संत गाडगेबाबा

Sant Gadgebaba

१८७६-१९५६

जन्मगाव: अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेणगाव .
जन्मदिनांक: २३, फेब्रुवारी १८७६
मूळनाव: डेबुजी झिंगराजी जानोरकर

संत मालिकेतील पहिले संत ज्ञानेश्वर होत. संत मालिकेचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला. नामदेवांनी त्याचा भारतभर विस्तार केला. नाथांनी त्यावर इमारत बांधली व तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला. उरलेले कार्य गाडगेबाबांनी सिध्दीस नेले. म्हणूनच संत गाडगेबाबा हे संत मालिकेतील ‘शिरोमणी‘ म्हणून ओळखले जातात. मागील संतानी जो मार्ग दाखविला, त्यावर चालण्याचे काम गाडगेबाबांनी केले, समाजात धर्माच्या नावाखाली होत असलेला अन्याय, अत्याचार, अनीती दूर करण्यासाठी ते जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत झगडले. त्यांनी ५०-६० वर्षे महाराष्ट्राची निस्वार्थ बुध्दीने सेवा केली.

अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा विरोध, कीर्तनाव्दारे लोक जागृती. चोरी करू नका, कर्ज काढू नका, व्यसनाच्या अधीन होऊनका. देवा-धर्माच्या नावाने प्राण्यांची हत्या करू नका, अस्पृश्यता पाळू नका.गोधडेबुवा, चिंधे बुवा, लोटके महाराज या नावाने प्रसिध्द. कीर्तनातून लोकजागृती. महाराष्ट्र समाजाचे व्यासपीठ स्वच्छता, प्रामाणिकपणा व भूतद्या यावर भर. देव दगड-धोंडयात नसून माणसात आहे. गादी वा मठ न स्थापणे. धार्मिक क्षेत्री धर्मशाळा बांधणे, गोरगरिबांसाठी रूग्णालये, नदीकाठी घाट बांधणे, अपंगासाठी अन्नछत्रे काढणे, कुष्ठरोग्यांची सेवा.

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात शेगाव नावाच्या गावात झिंगराजी व सखुबाई यांच्या पोटी १३ फेब्रूवारी १८७६ रोजी त्यांचा जन्म झाला. तो दिवस महाशिवरात्रीच होता. त्यांचे लहानपणीचे नाव डेबूजी असे होते. झिंगराजी शेतीचे काम करून त्यावर उपजीविका करत होते. त्यांची परमेश्वरावर नितांत श्रध्दा होती. थोडयाच वर्षानंतर गाडगेबाबांच्या वडीलांचा मृत्यू झाला. त्यांच्या आईने त्यांना त्यांच्या माहेरी आणले. त्या गावाचे नाव दापुरे असे होते. त्यांचा मामा कर्तबगार पुरूष होते. हळूहळू मोठा होऊ लागला. डेबूजीचा नित्यक्रम फारच सुंदर होता. सकाळी लवकर उठून प्रथम गुरांचा गोठा साफ करावा, मामाकडे मिळेल त्या ताज्या, शिळया भाकरीची न्याहरी करावी, दुपारच्या जेवणासाठी कांदाभाकरीची शिदोरी एका फडक्यात बांधून घ्यावी. दूपारी गुरांना स्वच्छ पाणी पाजून झाडाच्या सावलीत विश्रांतीला उभे करणे. नंतर स्वतः जेवण करून एखादया वृक्षाखाली ‘रामकृष्ण हरी, जयजय रामकृष्ण हरी‘ भजन गात विश्रांती घ्यावी. गावात रोज भजन चालत असे. डेबूजी भजनात जाऊन बसे. बालपणापासूनच भूतदया डेबूजीच्या रक्तामासांत भिनली होती. आंधळे-पांगळे, लंगडे-लुळे, कुष्ठरोगी यांच्याविषयी त्याला नेहमीच कळवळा वाटे. स्वतः जन्मतः अक्षरशून्य, गरीब परीट कुळातील मुलाला बालवयात एवढा समतावाद कळावा ही काय साधारण गोष्ट आहे. वयाच्या १६ व्या वर्षी डेबूजीचे लग्न झाले होते. काही वर्षानंतर मामांचे शेत सावकाराने घशात घातले. हा धक्का मामाला सहन झाला नसल्याने मामा मरण पावले. त्यानंतर सावकाराने डेबूजींना मारण्यासाठी चार-पाच गुंड पाठविले. डेबूजीनी त्या गुंडाना पिटाळून लावले. लोक डेबूजीना ‘देवसिंग‘ या नावाने ओळखू लागले. डेबूजीना कन्यारत्न झालं. सुखी संसारात त्यांचे मन रमेना दुसर्‍यांचा दुःखमय संसार सुखी करण्याची इच्छा सदैव त्यांच्या मनात होती. त्यांना दुसरा मुलगा झाला पण मुलाचे थोडयाच दिवसांत निधन झालं.

एका आज्ञात विभूतीच्या हाकेला ओ देऊन आपला सुखाचा संसार सोडून १ फेब्रूवारी १९०५ या दिवशी पहाटे ३ वाजता जगाचा संसार सुखी करण्यासाठी डेबूजी घराबाहेर पडले. डेबूजीने उंबरठा ओलांडला केवळ गोरगरीब लोकांच्या उध्दारासाठी. एका उच्च ध्येयांच्या प्राप्तीसाठी आत्मोध्दारासाठी. त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला. डेबूजीच्या त्यागामध्ये कर्तव्याची तळमळ होती. दीनदुबळयांच्या भल्यासाठी डेबूजीने काटेरी मार्गाचा अवलंब केला. देशभ्रमणात लोकांची दयनीय अवस्था पाहिली. खर्या देवाला समाज विसरला आहे. कर्जापायी त्याची स्थिती दयनीय झाली आहे. आज्ञात वासाच्या काळात तोंडावर, डोळयावर केसांचे वाढलेले जंगल. अंगावरच्या कपडयांच्या चिंध्या, कानाला अडकवलेली बांगडी आणि कवडी. एका हातात काठी तर एका हातात गाडगे. कुणी नाव विचारले तर ‘तुम्हाला पाहिजे त्या नावाने बोलवा. मला तर नावच माहीत नाही. ‘ म्हणून त्यांना कित्येक नावे पडली. त्यातून हातात गाडगे असायचे म्हणून लोक त्यांना ‘गाडगेबाबा‘ म्हणू लागले.

गाडगेबाबांचा वैरागी अवतार पाहतांना अगदी विचित्र वाटे. त्यामूळे त्यांना कोणी वेडा समजत, कोणी भिकारी समजत. त्यांना मंदिर व स्मशान सारखेच होते. भजनासाठी त्यांना मंदिर, मशीद, चर्च लागत नसे. निवांत स्थळी, नद्यानालांच्या काठी भजनाचा, किर्तनाच कार्यक्रम रंगत असे. बाबा एका गावात जास्त काळ कधीच थांबत नसत. पुढे कुठे जायायचे ते माहीत नसे. याच काळात ‘झाडूचा मंत्र‘ बाबांनी महाराष्ट्राला दिला. बाबा जेथे जेथे जात तेथे तेथे गावकर्यांचे मने जिंकून घेत. त्यातून गावाच्या सामूदायिक विहिरी, धर्मशाळा बांधायला सुरुवात केली. विषमतेवर व जास्तीभेदावर आघात करण्याची बाबांची पध्दत फारच परीणामकारक असे पण कधीकधी विनोदीही असायची. ‘सर्वांच्या जन्माची वाट एक आहे. आणि जायची सुध्दा मग हि शिवाशिवी कशासाठी?‘ हा कलंक धुवून निघाला पाहीजे. किर्तन हे बाबांचे समाज प्रबोधनाचे प्रभावी साधन बनले. ते अंधविश्वास, परंपरागत रूढी धर्माच्या नावावर चाललेलं शोषण या गोष्टींचे कटट्र विरोधक होते. मुर्तिपुजेपेक्षा गरीबांच्या सेवेकडे त्यांचे अधिक लक्ष होते. सामाजिक सुधारणा व्हावी, दारुबंधी व्हावी अंधश्रद्धा नष्ट व्हावी , सावकारशाहीचे समूळ उच्चाटन व्हावे, अस्पृश्यता नष्ट व्हावी, भेदभावाची कल्पना मानवाच्या मनातून निघून जावी, सर्वत्र शिक्षणाचा प्रसार व्हावा. या उदात्त कार्यासाठी त्यांनी सारी हायात खर्च केली. राष्ट्रीय व सामाजिक कार्यासाठी त्यांनी जे कार्य केले त्याला तोड नाही.

बाबांनी आपल्या किर्तनातून शोषण, काळाबाजार, व्यापारीवर्गाव्दारे होणारी शेतकर्‍याची लूट या गोष्टीवर भरपूर प्रकाश टाकला. म्हणूनच बाबांना समाजवादी संत हे नामाभिमान शोभून दिसते. दीनदुबळयांची सेवा हे त्यांच्या जीवनाचे व्रत होते. भूकेल्यांना जेवण, तहानलेल्यांना पाणी, बेकारांना काम, उघडया नागडयांना वस्त्र , बेघरांना घरे रोग्यांना औषधोपचार, गरीब मुला-मुलींना शिक्षणाची सोय, पशूपक्षादी मुक प्राण्यांना अभय यातच खरा धर्म आहे असे ते समजत. यालाच ते ईश्वराची सेवा समजत होते.

१९०८ मध्ये पुर्णा नदीवर घाटाचे निर्माण केले.
१९२५ ः मुर्तीजापूर येथे गोरक्षण , धर्मशाळा व विद्यालयाचे निर्माण केले.
१९१७ ः पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळेचे निर्माण गाडगेमहाराजांनी केले.
मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही“ असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.
फेब्रुवारी ८,इ.स. १९५२ रोजी ‘श्री गाडगेबाबा मिशन‘ स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या.
गाडगे महाराज जातीने परिट व गोधडे महाराज म्हणून ओळखले जात होते.
१९३२ ः ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले.
गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला.
“गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला“ हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते.
आचार्य अत्रे गाडगेबाबां बद्दल म्हणतात ‘सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात‘
१९३१ ः वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.
१९५४ ः जे.जे. हॉस्पिटल धर्मशाळा ( मुंबई) बांधली.
गाडगे बाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती.
डॉ आंबेडकर सुद्धा त्यांना गुरू स्थानी मानत असत.
त्यांचा मृत्यू २० डिसेंबर १९५६ रोजी वलगाव (अमरावती) येथे झाला. गाडगेनगर, अमरावती येथे त्यांचे स्मारक आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

1 Comment on संत गाडगेबाबा

Leave a Reply

Your email address will not be published.


*