पर्धेत बारा वर्षांखालील मुलींमध्ये तिने प्रथम क्रमांक पटकावला होता. परंतु हा विक्रम फिका पडावा पराक्रम तिने  केला, तो म्हणजे पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या कुनुनुरा शहरापासून ७५ किलोमीटर अंतरावर लेक अर्जिल हा जगातील सर्वात मोठा म्हणजे ८० कि.मी. लांबीचा मानवनिर्मीत तलाव तिने सर्वांनाच चकित करणार्‍या वेगाने व सहजतेने, सर्रकन पार केला व विशेष म्हणजे तेही ३५ हजार मगरींच्या जिवंत सहवासात! या जीवाची परिक्षा पाहणार्‍या स्पर्धात्मक जलतरणात ती केवळ यशस्वीरित्या तगच धरू शकली नाही तर या स्पर्धेत प्रथम येण्याचा मानही तिने पटकावला. या स्पर्धेत भाग घेण्याकरिता किमान चौदा वर्षांची वयोमर्यादा असतानाही १२वर्षीय स्वनालीसाठी खास परवानगी देण्यात आली होती. कारण संयोजकांना तिच्या यापुर्वी केलेल्या गौरवास्पद कामगिरीची चांगली माहिती होती. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्वप्नाली आपल्या आईसह केवळ एक दिवस आधी तिथे गेली होती. संयोजकांनी स्पर्धकांसाठी या स्पर्धेची, तलावातील मगरींची माहिती देण्यासाठी जे माहितीसत्र ठेविले होते त्याला ती उपस्थित नसल्याने तिचे छोटे वय व उत्साह पाहून त्यांनी तिच्यासाठी पुन्हा माहिती दिली. प्रत्यक्षात स्पर्धेला सुरूवात झाल्यानंतर स्वप्नाली हे सारे विसरून जोमाने पोहायला लागली व बघता बघता १० कि.मी. अंतरही तिने पार केले. पाण्यातुन डोके वर काढले की उन्हाचे चटकेही जाणवत होते व त्याच वेळी बाजुने गेलेल्या मगरीची सळसळ तिला जाणवली. क्षणभर तिच्या मनाचा थरकाप उडाला. महिलांमध्ये अव्वल क्रमांक पटकावत तिने भारताचे नाव उज्ज्वल केले. तेथील वर्तमानपत्रांनीही तिचा ”क्रोकोडाईल प्रिंसेस” म्हणून गौरव केला.

प्रगत प्रशिक्षण घ्यायची स्वप्नालीची तयारी असल्यास तिला ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांनी नागरिकत्व देण्याची तयारीही दर्शविली आहे. जिम्नॅटिक्स, सायकलिंग, बॅडमिंटन, टेनिस हे तिचे आवडते खेळ असुन राज्यस्तरीय ट्रायथलॉन, व अ‍ॅक्वेथलॉन स्पर्धांमध्ये तिने सुवर्णपदके मिळवीली आहेत. औरंगाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत ती महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*