गोर्‍हे, चंद्रशेखर शिवराम (कवी चंद्रशेखर)

Gorhe, Chandrashekhar Shivram (Kavi Chandrashekhar)

पंडिती काव्याचे एक श्रेष्ठ प्रतिनिधी, गंभीर, बोधपर आणि प्रौढ कविता करणारे कवी म्हणून चंद्रशेखर प्रसिद्ध होते.

२९ जानेवारी १८७१ रोजी नाशिक येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचं संपूर्ण नाव चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे. पण कवी म्हणून ‘कवी चंद्रशेखर’ या नावाने ते काव्य लिहित. त्यांचे प्राथमिक शिक्षण पंतोजीच्या शाळेत झाले तर पुढील शिक्षण सरकारी शाळेत झाले. प्रवेश परीक्षेपर्यंतचे आणि नंतरचे इंग्रजी शिक्षण नाशिक, बडोदे व पुणे येथे झाले. त्यानंतर अहमदाबाद येथे फोटोग्राफी शिकण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण त्यानंतर ते बडोद्यास आले. तिथे प्रथम त्यांनी दिवाणी खात्यात व नंतर वैद्यकीय खात्यात कारकुनाची नोकरी केली. नोकरी करत असतानाच सतत तीन तप ते काव्य रचना करीत असत. त्यांची काव्य संख्या ही मोठी आहे. तशीच ती गुणवत्तेनेही श्रेष्ठ आहे. तत्कालीन काव्याच्या प्रमुख परंपरांपासून अलिप्त असलेली निवेदनपर, बोधपर आणि प्रासंगिक स्वरूपाची अशी साधी सरळ कविता असली तरी पंडिती काव्याचा एक वजनदार असा स्वतःचा बाज त्यांच्या कवितेला होता. त्यातून काव्याकडे पहाण्याची त्यांची एक उपासकाची दृष्टीच दिसत असे. ‘चंद्रिका’ हा त्यांच्या स्फुटकवितांचा संग्रह प्रसिद्ध आहे. मिल्टनच्या ‘इल पेन्सरोझो’ आणि ‘ल आलेग्रो’ ह्या दीर्घ कवितांची त्यांनी मराठी भाषेमधे केलेली भाषांतरं ‘चितोपंत उदास’ व ‘रंगराव हर्षे’ सरस उतरली आहेत. एका आंग्ल बॅलर्डचे केलेले रूपांतर ‘काय हो चमत्कार’ हे आदर्श रूपांतराचा एक नमुनाच आहे. ‘चैतन्यदूत’ ‘धनगर’ आणि ‘तत्त्ववेत्ता’, ‘स्वदेशप्रीती’ ही त्यांची आणखी रूपांतरित पुस्तके. ‘उघडगुपित’ आणि ‘किस्मतपूरचा जमीनदार’ ही त्यांची स्वतंत्र कथाकाव्ये प्रसिद्ध आहेत. तर नाशिकच्या गोदावरी नदीचे वर्णन करणारे दीर्घकाव्य ‘गोदागौरव’ हे त्याकाळी चांगलेच गाजले होते.

अशा ह्या वेगळ्या ढंगात काव्य करणार्‍या या कवीचे १७ मार्च १९३७ रोजी निधन झाले.

1 Comment on गोर्‍हे, चंद्रशेखर शिवराम (कवी चंद्रशेखर)

Leave a Reply

Your email address will not be published.


*