स्मिता तळवलकर

मराठी चित्रपटांमधली यशस्वी “वुमन फिल्ममेकर” तसंच प्रतिभावान व संवेदनशील अभिनेत्री, दिग्दर्शक म्हणून ज्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते अश्या स्मिता तळवलकरांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात १९७२ साली दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून केली. त्यानंतर पुढची तीन दशकं रुपेरी पडदा, दूरचित्रवाणी मालिका व रंगभूमीवर आपल्या दर्जेदार अभिनयाचा रसिकांच्या मनावर ठसा उमटवला.

स्मिता तळवलकर यांनी अस्मिता चित्र या प्रॉडक्शन हाऊसची स्थापना करुन अनेक मालिक व चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन देखील केले होते. सामाजिक, स्त्री प्रधान, कौटुंबिक पार्श्वभूमी असणार्याव विषयांना प्रेक्षकांनीही पसंत केले. त्यांच्या अभिनय व निर्मितीला व्यावसायिक यश मिळाले हे विशेष !

“तू सौभाग्यवती हो”, “गडबड घोटाळा”, “कळत नकळत”, “शिवरायांची सून ताराबाई”, “चौकट राजा”, “सवत माझी लाडकी”, “खट्याळ सासू नाठाळ सून”, “तू तिथं मी”, “जन्म”, “चेकमेट ”, “टोपी घाला रे” , “आनंदाचे झाड” , “सातच्या आत घरात” , “अडगुळं मडगुळं”, “एक होती वाडी” , “श्यामचे वडील” , “या गोल गोल डब्यातला”, “धतिंग धिंगाणा”, “प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं” अश्या आशय संपन्न चित्रपटांच्या माध्यमातून अभिनय, निर्मिती व दिग्दर्शन केले.

ज्याकाळात प्रेक्षकवर्ग चित्रपटगृहाकडे फिरकेनासा झाला त्यावेळी “चौकट राजा”, “तू तिथं मी”, “ सातच्या आत घरात ”, “सवत माझी लाडकी”, अश्या चित्रपटांमुळे प्रेक्षक त्यांच्या सिनेमाला गर्दी करु लागला.

मराठी चित्रपटांचं मार्केटिंग तंत्र अवगत करुन वितरणाची जबाबदारी स्मिताजींनी यशस्वीरित्या सांभाळली. तसंच “घरकुल”, “ पेशवाई”, “ अवंतिका”, “ऊन पाऊस” , “कथा एक आनंदीची” , “अर्धांगिनी” , “ सुवासिनी” , “उंच माझा झोका” , “नुपूर”, “ अभिलाषा ”, “ गोष्ट एका लग्नाच ”, “ गोष्ट एका लग्नाची ”, “ अनुपमा ”, यासारख्या २५ मालिकांची निर्मिती व अभिनयाची धुरा समर्थपणे पेलली .

निर्मिती करत असताना स्मिता तळवरकर यांना असंख्य आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले होते. पण कलेचा घेतलेला वसा त्यांनी तसुभर पण कमी होऊ दिला नाही तर उलट उत्तम कलाकृती त्या रसिकांना देत राहिल्या.

“देखणी बायको दुसर्यााची” , “ कुणी गोविंद घ्या” , “ कुणी गोपाळ घ्या” , “छावा”, “तो एक क्षण” , “ आहे मनोहर तरी” , “ दुर्गाबाई जरा जपून” अश्या नाटकांमधून मराठी रंगभूमीवर सुध्दा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.

आपल्या कारकीर्दी मध्ये स्मिता तळवलकर यांना “कळत नकळत” व “ तू तिथं मी ” या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. “कळत नकळत” या सिनेमाचा राज्य शासनाच्या १३ पारितोषिकांनी गौरव करण्यात आला होता. त्याचप्रमाणे “सवत माझी लाडकी” , “सातच्या आत घरात”, “चौकट राजा” ,अश्या चित्रपटांना सुध्दा महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. चौकट राजा या चित्रपटाची “इंडियन पॅनोरमा फिल्म फेस्टीव्हल” साठी करण्यात आलेली होती.

याशिवाय स्मिता तळवलकर यांना १९९८ रोजी महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा ग.दि.मा पुरस्कार “ तू तिथे मी” या चित्रपटासाठी देण्यात आला तर, २०११ सालचा महाराष्ट्र शासनाचा व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले होते.

स्मिता तळवलकर यांना २०१० रोजी कर्करोगाचे निदान झाले होते. पण या दुर्दम्य आजारावर मात करत पुन्हा त्या जिद्दीने उभ्या राहिल्या. पण काही वर्षांनी पुन्हा या आजाराने डोके वर काढल्यामुळे त्यांचा हा आजार बळावत गेला. मुंबईच्या जसलोक रुगणालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना अखेर ६ ऑगस्ट २०१४ या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू समयी स्मिता तळवलकर ५९ वर्षांच्या होत्या.त्यांच्या अकाली झालेल्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली गेली.

(लेखन व संशोधन – सागर मालाडकर)

अधिक माहितीसाठी क्लिक करा
मराठी चित्रपट, नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री व वृत्तनिवेदिका, निर्मात्या आणि दिग्दर्शक स्मिता तळवलकर

स्मिता तळवलकर

अभिनेत्री व वृत्तनिवेदिका, निर्मात्या आणि दिग्दर्शक स्मिता तळवलकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*