उचलली जीभ लावली टाळ्याला असं बोलू नये. विचार करूनच शब्द उच्चारावेत

एकमेकाला लागून शेत असलेले दोन शेतकरी शेजारी शेजारी रहात असत. एक दिवस एकाच्या मनात शेजार्‍याविरूद्ध वाकडेपणा आला. तो समोरच्या शेतकर्‍याची निदा नालास्ती करू लागला. पण तरीही शेजारच्या शेतकर्‍याच्या वागण्यात कोणताच बदल नव्हता. त्याचे वागणे पहिल्याप्रमाणे चांगलेच होते. त्यामुळे ह्या शेतकर्‍याला स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप झाला. तो मनातून दुःखी झाला. एक दिवस एक साक्षात्कारी पुरुष त्याच्या शेतात पाणी पिण्यास थांबले. शेतकर्‍याने आपली कृती त्यांच्याजवळ बोलून दाखविली, ‘‘या पापातून बाहेर पडायला काही उपाय सांगा’’ अशी त्याने विनंती केली. महाराज त्याला म्हणाले, ‘‘पक्षांची पोतंभर पिसं घेऊन ती गावातल्या मैदानावर सकाळी उधळून ये.’’ शेतकर्‍याने तसे केले. संध्याकाळी महाराजांनी त्याला सांगितले, ‘‘आता मैदानावर जाऊन ती पिसं गोळा करून आण.’’ शेतकरी मैदानावर गेला तो पिसं गोळा करू लागला पण विखुरलेली पिसं गोळा करणं त्याला अशक्य झाले. हताश होऊन तो परतला. महाराज त्याला म्हणाले, ‘‘एखाद्याविषयी उगाच खोटं बोलून त्याला बदनाम करणं सहज सोपं आहे पण नंतर पश्चाताप झाल्यावर हे निस्तरणं महाकठीण काम आहे. त्यामुळे अशा केलेल्या पापातून मोकळं होणं शक्य नाही. कारण शब्द हे असे आहेत की ते एकदा बाहेर पडले तर ते परत घेता येत नाहीत.’’ हे ऐकून त्या शेतकर्‍याने महाराजांची आणि शेजार्‍याची माफी मागितली. आयुष्यात पुढे असं न वागण्याची शपथ घेतली. ःः
तात्पर्य – उचलली जीभ लावली टाळ्याला असं बोलू नये. विचार करूनच शब्द उच्चारावेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.