समयसूचकता ही आयुष्यात उपयोगी पडते

एका शेतात एक शेतकरी आपल्या कुटुंबासह राहात होता. त्याला चार मुलं होती त्यापैकी सगळ्यात लहान मुलगा हा स्वभावाने अतिशय व्रात्य होता. सतत कोणाच्या तरी खोड्या काढायचा किवा घरात, शेतात काहीतरी उद्योग करून ठेवायचा. अगदी काहीच मिळालं नाही तर गायी-म्हशींचे पाय बांधून ठेवणे नाहीतर वासराच्या शेपटीला फटाके लावणे हे दिवसभर चालूच असे. क्षणभर सुद्धा तो उद्योग केल्याशिवाय स्वस्थ बसत नसे. एक दिवस गायी-म्हशींच्या अंगावर विहिरीजवळील ओली माती घेऊन ती थापत बसला होता. मातीत खेळता खेळता बाभळीचा एक काटा त्याच्या हातात खोलवर गेला. हातातील काटा त्याने ओढून काढला आणि हातातून भळभळ रक्त वाहू लागलं. आता हे कोणी पाहिलं तर आपली काही खैर नाही या भीतीपोटी विहिरीजवळ तो हात धुवायला गेला. पण तिथं पाणी नव्हतं. रहाटला वरच्या बाजूने एक रिकामी बादली दोराला लटकत होती. दोराच्या दुसर्‍या टोकाची बादली विहिरीत पाण्याने भरली होती. त्याने शक्कल लढविली. रिकाम्या बादलीत तो बसला त्याच्या वजनाने बादली विहिरीत गेली व पाण्याने भरलेली बादली वर आली. विहिरीत गेल्यावर त्याने हात स्वच्छ केले. पण वर कसे यायचे ? हा प्रश्न होता. तेवढ्यात त्यांचा कुत्रा विहिरीत डोकावला. विहिरीत मासे असल्याची लालूच त्याने कुत्र्याला दाखवली व वरच्या पाण्याच्या बादलीत त्याला बसायला सांगितले. मालकाच्या आज्ञेने कुत्रा पाण्याच्या बादलीत बसला. पाणी आणि कुत्र्याचे वजन यामुळे बादली खाली विहिरीत आली आणि हा बसला होता ती बादली वर आली. बादली वर येताचा उडी मारून तो विहिरीच्या बाहेर आला.
तात्पर्य – समयसूचकता ही आयुष्यात उपयोगी पडते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.