म्हसकर, (डॉ.) सुभाष रामकृष्ण

Mhaskar, (Dr) Subhash

ठाण्यातील ज्येष्ठ डॉक्टर सुभाष रामकृष्ण म्हसकर यांच्या घराण्यात गेली शंभर वर्षे डॉक्टरी व्यवसाय परंपरेने चालत आलेला आहे. एका शतकात आत्तापर्यंतच्या पाच पिढ्यांमध्ये एका घराण्यात ५४ यशस्वी डॉक्टर्स निपजले ही एक विक्रमी घटना म्हणता येईल.

शंभर वर्षांपूर्वी अत्याधुनिक साधने, उपकरणे व सोयीसुविधा नसताना डॉ. सुभाष म्हसकरांच्या डॉक्टर आजोबांनी अंमळनेरमध्ये किडनी स्टोनमुळे व्याधीग्रस्त व गंभीर झालेल्या एका शेतकऱ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून एक नारळाएवढा मोठा मूतखडा अतिशय कौशल्याने बाहेर काढून त्याला जीवदान दिले. त्याकाळी वैद्यकीय जगात ही घटना अपूर्व ठरली. त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. इंग्रज सरकार व अधिकारी या घटनेने थक्क झाले. जगातला सर्वात मोठ्या आकाराचा मूतखडा म्हणून त्याची सर्वदूर ख्याती झाली. रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स, लंडन येथील म्युझियममध्ये आजही तो मूतखडा दाखविला जातो. त्यांच्या वडिलांनी आशिया खंडातले सर्वात मोठे मोबाइल हॉस्पिटल उभे करून आदिवासी रुग्णांची वीस वर्षे सेवा केली.

आपल्या कुटुंबाचा हा उज्ज्वल व गौरवशाली वारसा डॉ. सुभाष म्हसकर यांनी ठाण्यात चालवला. १९६० च्या दशकात ठाणे शहरात एक्सरे, ब्लड बँक, पॅथॉलॉजी यांसारख्या वैद्यकीय सुविधा फारशा उपलब्ध नव्हत्या. आपल्या अनेक सहकार्‍यांच्या मदतीने गेल्या ३५ वर्षांत अशा सुविधा उभ्या करून सुमारे ३५,००० लोकांना माफक किमतीत योग्य उपचार करून हजारोंचा दुवा मिळविला.

चाळीस वर्षांपूर्वी पोलिओ डोस देण्याचे एकही केंद्र ठाण्यात नव्हते. ठाणे व उपनगरातले लोक त्यावेळी परळ येथे हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये चार-चार तास रांगेत उभे राहून तो डोस घेत असत. डॉ. म्हसकरांनी स्वत: पुढाकार घेऊन ठाण्यामध्ये पोलिओ लसीकरण केंद सुरू केले. त्यामुळे दीड लाख मुलांना येथेच विनासायास डोस घेता आले.

१९६०च्या दशकात कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याचा यक्षप्रश्न उग्र बनला होता. त्यावेळी डॉ. म्हसकरांनी हजारो कामगारांची तपासणी केली. भारतातली अशा प्रकारची पहिली खाजगी व्हॅन ठरली. डॉक्टरांनी थेट अमेरिका व इंग्लंडमध्ये जाऊन प्रथमोपचाराचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले. अत्याधुनिक उपकरणे येथे आणली. एवढेच नव्हे तर महाराष्ट्र व गुजरातमधील प्रसिद्ध कंपन्यांमध्ये जाऊन आजवर ४५,००० लोकांना त्यात प्रशिक्षित केले. या कार्याबद्दल त्यांना ‘पद्मश्री विखे पाटील’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

१९७८ ते १९९० या काळात त्यांनी कामगार विमा योजनेचे सर्वात मोठे निदान केंद चालविले. चार लाख लोकांचे आरोग्य सुस्थितीत राखण्याचे काम त्यांनी केले.

जागतिक पुस्तकदिनाच्या मुहूर्तावर ‘इतिहास वैद्यकशास्त्राचा’ हा ज्ञानाचा ठेवा त्यांनी पुस्तकरूपाने वाचकांना उपलब्ध करून दिला आहे.  या २६० पानी पुस्तकात अनेक शोधांची माहिती व सर्व पॅथींचे वस्तुनिष्ठ विवेचन आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*