माळी, जगदीश

अमिताभ बच्चन यांच्यापासून रेखा, आमीर खान, पूजा भट, करिश्‍मा कपूर शबाना आझमी, करिना कपूर, अनुपम खेर, ओम पुरी, इरफान खान यांच्यासह अनेक कलाकारांना आपल्या कॅमेर्‍याद्वारे ग्लॅमर प्राप्त करून देणारे ज्येष्ठ सिनेछायाचित्रकार जगदीश माळी यांनी एका चित्रपटविषयक मासिकापासूनक आपल्या फोटोग्राफीच्या कारकीर्दीला सुरवात केली. या मासिकासाठी फोटो काढत असताना हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांसोबत त्यांचे सलोख्याचे संबंध निर्माण झाले.

त्यानंतर त्यांनी स्वतंत्ररीत्या “फोटोग्राफी”ची सुरवात केली. कालांतराने माळी हे बॉलिवूडचे प्रसिद्ध छायाचित्रकार बनले. याकाळात त्यांनी नामवंत अभिनेते व अभिनेत्रींचे फोटो काढले; अभिनेत्री रेखाचे ते आवडते फोटोग्राफर होते. व त्या केव्हाही आणि कधीपण जगदीश माळी यांच्याकडूनच फोटो काढून घेत असे. जवळपास २२ वर्षांपेक्षाही अधिककाळ सिनेफोटोग्राफीच्या क्षेत्रात अनुभव असलेल्या जगदीश माळींनी अनेक जाहिराती आणि म्युझिक व्हिडिओसाठी काम केले होते. तंत्रज्ञान, संगणक व डिजिटल फोटोग्राफीच्या तंत्रामुळे छायाचित्रे काढण्याची गंमत, त्यातली कला लोप पावत चालल्याची खंतही जगदीश माळी व्यक्त करत असत. “संगणकातीलफोटोशॉप प्रणालीमध्ये छायाचित्रांवर विविध प्रकारचे काम करता येते, हवा तसा परिणाम मिळू शकतो. परंतु, त्यामुळे छायाचित्र काढण्यातील गंमत निघून गेली आहे”, असे माळींचे म्हणणे होते.

सिनेतार्‍यांना ग्लॅमरस लूक प्राप्त देणारे माळी यांच्यावर अखेरच्या काळात फारच विपन्नावस्था ओढवली होती. जानेवारी २०१३ च्या महिन्यात वांद्रे येथील रस्त्यावर बेवारस अवस्थेत सापडल्यानंतर बॉलिवुडमध्ये तखळबळ माजली होती. त्यांची कन्या अंतरा माळी ही देखील बॉलिवूडची तारका म्हणून होती. पण तरीही जगदीश माळी यांच्यावर अशी वेळ आल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. त्यावेळी अभिनेता सलमान खान याच्या “बिईंग ह्युमन” या सेवाभावी संस्थेतर्फे जगदीश माळी यांना लोणावळा येथे उपचारासाठी दाखल केले होते.

जगदीश माळी हे १९९८ साला पासूनच किडनीच्या विकाराने त्रस्त होते. गेल्या दहा दिवसांपासून त्यांचा आजार बळावल्यामुळे. त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर १३ मे २०१३ रोजी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

( लेखन व संशोधन – सागर मालाडकर )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*