गोखले, बापू

Gokhale, Bapu

अतिशय शूरवीर असे मराठेशाहीचे शेवटचे सेनापती म्हणून ओळखले जातात ते म्हणजे बापू गोखले. कोकणातील तळेखाजण या गावी बापू गोखले यांचा जन्म झाला. बापू गोखले यांचे मूळ नाव नरहर गणेश गोखले. सरदार धोडोपंत गोखले हे त्यांचे काका. त्यांच्या अनेक लढायांमध्ये बापू गोखल्यांचा सहभाग असे. धोडोपंतांच्या निधनानंतर त्यांची सरदारकी नरहर गणेश गोखले तथा बापू गोखले यांना पेशव्यांनी दिली. त्यानंतर म्हैसूरचा वाघ म्हणून गाजलेल्या टिपू सुलतानाविरूद्ध लढाईत त्यांनी आपली तलवार गाजविली. त्यांच्या पराक्रमाचे बक्षीस म्हणून पेशव्यांनी गोखले यांची नेमणूक धारवाड प्रांतात केली. त्यानंतर गोखले यांनी आपल्या तलवारीच्या धाकाने पराक्रम गाजविला. पटवर्धन, वाघ, चतुरसिंग आणि ताई तेलीण इत्यादींनी केलेली बंडे त्यांनी मोडून काढली. बाजीराव पेशव्यांच्या काळात एक पाठीराखा सरदार म्हणून बापू गोखले सदैव पेशव्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळे खुश होऊन बाजीराव पेशव्यांनी १८१२ मध्ये त्यांना सेनापतीपद बहाल केले. इंग्रजांशी अनेकवेळा लढत देऊन त्यांना पराभूत करणारा मराठ्यांचा अखेरचा

हा सेनापती होता. पेशव्यांच्या काही खास विश्वासू माणसांमध्ये सेनापती गोखले यांचे महत्त्वाचे स्थान होते. आष्टीच्या लढाईत प्राणपणाने लढताना दि. २० फेब्रुवारी १८१८ रोजी या सेनापतीचे निधन झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*