फडके, दिगंबर त्र्यंबक (श्याम फडके)

श्याम फडके यांचे मुळ नाव दिगंबर त्र्यंबक फडके. त्यांचा जन्म ठाण्यामध्ये २६ सप्टेंबर १९३१ रोजी झाला. बी. एस्सी. व एम. एड. चं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते डॉ. बेडेकर विद्यामंदिराचे काही वर्षे मुख्याध्यापक व ज्ञानसाधना विद्यालयाचे पहिले प्राचार्य होते.

८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद भुषविणार्‍या मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेच्या कार्यकारिणीवर काही काळ त्यांनी अध्यक्ष म्हणून सुध्दा काम पाहिले. नाटक हा त्यांचा आवडीचा विषय असल्यामुळे सुरूवातीला त्यांनी नाटकांमधून कामे केली. त्यामुळे नाट्यलेखनाची आवड निर्माण झाली. सुरुवातीच्या काळात त्यांनी एकांकिका तसंच लहान मुलांसाठी विनोदी व समाजातील सर्वच स्तरावरील प्रेक्षकांसाठी नाटके लिहिली.

“एक होतं भांडणपुर”,“राजकन्या निलमपरी”,“हिमगौरी आणि सात बुटके”, यांसारखी त्यांनी लिहिलेली बाल नाटके लोकप्रिय ठरली. “आठ तासांचा जीव” हे एक सामाजिक नाटक, त्याव्यतिरीक्त “का असंच का?”, “अर्ध्याच्या शोधात दोन” या गंभीर नाटकांचे लेखन सुध्दा दिगंबरजींनी केले होते.

“काका किशाचा” हे विनोदप्रधान नाटक सुप्रसिध्द फार्स म्हणून खुप गाजले. तसंच “खोटे बाई, आता जा” हे त्यांचे नाटक नाटयप्रेमींच्या सदैव स्मरणात राहिल. काही काळ ठाण्यातील नाटयचळवळीशी शाम फडके यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध राहिलेले आहेत. हौशी नाटयचळवळीला प्रोत्साहन मिळावे यासाठी संग्रहालयाच्या सभागृहाचा उपयोग त्यांनी लघु नाटय थिएटरसारखा करून घेतला होता. चांदणे संमेलनासारखे रात्रभर साहित्यिक कार्यक्रम घडविणारे संमेलन काही वर्षे त्यांच्याच अध्यक्षतेखाली संग्रहालयाने साजरे केले आहेत.

लेखन: सागर मालाडकर

दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*