भवाळकर, (डॉ.) तारा

लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांचं वर्णन ‘माय’वाटेवरची प्रवासिनी असंच करावं लागेल. कारण ‘लोकसंस्कृती’ ही व्यापक अर्थाने ‘माय’ म्हणजेच ‘मातृपरंपरा’ असल्याचं त्यांनी आपल्या लेखनातून वारंवार सिद्ध केलं आहे. ताराबाईंचं आजवरचं लोकसाहित्यविषयक लेखन वाचल्यावर महाराष्ट्रीय किंवा एकूणच भारतीय स्त्रीमन नव्यानं उलगडतं. बाईंनी लोकसाहित्याचे संशोधन करताना संकलित केलेल्या लोकगीत-लोककथांचा अन्वय लावून त्यांनी या सार्‍यांची सैध्दंतिक मांडणी करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच त्यांना मिळालेली ‘महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळा’ची सन्मानवृत्ती योग्यच आहे. त्यांच्या आजवरच्या ‘माय’वाटेवरच्या वाटचालीची दखल घेणारी आहे.

ताराबाईंच्या मनात ही ‘माय’वाट लहानपणीच रुजली होती. कारण शिक्षणासाठी त्यांचं वास्तव्य पुण्यात असलं, तरी वर्षातले सुट्टीचे दोन-तीन महिने ग्रामीण भागात असलेल्या मूळ गावी किंवा आजोळी मोठ्या मजेत जायचे. लहानपणी अनुभवलेली ही अनागर संस्कृती त्यांच्या अबोध मनात संचित स्वरूपात दडून राहिली व मोठेपणी जेव्हा लोकसाहित्याच्या क्षेत्रात त्यांनी काम करायला सुरुवात केली, तेव्हा जमिनीखाली दडलेला हा जिवंत झरा वाट मिळताच उसळून वर आला. नाटक हा ताराबाईंच्या अभ्यासाचा आणि आनंदाचा विषय होता. पण नाटकाची आवड त्यांच्या लोकसाहित्याच्या आड आली नाही. किंबहुना त्याची जोड त्यांनी आपल्या लोकसाहित्याच्या-लोकसंस्कृतीच्या अभ्यासाला दिली. त्यांचे ‘लोकनाट्यातील धामिर्कता आणि लौकिकता’, ‘लोककलांची आवाहकता’, ‘ब्रेख्तचा नाट्यविचार’ यांसारखे अभ्यासपूर्ण निबंध वाचले की, याची खात्री पटते. मात्र लोकसंस्कृतीचं अंधानुकरण ताराबाईंनी कधीच केलं नाही. ‘जुनं ते सोनंच’ असा त्यांचा आग्रह कधीच नव्हता. त्यामुळेच हाती लागलेल्या लोकवाड्:मयाच्या किंवा सामाजिक-सांस्कृतिक विधी-विधानांच्या केवळ स्मरणरंजनात त्या अडकल्या नाहीत. त्यांनी कायम त्याला शास्त्राची परिपुर्ण कसोटी लावण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळेच लोकसाहित्यविषयक संकलनातून त्या भारतीय स्त्रीच्या स्थिती-गतीचा वेध घेऊ शकल्या. लोकमानसात रुजलेल्या ‘लोकरामायणा’चा त्यांनी याच दृष्टिकोनातून वेध घेतला आहे आणि तो सजगपणे घेतल्यामुळेच लोकरामायण हे खर्‍या अर्थाने ‘सीतायन’ असल्याचं त्या ठामपणे सांगू शकल्या. लोकसाहित्याचा-लोकसंसस्कृतीचा असा साक्षेपी अभ्यास करणार्‍या ताराबाईंचे आजवर लोकसंचित, मिथक आणि नाटक, लोकनागर रंगभूमी, यक्षगान आणि मराठी नाट्यपरंपरा (डॉ. एम. एस. कृष्णमूर्ती यांच्या सहयोगाने), महामाया (डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या सहयोगाने), लोकसाहित्यातील स्त्रीप्रतिमा, मायवाटेचा मागोवा असे अनेक अभ्यासपूर्ण ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*