महेश कोठारे

महेश कोठारे हे मराठी नाट्यअभिनेते अंबर कोठारे यांचे पुत्र आहेत. त्यांनी छोटा जवान या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमधून त्यांनी बाल कलाकाराच्या भूमिका केल्या. त्यातील राजा और रंक या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका उल्लेखनीय मानली गेली. त्यांच्यावर चित्रित झालेले “तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है” हे गाणे विशेष लोकप्रिय ठरले.

महेश कोठारे यांनी आपले एल.एल बी. ही कायद्यातील पदवी मिळवली व काही वर्षे वकिलीदेखील केली. कोठारे यांनी त्यांची बालकलाकार अशी ओळख असतानादेखील नायक म्हणून चित्रपटात पदार्पण करण्याचे धाडस केले आणि ते यशस्वी ठरले. मुख्य नायकाच्या भूमिकेबरोबरच खलनायकी पात्र वठवण्याचे साहसही त्यांनी स्वीकारले. त्यांचे घरचा भेदी, लेक चालली सासरला अशी खलनायकी भूमिका असलेले चित्रपट लोकप्रिय ठरले. गुपचुप गुपचुप, थोरली जाऊ अशा चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकाही साकारल्या.

कारकीर्द भरात असताना कोठार्‍यांनी दिग्दर्शनात उतरण्याचा धाडसी निर्णयही घेतला. धूमधडाका हा त्यांनी अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती केलेला पहिला चित्रपट होता. या चित्रपटामधून लक्ष्मीकांत बेर्डे यांनाही मोठ्या प्रमाणात लोकप्रियता लाभली. त्यानंतरच्या त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काम केले आहे. स्वतः चित्रपटात असूनदेखील महेश कोठार्‍यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका दिली.

महेश कोठारे यांनी मराठी चित्रपटांत नवनवीन तंत्रज्ञान आणण्याचे प्रयोग केले. धडाकेबाज चित्रपटात बाटलीतील माणूस दाखविण्यासाठी त्यांनी अमेरिकावारी केली, तसेच झपाटलेला चित्रपटात बाहुली जिवंत दाखविण्यासाठी आधुनिक तंत्र वापरले. मराठी चित्रपटांमध्ये डॉल्बी डिजिटल ध्वनी पहिल्यांदा वापरण्याचे श्रेय कोठार्‍यांनाच जाते. त्यांना इ.स. २००९ साली महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.

महेश कोठारे यांनी दूरचित्रवाणी माध्यमातही दमदार पाऊल टाकले आहे. स्टार प्रवाह या मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवरील त्यांची मन उधाण वार्‍याचे ही मालिका लोकप्रिय ठरली.

अभिनयाबरोबरच दिग्दर्शनातही अव्वल कामगिरी करुन मराठी रसिकांना खिळवून ठेवणारे चित्रपट निर्माण करणारे महेश कोठारे हे एक प्रमुख मराठी अभिनेते आहेत. त्यांनी अभिनितदिग्दर्शीत केलेले धूमधडाका, दे दणादण, धडाकेबाज इ. चित्रपट अजूनही रसिकांच्या मनात रुंची घालतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*