पाटील, संतोष

समजायला लागल्यापासून कुटुंबाला हातभार लावण्यासाठी वडिलांसोबत मासेमारीसाठी रात्रभर समुदावर राहायचे व सकाळी शाळेला हजेरीही लावायची, असे खडतर आयुष्य जगणार्‍या उरणच्या संतोष पाटील या जलतरणपटूने जिब्राल्टरची खाडी पोहून पार करण्याचा विक्रम केला. अशी कामगिरी करणारा संतोष हा पहिलाच ‘नौसैनिक’.

उरणच्या केगाव-दांडा या ग्रामीण भागात राहणार्‍या संतोषच्या पोहण्याच्या आवडीला एका ध्येयाचे रूप मिळाले ते सेंट मेरी आणि ‘नेटिव्ह स्कूल ऑफ उरण’ या शाळांमध्ये. शाळेत संतोषने जिल्हा, झोनल, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांत आपले भन्नाट वेगात पोहण्याचे कौशल्य दाखवले आणि वयाच्या १६व्या वर्षी धरमतर ते मुंबई हे अंतर ९ तास १६ मिनिटांत पार केले.

१० वी नंतर संतोषला शिक्षण सोडावे लागले आणि आयआयटी, पवईमध्ये इन्स्ट्रक्टर कम लाइफ गार्ड, म्हणून काम करावे लागले. एका वर्षातच तो मुंबई महापालिकेत लाइफ गार्ड बनला. तिथे त्याने गिरगाव चौपाटीवर जीवरक्षकाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडतानाच, गणेश विसर्जनात समुद्रावर नजर ठेवणे, तसेच मूर्तीचे सुरक्षित पद्धतीने विसर्जन करण्यात मोलाची कामगिरी बजावली. दरम्यान, संतोषने २००५ मध्ये ‘सन्क्रो ते गेटवे’ हे ५ किमीचे अंतर ३८ मिनिटांत आणि २००९ मध्ये ‘मोरा ते गेटवे’ हे १४ किमीचे अंतर २ तास ३२ मिनिटांत पार केले. २००८ मध्ये नौसेनेच्या भरतीमध्ये संतोषची जलतरणातील कामगिरी पाहून खलाशी म्हणून निवड झाली आणि नौसेनेत राहून देशाची सेवा करण्याचे संतोषचे स्वप्न सत्यात उतरले.

पुढे जिब्राल्टरची खाडी पोहून जाण्याची मोहीम हाती घेण्यात आली, तेव्हा संतोषला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहण्यासंदर्भात अर्जुन पुरस्कार विजेत्या आरती प्रधान यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांनीच संतोषला आहार,स्वीमिंगच्या विविध पैलूंची व अजून या क्षेत्रातील सुक्ष्म

खाचा खळग्यांची ओळख करून दिली. पाण्यात दिसणारे मासे, शेजारून सरसर पोहत जाणारे डॉल्फिनचे कळप, शार्कचा सतत असलेला धोका, हाडं आणि मती गुंग करणारी थंडी या अवस्थेत पोहणे म्हणजे शरीराचा अंत पाहण्यासारखेच. पण स्वत:वरील आणि देवावरील विश्वास यांच्या बळावर सलग ४ तास ५३ मिनिटे पोहून संतोषने ही जगातील सर्वात व्यग्र असलेली खाडी पार केली आहे. त्याच्या या अतुलनीय कामगिरीची दखल घेत ‘इंग्लिश चॅनेल स्वीमिंग असोसिएशन’ने त्यास इंग्लिश खाडी पोहण्याचे आमंत्रण दिले आहे.

( संदर्भस्त्रोत- महाराष्ट्र टाईम्स )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*