शिक्षेनी नाही तर क्षमा केल्याने चूक सुधारत असते

काशीला एक विद्वान पंडित रहात असत. त्यांचा मोठमोठ्या ग्रंथांचा अभ्यास होता त्यामुळे साहजिकच त्यांच्याकडे जुन्या-नव्या ग्रंथांचा खूप मोठा संग्रह होता. त्यात एक अत्यंत प्राचीन असा तत्त्वज्ञानावरील दुर्मीळ ग्रंथ होता. पंडितांच्याकडे कधी सल्लामसलतीसाठी तर कधी धार्मिक किवा तात्त्विक चर्चेसाठी अनेक विद्वान पंडित, धर्मगुरु येत असत. एकदा एका धर्मगुरूंनी तो दुर्मीळ ग्रंथ वाचायला म्हणून घेतला आणि जाताना बरोबर नेला. ग्रंथाची चोरी लगेच लक्षात आली. ग्रंथ कोणी नेला हे पंडितांच्या लक्षात आले होते पण त्याबद्दल ते फारसे कोणाशी बोलले नाहीत. तिकडे त्या धर्मगुरूंनी तो ग्रंथ विकायला काढला. तो दुर्मीळ ग्रंथ त्यांनी एका श्रीमंत शेठजींना विकायच्या उद्देशाने दाखविला. पण ग्रंथ किती महत्त्वाचा आहे हे माहिती करून घेण्यासाठी शेठजी तो ग्रंथ घेऊन त्या पंडितांकडे आले. पंडितांनी तो ग्रंथ पाहिला, ओळखला सुद्धा ! आणि म्हणाले,‘‘ग्रंथ अनमोल आहे.’’ हे ऐकताच शेठजींनी धर्मगुरूंना आपला होकार कळवला. धर्मगुरूंनी शेठजींना विचारले,‘‘तुम्ही हा ग्रंथ कुणाला दाखविलात ?’’ शेठजींनी उत्तर दिले, ‘‘अर्थातच पंडितांना !’’ त्यांचं हे उत्तर ऐकताच धर्मगुरू पंडितांकडे गेले, त्यांचा तो ग्रंथ त्यांना परत करत म्हणाले,‘‘पंडितजी मला क्षमा करा ! मी ग्रंथ चोरला आहे हे माहीत असूनही तुम्ही काहीच बोलला नाहीत. त्यावर पंडितजी हसून म्हणाले,‘‘पश्चातापाची जेव्हा भावना होते त्यावेळेस कोणीच ती चूक पुन्हा करीत नाही. कारण पश्चातापामुळे तो त्या चुकीतून बाहेर पडायला धडपडत असतो.
तात्पर्य – शिक्षेनी नाही तर क्षमा केल्याने चूक सुधारत असते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.